Skip to main content
x

जोशी, श्याम लक्ष्मण

           शि.द.फडणीस, हरिश्चंद्र लचके, वसंत सरवटे, प्रभाकर ठोकळ यांच्या हास्यचित्रांनी मराठी हास्यचित्रकलेवर निश्चित ठसा उमटवला. या प्रभावाने हास्यचित्रकारांची जी पुढची पिढी निर्माण झाली, त्यांत श्याम जोशी यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे. श्याम लक्ष्मण जोशी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला. त्यांचे बालपणही तिथेच गेले. पुढे शालेय शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूरच्या खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच चित्रकलेची गोडी असल्याने चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा ते सहजी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जवळपास संपूर्ण शालेय शिक्षण त्यांनी इतर मुलांच्या शिकवण्या घेऊन पूर्ण केले.

           पुढे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे ठरविले; पण त्या वेळच्या कौटुंबिक व सामाजिक परिस्थितीमुळे घरून खूप विरोध झाला. अखेरीस हास्यचित्रकार शि.द. फडणीस यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि अत्यंत कष्टातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

           जी.डी. आर्ट झाल्यावर त्यांनी विविध जाहिरात एजन्सीजमधून नोकरी केली व शेवटी हिंदुस्थान थॉम्प्सन या कंपनीत ते कला संचालक या पदापर्यंत पोहोचले. शेवटी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला.

           श्याम जोशी यांचे व्यक्तिमत्त्व तसे साधेच होते. पांढरा हाफ बुश शर्ट, काळ्या किंवा निळ्या रंगाची पँट, पायांत साध्या चपला, गोरा रंग आणि बेताची उंची. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सगळ्यांत मोठा गुण म्हणजे ते सदैव हसतमुख असत. किंचित बसक्या आवाजात ते तल्लख शेरेबाजी करत, कोट्या, विनोद करत आणि पाहता-पाहता गप्पांमध्ये विलक्षण रंगत आणत. अगदी दूरध्वनीवरून बोलतानासुद्धा त्यांच्या या हसर्‍या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होई. ते सहज कोपरखळ्या मारत आणि बेमालूम नकलाही करत. हा त्यांचा हसरा स्वभावच त्यांच्या हास्यचित्रांतून व्यक्त होई.

           आर्ट स्कूलचे शिक्षण पाठीशी असल्याने त्यांच्या रेखाटनांत विलक्षण सफाई असे. विषयही सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातले असत. उदाहरणार्थ, चोर-पोलीस, परीक्षा, महागाई, विविध सण, बँक व्यवहार, नोकरी, गर्दी, टंचाई, खेळ इत्यादी. पण त्यांच्या हास्यचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चित्रांतील पात्रे अधिक ठसठशीत आणि सोपी केली, जे खरेच खूप कठीण काम आहे. त्यांनी चेहर्‍यावरचे हावभाव मोठे डोळे दाखवून अधिक स्पष्ट व विनोदी केले आणि कॉम्पोेझिशनच्या दृष्टीने चित्रे अधिक उठावदार व प्रेक्षणीय केली. त्याचबरोबरीने त्यांनी वाचकांना ताजा विनोदही दिला. हा विनोद साकारताना त्यांनी प्रसंगी त्याला संवादाचे स्वरूप दिले. काही वेळेस शाब्दिक विनोदांचा आधार घेतला. परंतु प्रत्येक वेळेस वाचकाच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटेल याची त्यांनी काळजी घेतली. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विनोदातला सुसंस्कृतपणा जपला.

           सुरुवातीच्या काळात अनंत अंतरकर, विजय तेंडुलकर इत्यादी संपादकांनी त्यांना हास्यचित्रकलेच्या दृष्टीने मोलाच्या सूचना केल्या व चित्रे प्रसिद्ध करून प्रोत्साहनही दिले. त्यातूनच त्यांची विशिष्ट शैली व वाचकवर्ग तयार झाला.

           सुरुवातीला साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यांतून त्यांनी हजारो चित्रे काढली. पण १९७७ नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये श्याम जोशी यांनी ‘कांदेपोहे’ हे साप्ताहिक सदर सुरू केले आणि त्यांच्या प्रतिभेचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला येऊ लागला. दर आठवड्याला चालू घडामोडींवर पाच-सहा चित्रे त्यात असत. सुबक रेखाटन आणि खुसखुशीत मराठी विनोद यांमुळे या सदराची लोकप्रियता वाढली.

           आणीबाणीनंतरच्या कालखंडातील त्यांची चित्रे विलक्षण बोलकी होती. उदाहरणार्थ, आणीबाणीत नसबंदी अत्याचारामुळे बदनाम झालेल्या काँग्रेसमधील ‘चांडाळचौकडी’मुळे काँग्रेसचा पराभव झाला असे आरोप होत होते. या घटनेवरचे श्याम जोशी यांचे भाष्य होते, ‘चौकडीने त्रिकोणाचे वाटोळे केले’ व चित्र होते चौकोन अधिक त्रिकोण बरोबर गोल! (त्या वेळी ‘उलटा लाल त्रिकोण’ हे कुटुंब नियोजनाचे चिन्ह होते!)

           अशा राजकीय भाष्यांबरोबरच सामाजिक भाष्य असणारी त्यांची चित्रेही खूप गाजली. उदाहरणार्थ, ‘टेस्ट ट्यूब बेबी’ प्रयोगाला वर्षपूर्ती झाली या बातमीवर त्यांचे चित्र बोलके होते. एकीकडे उत्तुंग वैज्ञानिक प्रगती, तर दुसरीकडे सामाजिक दारिद्य्र, इतके की गरिबांना राहायला घरेही नाहीत. ही विसंगती टिपताना त्यांनी रस्त्याच्या बाजूला एखाद्या न वापरलेल्या मोठ्या पाइपमध्ये वर्षानुवर्षे राहणारी कुटुंबे आपण पाहतो, त्यांतलेच एक कुटुंब दाखवले आणि त्यातल्याच एका झोळीसदृश पाळण्यातल्या बालिकेला तिची आई म्हणतेय, ‘‘टेस्ट ट्यूब बेबी वर्षाची झाली, कळलं का पाइप बेबी?’’

           ‘कांदेपोहे’मधल्या अशा असंख्य चित्रांमधील निवडक चित्रांचा संग्रह त्याच नावाने निघाला व त्याला शासनाचा पुरस्कारही मिळाला. त्याशिवाय त्यांनी ‘श्याम भटाची तट्टाणी’, ‘हसोबा’, ‘रंगून जा’, ‘हास्यचित्र कसे काढावे’ इत्यादी पुस्तकेही काढली. त्यांनी हास्यचित्रांची प्रदर्शने भरवली. साहित्य संमेलनात ‘हास्यचित्रांचे दुकान’ सुरू केले. यात दहा रुपयांमध्ये समोरच्या व्यक्तीचे ते दहा मिनिटांत अर्कचित्र (कॅरिकेचर) करून देत असत. 

           याशिवाय त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी पेंटिंग्ज केली. आल्हाददायक निसर्ग, नेत्रसुखद रंगसंगती व उत्तम मांडणी यांमुळे त्यांच्या पेंटिंग्जना प्रचंड मागणी होती. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत त्यांनी अशी प्रदर्शने भरवली. जे.आर.डी. टाटा यांची वेगवेगळ्या मूड्समधली   पोर्ट्रेट असोत वा मुंबईतल्या जुन्या इमारतींचे कलात्मक चित्रण असो, श्याम जोशी यांनी अत्यंत आत्मीयतेने त्यांचे चित्रण केले. किंचित विक्षिप्त किंवा विनोदी स्वभावामुळे असेल, काही पेंटिंग्जच्या प्रदर्शनांची उद्घाटने त्यांनी सामान्य रसिक, बसवाहक इत्यादींच्या हस्ते करून अनेकांना धक्का दिला होता.

           आयुष्याच्या अखेरीस त्यांना ‘ट्यूमर’ने गाठले. इस्पितळात शस्त्रक्रियेसाठी नेत असताना त्यांनी नेहमीच्या विनोदी पद्धतीने डॉक्टरांना सांगितले, ‘‘तुम्ही माझा ‘ट्यूमर’ काढू शकाल; पण ‘ह्यूमर’ नाही!’’ खरोखरीच श्याम जोशी हे एक वेगळेच रसायन होते!

           - प्रशांत कुलकर्णी

जोशी, श्याम लक्ष्मण