Skip to main content
x

जोशी, श्रीधर सर्वोत्तम

      १९४३ साली ‘जोशी इफेक्ट’मुळे जगप्रसिद्ध झालेले संशोधक श्रीधर सर्वोत्तम जोशी, बनारस हिंदू विद्यापीठामधील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तेथेच ते (इ.स.१९३७-१९५९) रसायन विभागात अध्यापन आणि संशोधन करीत.

      डॉ. श्रीधर सर्वोत्तम जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे अकोला येथील मामा वासुदेव लक्ष्मण चिपळोणकर यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन आवश्यक ती मदत केली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. तेथून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्याआधीपासूनच त्यांनी मुंबईच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’शी पत्रव्यवहार करून वैज्ञानिक संशोधनाची सुरुवात केली होती. नंतर प्रा. शांतिस्वरूप भटनागर यांच्या सल्ल्यानुसार ते बनारस हिंदू विद्यापीठात एम.एस्सी. पदवी मिळवण्यासाठी रुजू झाले. प्रा. भटनागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलिली द्रावण ‘कोलाईड’ या विषयावर एक प्रबंध लिहिला. या प्रकल्पामधून त्यांनी एक शोधनिबंध, ‘फॅरेडे सोसायटी’ (लंडन) आणि दोन शोधनिबंध, ‘कोलाईड झाइटशिफ्ट’ (जर्मनी) या अव्वल दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. त्या संशोधनाचे निष्कर्ष ‘अ‍ॅन्युअल प्रोग्रेस रिपोर्ट ऑफ केमिकल सोसायटी’ (लंडन-१९२४) मध्ये छापून आले. परिणामी त्यांना त्या विषयातील पुढील सखोल संशोधनासाठी निधी उपलब्ध झाला. संशोधन करण्यासाठी ते प्रा. डोनॉन (संचालक, केमिकल लॅबोरेटरी, लंडन विद्यापीठ) यांच्याकडे गेले. त्यांना तेथे प्रा. विल्यम रॅम्झी यांचे मार्गदर्शन लाभले. सर प्रा. रॅम्झी हे निष्क्रिय वायूंचा सखोल अभ्यास आणि संशोधन केलेले १९०४ सालचे नोबेल विजेते शास्रज्ञ होते. त्यांच्या अनुभवाचा प्रा. जोशी यांना खूप लाभ झाला.

     सुरुवातीला डॉ. जोशी यांनी कोलाईड्सविषयक संशोधन करायचे ठरवले होते. तथापि त्यांना वायूंमधील विद्युत्-विसर्जन (गॅस डिसचार्ज) आणि त्या स्थितीमध्ये वेगाने होणाऱ्या रासायनिक क्रियांसंबंधी तीव्र कुतूहल निर्माण झाले. त्यांनी ‘कलिली द्रावण’ विषय सोडून दिला. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती स्थगित झाली. त्यांनी अंगीकारलेल्या आवडत्या विषयात त्यांना विलक्षण निष्कर्ष मिळत गेले. साहजिकच त्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू झाली आणि आर्थिक विवंचना दूर झाली. १९२८ साली त्यांना लंडन विद्यापीठाची डी.एस्सी. पदवी मिळाली. नंतर त्यांनी बर्लिनमध्ये प्रा. नर्स्ट आणि पॅरिसमध्ये प्रा. पेरिन यांच्याकडे काही काळ संशोधन केले. या काळात त्यांना नागपूर येथे वरिष्ठ प्राध्यापकपद मिळत होते. अशा परिस्थितीत नेमके काय करावे, याचा विचार डॉ. जोशी करीत होते. विचारपूर्वक डॉ. जोशी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात एक अध्यापक म्हण्ाून कामाला सुरुवात केली. अलाहाबाद विद्यापीठातही त्यांना जास्त पगाराची नोकरी मिळत होती. डॉ. जोशी यांनी कालांतराने विद्यापीठाच्या विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली. या ठिकाणी त्यांनी २२ वर्षे (इ.स.१९३७-१९५९) संशोधन आणि अध्यापन केले. अणुरचना, उष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक्स), प्रकाश रसायनशास्त्र (फोटोकेमिस्ट्री) या विषयांचे अध्यापन आणि संशोधन त्यांनी सातत्याने, आवडीने केले.

     प्रा. जोशींनी कोलॉईडल केमिस्ट्रीमध्ये ‘झोनल इफेक्ट’ याविषयी संशोधन करून मोलाची भर घातली. त्याचबरोबर, विद्युत रसायन शास्त्र (‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’) मध्ये वितळलेल्या क्षारांमधील विद्युत्-विसर्जन, या विषयीचे महत्त्वपूर्ण संशोधन केले. सिंथेटिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी क्रियाशील नत्र अणूची (अ‍ॅक्टिव्ह नायट्रोजन) निर्मिती कशी होते ते सिद्ध केले. अमोनियाचे संशोधन करणाऱ्या  महत्त्वपूर्ण रासायनिक प्रक्रियांचे संशोधन करणाऱ्या संशोधकांना त्याचा उपयोग झाला. ‘प्रकाश रसायनशास्त्र’ (फोटो केमिस्ट्री) संबंधीही त्यांनी दर्जेदार संशोधन केले. वि.ग. भिडे, हरी जीवन अर्णीकर, पी.जी. देव, जी.एस. देशमुख, एम.आर. भिडे व पुरुषोत्तम या सहकाऱ्यांबरोबर त्यांनी संशोधन करून सुमारे ३०० शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांचे ‘नेचर’ या अग्रगण्य वैज्ञानिक नियतकालिकामधील दोन शोधनिबंध (खंड १४७, १९४१ आणि खंड १५१, १९४३) हे विशेष महत्त्वाचे गणले जातात.

     विद्युत्भट्टी (फर्नेस)मध्ये सर्वत्र एकसारखे तापमान असणे गरजेचे असते. विशेषत: उच्च तापमानातील पदार्थविज्ञानाचे संशोधन करताना त्याचा उपयोग होतो. प्रा. जोशी यांनी त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन ‘विद्युतभट्टी’साठी एक खास डिझाइन बनवले. गॅलेनकॅप या कंपनीने त्याचे एक एकस्वही घेतले.

     सोडियम परक्लोरेटसारखे अत्यंत स्फोटक, पण औद्योगिक क्षेत्रात उपयुक्त ठरणारे एक रसायन त्यांनी प्रयोगशाळेत तयार केले होते. त्यांचे स्फोटक पदार्थांवरील संशोधन लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने त्यांची एका उच्चस्तरीय समितीवर नेमणूक केलेली होती. ती समिती सरकारी दारूगोळा उत्पादन करणार्‍या कारखान्याशी संबंधित बाबींचा अभ्यास करणारी होती.

     प्रा. जोशींचे नाव ‘जोशी परिणाम’ (जोशी इफेक्ट)शी संबंधित आहे. धातूमधून जसा विद्युतप्रवाह सहजपणे वाहू शकतो, तसा तो वायूमधून वाहत नाही. तथापि विद्युतदाब वाढवला आणि वायू विरळ असला, तर मात्र त्यातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. वास्तविक ही विद्युतधारा स्थिरपणे वाहत राहावयास हवी; पण प्रा. जोशी यांना १९३९ साली प्रयोग करीत असताना काही वेगळे निष्कर्ष मिळाले. उपकरणावर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेनुसार विद्युतधारा कमी अथवा जास्त प्रमाणावर वाहू लागते. इ.स. १९३९-१९४२ सालांच्या दरम्यान त्यांनी याबद्दल सूक्ष्म निरीक्षण केले. ते निष्कर्ष त्यांनी १९४३ साली प्रसिद्ध केले, त्याला ‘जोशी परिणाम’ म्हणतात. यावर देशी, परदेशी संशोधन चालू असून या विषयावर ३०० च्यावर शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी स्थानिक ठिकाणी मिळणाऱ्या कच्च्या मालातून बहुमोल रसायने तयार केली. त्यांनी पोटॅशियम परमँगनेटसारखे संयुग, अ‍ॅसेटाइल क्लोराइड, अ‍ॅसेटिक अनहायड्राइड, अशा प्रकारची अनेक रसायने बनविली. त्यांचे उपयोजित संशोधन लक्षात घेऊन दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेने (सी.एस.आय.आर.) त्यांना पी.सी. रॉय पदक प्रदान करून त्यांचा सन्मान केला. या परिषदेच्या नियामक मंडळावर पंडित नेहरूंनी त्यांची नेमणूक केली.

     प्रयोगशाळेमध्ये उपकरणनिर्मितीसाठी यंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ म्हणून ते स्वत: काम करीत असत. तंत्रज्ञानामध्ये पारंगत अशा विद्यार्थ्यांचा एक खास गट त्यांनी तयार केला होता. हे सर्व करीत असताना त्यांची तळमळ, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांविषयीचे प्रेम आणि दुर्दम्य उत्साह सतत जाणवत असे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६० आहे.

     बनारस येथे शिक्षण घेत असताना काचेची उपकरणे ते स्वत:च घडवीत असत. त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक ‘ग्लास ब्लोइंग’चे प्रशिक्षण घेतलेले होते. त्यांनी एका मायक्रोमीटरची जडणघडणही केलेली होती. एकदा तेथील प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करीत असताना अचानक एक दुर्दैवी स्फोट झाला. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्याचा विपरीत परिणाम उतारवयात होऊ लागला. त्यांची दृष्टी अधू झाली. त्याही परिस्थितीमध्ये पुण्यामधील विविध संस्थांमध्ये प्रा.जोशी भेट देत होते. तसेच त्यांच्या ज्ञान-अनुभवाचा फायदा ते गरजूंना करून देत असत. १९६१ साली पुण्याला पानशेत धरण फुटून डेक्कन जिमखाना भागात पाणी साचले होते. तेथे जोशी यांचे निवासस्थान असल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक वह्या-पुस्तके आणि संशोधनामधील छायाचित्रे, आलेख खराब होऊन गेले. प्रा. जोशी या संकटाला धीरोदात्तपणे सामोरे गेले.

     पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावरील त्यांच्या वास्तूचे नाव ‘हेरॅकल्स होम’ असे होते. हेरॅकल हा ग्रीक ‘हीरो’ बहुआयामी व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असल्यामुळे प्रा.जोशींना त्याचे आकर्षण असणे स्वाभाविक होते. त्यांना विविध भाषांमधील कला, साहित्य आणि संगीताची आवड होती. त्यासंबंधीचा स्वाध्याय आणि सखोल चिंतन त्यांनी केले होते. त्यांचे वृद्धापकाळामुळे पुणे येथे निधन झाले.

डॉ.अनिल लचके

जोशी, श्रीधर सर्वोत्तम