जोशी, शरद अनंत
शरद अनंत जोशी यांचा जन्म सातारा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबईच्या सिडनॅहॅम महाविद्यालयातून पूर्ण केला. पुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते भारतीय टपाल सेवेत रुजू झाले. ते १९६८मध्ये स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे जागतिक टपाल संघटनेमध्ये संख्याशास्त्र विभागात दाखल झाले. इन्फर्मेशन सर्व्हिस इंटरनॅशनल ब्युरोमध्ये ते अधिकारी म्हणून रुजू झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना हाती येत चाललेल्या तिसऱ्या देशातील आकडेवारींनी जोशी अस्वस्थ होत गेले. तिसऱ्या देशाच्या दारिद्र्याचा प्रश्न कोरडवाहू शेतीत अडकला असल्याची त्यांची स्पष्ट धारणा झाली. त्यांनी या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतात परतायचे निश्चित केले. म्हणून ते १९७६मध्ये पत्नी लीला, दोन मुली श्रेया व गौरी यांच्यासोबत भारतात परतले. त्यांनी पुणे जिल्ह्यात चाकणजवळ अंबेठाण या गावी २८ एकर कोरडवाहू शेती खरेदी करून आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. शेतकऱ्यांची शेती कायमच तोट्यात राहावी अशीच धोरणे शासनाकडून आखली जातात, असा निष्कर्ष त्यांनी या अभ्यासातून काढला. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघू नये इतके कमी भाव त्यांना जाणीवपूर्वक दिले जातात. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेव्हा वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, बाजार समितीचा खर्च, मुख्यमंत्री फंडाला दिलेले पैसे इतका खर्च वजा जाता शेतकऱ्यालाच खिशातून पैसे द्यायची वेळ येते. हे उलट पट्टीचे गणित आहे, हे जोशी यांच्या लक्षात आले. शेतमालाच्या अपुऱ्या किमती हेच शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे मूळ कारण आहे आणि शेतकऱ्याचे दारिद्र्य हेच देशाचे दारिद्र्य आहे, अशा या मांडणीतूनच पुढे ‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळालाच पाहिजे’ हा एककलमी कार्यक्रम पुढे आला.
जोशी यांनी सर्वप्रथम १६ फेब्रुवारी १९८० रोजी चाकण परिसरात कांद्यासाठी आंदोलन केले आणि या चळवळीला सुरुवात झाली. कांद्याचा चिघळलेला प्रश्न, देशाच्या कांद्यांच्या एकूण बाजारपेठेत चाकणचे स्थान आणि आंदोलनाच्या दृष्टीने मुंबई-आग्रा मार्गावरची चाकणची जागा या सगळ्यांचा विचार करून योजनापूर्वक ‘रस्ता रोको’ आंदोलन पुकारण्यात आले. यानंतर जोशी यांनी निपाणी (कर्नाटक)चे तंबाखू आंदोलन, नाशिकचे उसाचे आंदोलन आणि मग विदर्भातील कापसाचे आंदोलनही यशस्वीपणे पूर्ण केले. ही सगळी आंदोलने शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने करण्यात आली. तरीही शासनाने शस्त्र वापरून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकर्यांचे नाहक बळी गेले.
जोशी यांनी शेतकरी समाज हा मूलत: स्वतंत्रतावादी आहे, हे ओळखून संपूर्ण शेतकरी आंदोलनही त्या विचाराभोवतीच उभे केले. सटाणा येथे जानेवारी १९८२मध्ये संघटनेचे पहिले अधिवेशन भरले. त्यानंतर परभणी, धुळे येथेही अधिवेशने यशस्वी झाली. त्यात १९८६मध्ये चांदवड येथे भरलेले शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या अधिवेशनात उपस्थित राहिलेल्या लाखो शेतकरी महिलांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली.
शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रसारासाठी ६ एप्रिल १९८३ रोजी ‘शेतकरी संघटक’ या पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे यांच्या संपादनाखाली हे पाक्षिक यशस्वीपणे चालू आहे. जोशी यांचे सर्वच लिखाण या पाक्षिकातूनच प्रसिद्ध झाले आहे. दिल्लीच्या बोटक्लब मैदानावर १९८९मध्ये एक मोठा शेतकरी मेळावा देशभरच्या शेतकरी संघटनांनी भरवून दाखवला. जोशी यांचे नेतृत्व तोपर्यंत देशपातळीवर स्थिरावले होते, पण उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे जाट नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी जोशी यांना मंचावर धक्काबुक्की केली आणि हा मेळावा उधळला. तेव्हा जोशींना हृदयविकाराचा मोठा झटका आला व त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले, पण देशभरच्या शेतकर्यांमध्ये जोशींच्या विचारांचा संदेश स्वच्छपणे पोहोचला होता. व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १९९०मध्ये स्थायी कृषी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल ‘राष्ट्रीय कृषिनीती’ या नावाने जोशी यांनी सादर केला. त्यातील तरतुदी बघितल्यास त्यांच्या दूरदृष्टीची आजही जाणीव होते. पुढे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कार्यबलाच्या अध्यक्षपदावरही शरद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
जनता दलाच्या चिन्हावर १९९०च्या विधानसभा निवडणुका शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जण विधानसभेवर आमदार म्हणून निवडूनही आले. याच पाच सहकाऱ्यांसह आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर १९९४मध्ये शरद जोशी यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. शरद जोशी यांनी १९९५मध्ये हिंगणघाट (वर्धा), बिलोली (नांदेड) या दोन मतदारसंघातून विधानसभेची, तर १९९६मध्ये नांदेड मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांना अपयश स्वीकारावे लागले. डाव्या/समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना १९९०मध्ये डंकेल प्रस्तावाला जोरदार समर्थन देण्याची त्यांची भूमिका पटली नाही. शेतकऱ्याचे भले खुल्या व्यवस्थेत आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. कुठलाच पक्ष खुलेपणाने जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यास तयार नसताना त्यांनी दूरदृष्टीने हे समर्थन केले.
खुल्या व्यवस्थेविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी ‘स्वतंत्रतेची मूल्ये’ या नावाने चार लेख लिहिले. हे लेख म्हणजे त्यांच्या संपूर्ण विचारसरणीची पायाभूत मांडणी आहेत. स्वतंत्रतावाद हा शेतकरी संघटनेच्या विचारसरणीचा पाया आहे. ‘नियोजन व्यवस्थेचा सर्वात क्रूर बळी शेतकरी ठरला व स्वतंत्रतावादाचा झेंडा सरसावून शेतकरी बाहेर पडले. जगभर बळीराजाची द्वाही फिरत आहे. भारतात मात्र अजूनही स्वकर्तृत्वावर उभे राहण्याची हिम्मत नसलेले आणि सरकारी दक्षिणांना चटावलेले पुढारी त्याला विरोध करू पाहात आहेत’ अशा नेमक्या शब्दांत शेतकरी आंदोलनाचे वैचारिक स्वरूप त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कृषी कार्यबलाचे अध्यक्ष म्हणून शरद जोशी यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. या काळात ‘स्वतंत्र भारत पक्ष’ सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला.
शरद जोशी २००४-२०१० या काळात राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलताना मांडलेली मते लक्षणीय म्हणून कामकाजात नोंदवली गेली आहेत. खुल्या व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतरही शेती क्षेत्रात मात्र ती पूर्णपणे येऊ दिली गेली नाही, याबद्दल शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेने सातत्याने आवाज उठवला आहे. कापसाच्या निर्यातबंदीवर अतिशय तीव्र प्रतिक्रिया संघटनेने नोंदवताच केंद्र शासनाला आठवड्याच्या आत बंदी उठवावी लागली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेले स्वतंत्र भारतातील हे एकमेव आंदोलन आहे व त्याचे नेतृत्व जोशी यांनी समर्थपणे केले आहे. ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणेतच संघटनेच्या कामाचा आवाका लक्षात येतो.
शरद जोशी यांनी ‘शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती’, ‘प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश’, ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख’, ‘चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न’, ‘स्वातंत्र्य का नासले’, ‘खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने’, ‘अंगारमळा’, ‘जग बदलणारी पुस्तके’, ‘अन्वयार्थ-भाग १’; ‘अन्वयार्थ-भाग २’; ‘माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो’; ‘अर्थ तो सांगतो पुन्हा’; ‘बळीचे राज्य येणार आहे’; ‘पोशिद्यांची लोकशाही’ या पंधरा पुस्तकांमधून अतिशय सोप्या भाषेत आपल्या स्वतंत्र विचारांची मांडणी करून ठेवली आहे.
जोशी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून १० नोव्हेंबर २०१० रोजी शेगाव येथे त्यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी स्वागत वा हार-तुरे त्यांनी न स्वीकारता ज्येष्ठ वयोवृद्ध शेतकऱ्याच्या हस्ते एक मानपत्र स्वीकारले. सामान्य शेतकऱ्यांनी त्यांचा गौरव केला यातच त्यांना आनंद मिळाला. या मेळाव्याला लाखो शेतकर्यांनी उपस्थिती लावून या शेतकरी नेत्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.