जयदास, महाराज
जयदास महाराज ऊर्फ जैतुनबी यांचा जन्म माळेगाव येथील मकबूलभाई सय्यद या गवंडीकाम करणाऱ्या सत्शील माणसाच्या घरात झाला. वडिलांचे गवंडी व्यवसायातील मित्र गोविंदभाऊ हे पंढरीचे निष्ठावान वारकरी होते व ते गावोगावी उत्सवात कीर्तने करीत. दोघा मित्रांची कुटुंबे एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देणारी होती. कीर्तनकार गोविंदभाऊ यांना सर्व लोक गुण्याबुवा म्हणत. ते काम करताना सदैव ‘जय जय रामकृष्णहरी’ हा जयघोष करीत. त्यांच्या सोबत काम करणार्यांनाही त्यांनी ‘रामकृष्णहरी’चा छंद लावला. अशा वातावरणात छोट्या जैतुनबीवर वारकरी संस्कार झाले आणि आवड म्हणून ती गुण्याबुवासमवेत वारकरी भजन-कीर्तनात रंगून गेली. दरम्यान तिची भेट संत हनुमानदास यांच्याशी झाली. त्यांना गुरू मानून तिने वारकरी विचारांची-मानवधर्माची पताका खांद्यावर घेतली.
जैतुनबीच्या या कृतीचा मुल्ला-मौलवींनी विरोध केला व त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, तसेच काही कर्मठ परंपरावादी हिंदूंनीही जैतुनबीला विनाकारण त्रास दिला; पण या त्रासाला न जुमानता जैतुनबी आपल्या अंतरात्म्याच्या प्रकाशात ‘ईश्वर-अल्ला एक आहे’ या बोधाने पंढरीची वारी दरवर्षी न चुकता करीत राहिल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासमवेत जैतुनबी यांनी सलग ६२ वर्षे पंढरीची वारी केली. वाटेत त्या जागोजागी कीर्तन करीत. त्यांच्या कीर्तनाला भाविकांची मोठी गर्दी जमत असे. आळंदी-पंढरपूरला जाणाऱ्या त्यांच्या दिंडीत २५० ते ५०० वारकरी भाविक असत. जैतुनबी यांनी पंढरपूर व आळंदी येथे मठ बांधलेले आहेत. त्या मठातच वारीमध्ये जैतुनबीची कीर्तने होत असत.
जैतुनबी यांनी लग्न केले नव्हते, ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारले होते व पंढरीची वारी, वारकरी मानवतावादी विचारधारेचा प्रसार-प्रचार हाच त्यांनी प्रपंच मांडला होता. त्यांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले होते. त्यांनी १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातही भाग घेतला होता. प्रभातफेऱ्यांत देशभक्तिपर गीते म्हणण्यात बाल स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्या पुढे असत. उरळीकांचन येथील निसर्गोपचार केंद्रात महात्मा गांधींचा मुक्काम असताना त्यांना जैतुनबी यांनी काही पोवाडेही ऐकवले होते. एवढेच नव्हे, तर भाई बागलसुद्धा आपल्या सभेतही जैतुनबीचा पोवाडा ऐकून ते खूष झाले. त्यांनी जैतुनबीला ‘प्रतिसरकार’चे प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याकडे पाठविले. नाना पाटलांच्याही अनेक सभांमध्ये जैतुनबी यांना पोवाडे गाण्याचे भाग्य लाभले.
जैतुनबींचे कीर्तन हा मानवधर्माचा प्रचार असे. सत्य, प्रामाणिकपणा, परस्पर सौहार्द, सामाजिक एकता, सामाजिक सलोखा या विषयांवर त्या संत वचनांच्या आधारे खूप सोप्या शब्दांत उपदेश करीत. कीर्तनाच्या बिदागीतून मिळालेल्या पैशांतूनच त्यांनी आळंदी-पंढरपुरात मठ बांधण्याबरोबरच अनेक सामाजिक कार्ये केली. जैतुनबींना श्वासोच्छवास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार सुरू असतानाच प्रात:काळी त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.