Skip to main content
x

जोशी, श्रीपाद रघुनाथ

     श्रीपाद जोशी यांचे रूढ शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. पण ग्रहणशील मन आणि सुशिक्षित, सुसंस्कृत माणसांचा सहवास यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विचारी आणि विवेकी बनले. आचार्य काका कालेलकरांकडे आठ वर्षे राहून ते हिंदी, गुजराती, बंगाली या भाषा शिकले. दिल्लीत एक वर्ष राहून त्यांनी उर्दू साहित्याचा अभ्यास रसिकतेने केला. १९४२ सालच्या ‘छोडो भारत’ चळवळीत सरकारविरोधी पत्रके वाटल्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. कारावासातच त्यांनी कथा, कादंबरी, अनुवाद अशा स्वरूपाचे लेखन केले. पुढे गांधीजींच्या ‘हिंदुस्थानी प्रचार सभा’ संस्थेत दोन वर्षे चिटणीस आणि नंतर गारगोटी येथील मौनी विद्यापीठात चार वर्षे, तसेच पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत पंधरा वर्षे त्यांनी काम केले.

जोशी यांनी लहान-मोठी सुमारे दीडशे पुस्तके लिहिली. त्यांपैकी काही महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय इथे दिला आहे.

रामानंद सागर लिखित ‘और इन्सान मर गया’ या हिंदी कादंबरीचे मराठी भाषांतर ‘आणि माणसाचा मुडदा पडला’ हे आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू-मुसलमानांमधील द्वेष किती पराकोटीला गेला होता, आणि त्यामुळे केवढा भीषण रक्तपात झाला, याचे थरारक दर्शन ही कादंबरी घडविते.

‘विस्कटलेलं घरटं’ ही जोशींची स्वतंत्र कादंबरी होय. महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, स्पृश्यास्पृश्य वाद, खेडे-शहर, कूळ-जमीनमालक अशा वर्तमानकालीन द्वंद्वांवर ही कादंबरी प्रकाश टाकते. जेव्हा या द्वंद्वांशी संबंधित लोक, राजकीय पुढारी या वादांवर निर्मळ मनाने विचार करतील, तेव्हाच या वादांना मूठमाती मिळेल; असे लेखकाचे म्हणणे आहे.

‘भारतीय मुसलमान: काल, आज, उद्या’  हे लेखकाचे एक महत्त्वाचे पुस्तक. मुसलमानांच्या परिस्थितीची वस्तुनिष्ठ चर्चा करून लेखक असा निष्कर्ष काढतात की, जुना इतिहास विसरून मुसलमान या भारतभूमीशी एकरूप झाले, तर इतर जातींप्रमाणे त्यांचेही भवितव्य उज्ज्वल होईल. मात्र ज्यांना भारतीय राज्यघटनेची चौकट मान्य नाही, त्यांना या देशात स्थान नाही. असे आपले परखड मत लेखकाने नोंदविलेले आहे.

‘खलील जिब्रान’ हा लेबॅनॉनमधील स्वतंत्र विचारांचा लेखक, कवी आणि चित्रकार होय. तो ख्रिश्चन होता. पण त्याची जीवनमूल्ये फारच उच्च आणि प्रचलित ख्रिस्ती विचारांना धक्का देणारी होती. मराठी वाचकांना खलील जिब्रान कळावा म्हणून त्यांची सात पुस्तके लेखकाने मराठीत अनुवादित केलेली आहेत.

‘जा जरा पूर्वेकडे’ ह्या पुस्तकात जपानमधील प्रवासाचे वर्णन आहे. जपानमध्ये पौर्वात्य आणि पाश्‍चात्त्य जीवनपद्धतींचा संगम आढळतो. तो पाहावा आणि त्याचबरोबर जपानी लोकांना भारतीय समाजाची तोंडओळख करून द्यावी, अशा उद्देशाने लेखकाने जपानचा प्रवास केला.

‘चिनारच्या छायेत’ हे लेखकाने काश्मीरमध्ये केलेल्या प्रवासाचे वर्णन करणारे पुस्तक आहे.

‘उलगा उलग’ हे लेखकाचे आत्मचरित्र आहे. ज्या काळात लेखक वावरला, तो ‘मंतरलेला’ काळ होता. पण तो आता पुसट झालेला आहे. म्हणून तो या आत्मचरित्रात स्पष्ट करून मांडलेला आहे. तसेच लेखकाने स्वतःचे केलेले परीक्षणही येथे वाचायला मिळते.

‘महात्मा गांधी: जीवन आणि शिक्षण’ या पुस्तकात गांधीजींचे संदेश आणि त्याला पूरक अशा गांधीजींच्या जीवनातील घटना वाचावयास मिळतात.

एकंदरीत जोशींच्या पुस्तकांमधून त्यांचे गांधीवादी, समाजवादी विचार आणि त्यांचे समतोल, उदार मनही कळते.

‘उर्दू-मराठी शब्दकोश’ लिहून जोशी यांनी मराठी, उर्दू अभ्यासकांची फार मोठी सोय करून ठेवली आहे.

अनुवादित साहित्यासाठी जोशी यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने  १९९० साली सन्मानित करण्यात आले आहे. 

- शशिकांत मांडके

जोशी, श्रीपाद रघुनाथ