Skip to main content
x

ज्युलिओ, फ्रान्सिस रिबेरो

         ज्युलिओ रिबेरो यांचे घराणे मूळ गोव्यातले. त्यांचे पूर्वज हिंदू होते. १६ व्या शतकात पोर्तुगिजांनी त्यांचे धर्मांतर करविले. त्यांच्या पूर्वजांचा शिक्षणक्षेत्राशी जवळचा संबंध होता. त्यांच्या समाजात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा मान पहिल्यांदा त्यांच्या आजोबांनी मिळविला. त्यांच्या वडिलांनीही मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात शिक्षण घेतले होते. अशा कुटुंबात रिबेरो यांचा जन्म  झाला. मुळात त्यांना पोलिस सेवेमध्ये जाण्याची फारशी इच्छा नव्हती. त्यांनी केंद्रीय सेवेसाठी स्पर्धात्मक परीक्षा दिली होती. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांना दुसरा पर्याय दिला नाही . त्यावेळचे नियमच असे होते की ज्या उमेदवाराची निवड पोलिस सेवेसाठी झाली आहे त्याला दुसऱ्या केंद्रीय सेवेत जाण्याची मुभा नव्हती. ऑक्टोबर १९७३ मध्ये प्रशिक्षणासाठी माऊंटअबूला जावे असा संदेश रिबेरोंना मिळाला व त्यानुसार पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या सुप्रसिद्ध संस्थेत ते दाखल झाले. १९५४ च्या नाताळपर्यंत त्यांनी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. प्रत्यक्ष कामाची सवय व्हावी म्हणून  एखाद्या जिल्ह्यात ६ महिने काम करावे लागे. त्यानुसार सध्या गुजरात राज्यात असणाऱ्या भडोच येथे रिबेरो यांना अतिरिक्त सहाय्यक पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.

प्रशिक्षण संपल्यावर त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजची जबाबदारी सोपविण्यात आली. पण चार महिन्यानंतर पश्‍चिम विभागाची सूत्रे हाती घेण्यासाठी त्यांची नाशिकला नेमणूक झाली. या नेमणूकीच्या काळात १९५६ साली त्यांना प्रथमच दंगल काळातील स्थिती हाताळण्याचा अनुभव मिळाला. जून १९५८ मध्ये रिबेरो यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली. तेथे असतानाच एप्रिल १९५९ मध्ये त्यांचा विवाह झाला. नंतर नोव्हेंबर १९५९ मध्ये त्यांचेवर शेजारच्या नांदेड जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. अडीच वर्षे नांदेड, नंतर दोन वर्षे सोलापूर अशी सेवा झाल्यानंतर प्रथमच पोलिस अधिक्षक म्हणून शहरी भागात काम करण्यासाठी रिबेरो हे पुण्यात दाखल झाले. सुमारे १५ वर्षे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी काम केल्यानंतर १९६८ साली त्यांची मुंबईला नेमणूक झाली. पुणे येथील नेमणूकीच्या काळात रिबेरो यांचा भारतीय सेनेशी निरनिराळ्या कारणांनी जवळून संबंध आला. पुण्याचे पोलिस अधिक्षक म्हणून वर्षभराचे काम केल्यानंतर शहरातील पोलिस यंत्रणेचा दर्जा वाढून तो आयुक्तालय श्रेणीचा करण्याचा प्रस्ताव देण्यासाठी त्यांना पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले. पुढे हा प्रस्ताव स्वीकारण्यात येऊन १ जून १९६५ रोजी पुण्याचे पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले. ऑक्टोबर १९६८ मध्ये अखिल भारतीय संमेलन झाले. त्यावेळी शिबिराचे आयोजन करण्याची जबाबदारी रिबेरो यांचेकडे सोपविण्यात आली होती. ते संमेलन झाल्यानंतर त्यांना मुंबईतील आपल्या नव्या पदावर रूजू होता आले.

मुंबईत ४ वर्षे काम केल्यानंतर रिबेरो यांची हैद्राबाद येथे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून नेमणूक झाली. केंद्रीय राखीव पोलिस दलात २ वर्षे काम केल्यानंतर ते १९८२ मध्ये पुन्हा मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झाले. मुंबईतील नेमणूकींच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना राजकीय पक्ष व कामगार नेते यांच्याशी कठोरपणे वागणेही भाग पडले. त्याचप्रमाणे टोळीयुद्धाचाही बंदोबस्त त्यांना करावा लागला. महिलांसाठी त्यांनी स्वतंत्र कक्ष उभारला. कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांमध्ये पसरणाऱ्या अंमली पदार्थांच्या व्यसनालाही आळा घातला. १९८५ मध्ये त्यांनी मुंबईतील पदाची सूत्रे खाली ठेवली.

नंतर केंद्रीय राखीव पोलिसदलाचे महासंचालक म्हणून रिबेरो यांची नियुक्ती झाली. तथापि थोड्याच दिवसात दंगलग्रस्त गुजरातचे पोलिस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली.

त्यानंतर रिबेरो यांचेकडे दहशतवादग्रस्त पंजाबचे पोलीस महासंचालक म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. तेथे सुवर्णमंदिर मुक्त करून शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या ताब्यात देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या कारवाईची देशभरातील वृत्तपत्रातून प्रशंसा झाली. मात्र त्यामुळे रिबेरो यांचेवर प्राणघातक हल्ला झाला होता व त्यांच्या पत्नीही गोळी लागून जखमी झाल्या होत्या. त्यानंतर पंजाबमध्येच त्यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र ६० वय पूर्ण झाल्यामुळे त्यांनी निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली.

याच काळात त्यांना ऑपरेशन ब्लॅक थंडरची पुनश्‍च सुवर्णमंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड करण्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा अतिरेक्यांच्या शरणागतीचा कार्यक्रम जगभर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता.

निवृत्तीनंतर काही काळ रिबेरो यांचेकडे मिझोरामचे राज्यपालपद सोपविण्यात आले. त्यानंतर ४ वर्षांसाठी त्यांना रूमानिया येथे भारताचे राजदूत म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या देशातही १९९१ साली शीख अतिरेक्यांनी त्यांच्या हत्येचा एक प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना रूग्णालयात राहावे लागले होते. रूमानियाचे राजदूत म्हणून रिबेरो यांचेकडे अल्बानिया आणि मालोव्हॉ या देशांचीही जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर मात्र ते नवीन कामगिरी न स्वीकारता मुंबईत स्थायीक झाले.

- सविता भावे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].