Skip to main content
x

जोशी, निवेदिता गजानन

      निवेदिता गजानन जोशी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे बालपणही तेथेच गेले. किंग जॉर्ज हायस्कूल, दादर आणि माधवराव भागवत हायस्कूल विलेपार्ले येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई येथील सिडनहॅम महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकेकाळी बालरंगभूमीवरून हौस-मौज म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. ‘टिळक-आगरकर’, ‘अखेरचा सवाल’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘श्रीमंत’, ‘तुझ्या-माझ्यात’ या नाटकांमधून निवेदिता जोशी यांनी कामे केली. ‘ये जो है जिंदगी’ या हिंदी मालिकेतील अभिनयामुळे त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या.

     निवेदिता जोशी यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तो ‘घरचा भेदी’ या चित्रपटाद्वारे. या चित्रपटात ललिता पवार, महेश कोठारे यांच्यासमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. निवेदिता जोशी यांनी ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अर्धांगी’ या चित्रपटांमधून सहनायिकेच्या भूमिका केल्या. पण ‘धूमधडाका’(१९८५) या चित्रपटाद्वारे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. श्रीमंत बापाची लाडात वाढलेली मुलगी, कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला धडा शिकवायला जाते. पण या कामगारामुळे या मस्तवाल मुलीची श्रीमंतीची नशा उतरून ती, त्या कामगाराच्याच प्रेमात पडते, अशा या तरुणीची भूमिका त्यांनी या चित्रपटात साकारली होती.       

     ‘मराठी नायिका’ अशी आपली कारकिर्द व्यवस्थित सुरू असतानाच अशोक सराफ यांच्याशी गोवा येथे अचानक लग्न करून निवेदिता सराफ म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या आणि कालांतराने प्रथम छोट्या पडद्यावरील मालिकांची निर्माती व त्याहून पुढे लग्नसोहळ्यासाठीचे आयोजन अशा या क्षेत्राबाहेरच्या उद्योगापर्यंत त्यांचा प्रवास पोहोचतो. विशेष म्हणजे, मान्यवर वृत्तपत्रांनी एक उद्योजिका म्हणूनही निवेदिता सराफ यांची दखल घेतलेली आहे.

     निवेदिता जोशी यांचा प्रवास चौफेर आहे. त्यांना ‘किंग अंकल’, ‘मरते दम तक’, ‘नरसिंह’ इ. हिंदी चित्रपटात नायिका म्हणून काम करण्याची संधी महेश कोठारेंनी दिली. महेश कोठारेंच्या ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’ (१९८९) यात निवेदिता जोशी या महेश यांच्या हुकमी व यशस्वी नायिका होत्या, तर महेश यांनीच ‘माझा छकुला’मध्ये एका व्याकुळ मातेची भूमिका देऊन त्यांच्या अभिनयाला वाव दिला. या व्यतिरिक्त त्यांनी गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप बह्मचारी’ (१९८९) या चित्रपटातील भूमिकाही लोकप्रिय ठरली. तत्पूर्वी याच निवेदिता एका वेगळ्या गाण्याद्वारे आपल्यासमोर आल्या. ओम प्रकाश निर्मित व दिग्दर्शित ‘अपनापन’ या चित्रपटात सुधीर दळवी एका प्रवासी बसमध्ये ‘आदमी मुसाफीर है, आता है, जाता है’ हे गाणे गातात, तेव्हा त्यांच्यासोबत असणारी मुलगी म्हणजेच निवेदिता जोशी होय.

     अशोक सराफ यांच्यासोबतच्या संसारात एका मुलाच्या आईची जबाबदारी पेलत असतानाच त्यांनी निर्मिती संस्था स्थापली व काही मालिकांची निर्मिती केली. ‘चुटकी बजाके’, ‘डोंट वरी’, ‘हो जाएगा’, ‘फिफ्टी फिफ्टी’ अशा त्यांच्या मालिका लोकप्रिय झाल्या. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून त्यांनी २०१९मध्ये पुन्हा मराठी मालिका विश्वात प्रवेश केला.

     - दिलीप ठाकूर

जोशी, निवेदिता गजानन