Skip to main content
x

जोशी, नरहर विष्णू

           हाराष्ट्रात संगीताच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी आपले लेखन व अन्य उपक्रमांद्वारे संगीताची अभिरुची संवर्धित करण्यासाठी मोठे योगदान दिले, त्यांत नरहर विष्णू तथा बाबूराव जोशी यांचे नाव अग्रक्रमाने नोंदवावे लागते. त्यांचा जन्म संगीताने भारलेल्या कोल्हापुरात झाला. विष्णू विनायक जोशी व लक्ष्मीबाई हे त्यांचे पिता-माता होत. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते.

नरहर जोशी यांचे शिक्षण कोल्हापुरात राजाराम महाविद्यालय व नंतर पुण्यात डेक्कन महाविद्यालयात झाले. त्यांनी १९३० च्या सुमारास एलएल.बी. ही वकिलीची पदवी प्राप्त केली व कोल्हापुरात दिवाणी न्यायालयात अत्यंत यशस्वितेने सुमारे १९७८ पर्यंत व्यवसाय केला. पत्नी शांताबाई व चार अपत्यांचा संसारही त्यांनी नेटका केला. मात्र, या वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांचे संगीत क्षेत्रातील महत्त्वाचे कार्य नावाजले गेले.

वडिलांच्या प्रोत्साहनाने नरहरांचे संगीताचे शिक्षण प्रथम वामनराव पाध्ये (ग्वाल्हेर घराणे) यांच्याकडे सुरू झाले. तसेच गुंडोपंत वालावलकर, विश्वनाथबुवा जाधव, अण्णाबुवा इचलकरंजीकर यांचेही मार्गदर्शन त्यांना अल्पकाल मिळत गेले. मग जयपूर अत्रौली घराण्याची तालीम उ. नथ्थन खाँ, . भुर्जी खाँ आणि पं. गोविंदबुवा शाळिग्राम यांच्याकडे मिळाली. . अल्लादिया खाँसाहेबांचा सहवास व गोविंदराव टेंब्यांचा स्नेहही त्यांना लाभला. पं. जगन्नाथबुवा पुरोहित तथा गुणिदासयांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. याखेरीज उ. घम्मन खाँ यांनी ठुमरी-दादरा, लावणी यांचीही खास नजर त्यांना दिली. उत्तम रितीने मैफली ढंगाचे गायन करू शकणार्या नरहर जोशी यांनी आपले लक्ष संगीताच्या प्रसार व उद्बोधनाकडे वळवले.

संगीतकला व कलाकार यांविषयी असणार्या आस्थेमुळे बाबूराव जोशी यांनी रसिकांना अभिजात संगीत अधिक उमजावे, त्यांची अभिरुची समृद्ध व्हावी या उद्देशाने अनेक उपक्रम केले. संगीताचे रसग्रहण’ (१९५६, दुसरी आवृत्ती : १९६१) हे त्यांचे पुस्तक संगीत रसिकांस संगीताची मर्मस्थळे सांगत संगीताचा आस्वाद कसा घ्यावा याची योग्य दिशा देते. याच तर्हेने त्यांनी अंडरस्टॅण्डिंग इंडियन म्यूझिक’ (१९६३) व अॅन्थशर लोबो यांसह लिहिलेल्या इंट्रोड्युसिंग इंडियन म्युझिक’ (४ ध्वनिमुद्रिकांसह, १९६५) या इंग्रजी ग्रंथाद्वारे परदेशीय श्रोत्यांना भारतीय संगीताच्या रसास्वादाची सूत्रे सांगितली आहेत.

संगीताने गाजलेली रंगभूमी’ (१९५९; दुसरी आवृत्ती : १९७४) या पुस्तकात त्यांनी मराठी संगीत रंगभूमीचा ऐतिहासिक पट उलगडला आहे. लहान वयातील मुलांस भावतील अशा साध्या-सोप्या (मनोहर कवीश्वर कृत) गीतांद्वारे संगीताची मूलतत्त्वे रुजवण्याचा प्रयत्न त्यांच्या बालसंगीतया पुस्तकाद्वारे त्यांनी केला. या पुस्तकाचा हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाला. छंदशास्त्र आणि संगीत’ (१९८०) हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काव्यछंदांच्या पारंपरिक चाली मिळवून एकंदर मराठी संगीतातील वृत्तछंद व त्यांचे सांगीत रूप यांचे समग्र दर्शन घडवणारा हा मौलिक ग्रंथ आहे.

माझी मुशाफिरी’ (१९८४) हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक त्यांच्या काळातील महाराष्ट्रातील संगीताच्या स्थितीवर चांगला प्रकाश पाडते. बाबूराव जोश्यांच्या या एकंदर सात ग्रंथांतील लेखनाचे वैशिष्ट्य असे, की संगीताच्या अभिरुचीचे संवर्धन करण्याचा उद्देश असल्याने अत्यंत सरलतेने, आकर्षकपणे त्यांनी हे लेखन केले आहे, तसेच छंदशास्त्र व संगीतया ग्रंथात एका शास्त्रकाराची शिस्तही आहे. संगीताचे रसग्रहण’, ‘इंट्रोड्युसिंग इंडियन म्युझिक’, ‘बालसंगीतछंदशास्त्र आणि संगीतया चार पुस्तकांसह विवेचन व गायन असलेल्या ध्वनिमुद्रिकांद्वारे प्रत्यक्ष कर्णप्रत्यय देण्याचा स्त्युत्य उपक्रम बाबूरावांनी केला. यातून आधुनिक काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून आपले कार्य सुकर करण्याची त्यांची पुरोगामी दृष्टीही लक्षात येते. (या संगीतविषयक पुस्तकांखेरीज कोल्हापूरचे   जे.पी. नाईकहे पुस्तकही बाबूरावांनी १९८२ साली लिहिले.) या ग्रंथलेखनासह त्यांनी गावोगावी संगीतविषयक व्याख्याने (विशेषत: संगीताचे रसग्रहणया विषयावर), शिबिरे, कार्यक्रम करून अभिरुची संवर्धन केले. त्यांनी लोबोंसह इंग्रजी भाषेतूनही सप्रयोग व्याख्याने दिली. हे कार्य त्यांनी मिशनरीवृत्तीने केले. अगदी खेडोपाडी जाऊन तेथील संगीत शिक्षकांस ते आपल्या बालसंगीतपुस्तक व ध्वनिमुद्रिकेद्वारे शालेय स्तरावर संगीतशिक्षण कसे द्यावे याचा वस्तुपाठ देत असत.

ते १९५६ साली झालेल्या महाराष्ट्र तमाशा परिषदेच्या पुणे अधिवेशनाचे उद्घाटक होते व त्यांनी या प्रसंगी लावणी संगीतावर व्याख्यान दिले होते. दर आठवड्यातून दोन भागांत प्रसारित होणारी, सुमारे ५० भागांची धन्य ते गायनी कळाही संगीत रसग्रहणपर मालिका त्यांनी आकाशवाणीवरून सादर केली. यात त्यांचे भाष्य व सरला भिडे यांचे गायन असे स्वरूप होते.

बाबूरावांनी अनेकांना संगीताचे मार्गदर्शन केले, त्यांत भारती वैशंपायन, माणिक भिडे या काही ठळक गायिका होत. डॉ. भारती वैशंपायन (शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख) यांनी त्यांच्याकडे विशेषत: उपशास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले व त्यांना बाबूरावांचा दीर्घकाळ सहवास लाभला. ध्वनिमुद्रिकांतील गायनाच्या निमित्ताने सरला भिडे, सुधीर पोटे यांनीही त्यांचे मार्गदर्शन घेतले.

संगीतात अखेरपर्यंत रममाण असलेल्या बाबूराव जोशी यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र राज्य सरकारचा ललित आणि सौंदर्यशास्त्र गटातील सर्वोत्कृष्ट लेखनासाठीचा १९८१-८२ सालचा पुरस्कार छंदशास्त्र आणि संगीत’  या  ग्रंथाच्या लेखनासाठी बाबूराव जोशी यांना मरणोत्तर देण्यात आला.

चैतन्य कुंटे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].