Skip to main content
x

झा, वशिष्ठ नारायण

     प्रा. वसिष्ठ नारायण झा यांना पूर्ण संस्कृत विश्व आज ओळखते ते एक नैयायिक म्हणून. परंतु त्यांच्या विद्यार्थिदशेत त्यांच्या विशेष आवडीचे विषय होते व्याकरण आणि भाषाशास्त्र. म्हणूनच वैदिक व्याकरणात संशोधन करण्यासाठी प्रा.झा १९६८ मध्ये पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात दाखल झाले.

     प्रबंधाचे अंतिम रूप सिद्ध झाल्यावर प्रा.वसिष्ठ नारायण झा पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये सुरू असलेल्या संस्कृत महाकोशाच्या प्रकल्पात उपसंपादक म्हणून रुजू झाले. तिथे विविध शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञांवर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्याच प्रकल्पात कार्यरत असलेल्या पं. श्रीनिवास शास्त्री आणि पं. शिवरामकृष्ण शास्त्री यांची मदत ते घेत असत. या दोन ऋषितुल्य विद्वानांकडून  प्रा. वसिष्ठ नारायण झा यांनी न्याय आणि मीमांसाशास्त्राचे ज्ञान मिळवले. प्रा. वसिष्ठ नारायण झा त्यांच्या या दोन गुरूंमुळे आणि विशेषत: पं. श्रीनिवास शास्त्रींकडे बरीच वर्षे केलेल्या न्यायाच्या अध्ययनामुळे न्याय म्हणजेच भारतीय तर्कशास्त्राच्या कठोर आणि नि:संदिग्ध तर्कसंगतीच्या जणू कायमचे प्रेमात पडले आणि आज संपूर्ण संस्कृत विश्व त्यांना एक नैयायिक, एक न्यायशास्त्रविद् म्हणूनच ओळखते.

     उत्तर बंगालमधील रायगंज येथे एका ब्राह्मण कुटुंबात प्रा.झा यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बद्रिनारायण झा आणि आईचे नाव आरतीदेवी. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण रायगंज येथेच झाले. शाळेत असताना पारंपरिक पद्धतीने संस्कृतचे अध्ययन करण्यासाठी ते मधुसूदन चतुष्पाठी पाठशाळेत जात. तेथे पं. सीताकांत आचार्य या गुरूंकडून त्यांनी ‘मुग्धबोध व्याकरण’ आत्मसात केले. त्यांच्या पाठशाळेतील गुरूंनीच त्यांना वेदतीर्थ, काव्यतीर्थ आणि व्याकरणतीर्थ या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले आणि त्यामुळे संस्कृतमध्ये बी.ए. पदवी मिळवतानाच प्रा.झा यांनी तिन्ही ‘तीर्थ’ पदव्याही मिळवल्या होत्या. १९६५ मध्ये बी.ए. झाल्यानंतर ‘वेद’ हा विशेष विषय घेऊन प्रा. झा बनारस हिंदू विद्यापीठातून एम.ए. झाले आणि त्यानंतर ‘भाषाशास्त्र’ या विषयात एम.ए. करण्यासाठी कलकत्ता विद्यापीठात दाखल झाले. काव्यतीर्थ, वेदतीर्थ, व्याकरणतीर्थ आणि हिंदी भाषेची राष्ट्रभाषारत्न एवढ्या सगळ्या पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या. दोन एम.ए. पदव्या घेतल्यानंतर संशोधनासाठी पुणे विद्यापीठात आलेल्या प्रा. झा यांचा  प्रबंध होता- ‘ऋग्वेद पदपाठाचे भाषाशास्त्रीय विश्लेषण’. हा अशा प्रकारचा सर्वप्रथम अभ्यास होता. त्यामुळे या प्रबंधाचे विशेष कौतुक झाले. त्यानंतर अभ्यासकांना अभ्यासाची एक नवी दिशा मिळाली आणि पुढे इतर वेद-संहितांच्या पदपाठांचेही अशा प्रकारचे विश्लेषण झाले. त्यापैकी काही प्रा. झा यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले, तर काही इतरही अशा प्रकारचे अध्ययन झाले.

     पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात संशोधन साहाय्यक म्हणून प्रा.झा १९७७ मध्ये आले. १९७९मध्ये ते प्रपाठक झाले आणि १९८६ मध्ये प्राध्यापक. केंद्राचे संचालक म्हणून १९८७ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून २००६ मध्ये निवृत्त होईपर्यंत अगदी अथकपणे त्यांनी जे महत्त्वाचे कार्य केले, ते म्हणजे बहु-आंतर विद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व सांगून त्याद्वारा संस्कृत अध्ययनाचे आजच्या काळातील माहात्म्य अधोरेखित करणे. केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी आयोजित केलेल्या पहिल्याच चर्चासत्राचा विषय होता : ‘आजच्या भारतात संस्कृतची सुसंगती’ (Relevance of Sanskrit in India Today). त्यानंतर लवकरच संस्कृतात संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक मोलाचा ग्रंथ प्रकाशित केला. ‘भारतीय विद्येतील संशोधनाची नवी क्षितिजे’ (New Horizons of Research in Indology). संपूर्ण जीवन संस्कृत विद्येच्या अभ्यासाला वाहिलेल्या तपस्वी विद्वानांनी या ग्रंथात लिहिलेल्या लेखांतून संस्कृत विद्याशाखांमध्ये कोणकोणते विषय आवर्जून अभ्यासले पाहिजेत, त्याचे ज्ञान नवीन संशोधकांना होते आहे. संशोधकांसाठी मदतीचा आणखी एक हात म्हणून प्रा. झा  यांनी संस्कृतच्या क्षेत्रात विविध विषयांत झालेल्या कामाच्या सूची प्रकाशित करण्यास सुरुवात केली. १९९४ ते २००० या सात वर्षांत संस्कृतातील एकूण दहा विषयांच्या अभ्यास-सूची केंद्राने प्रकाशित केल्या.

     पुणे विद्यापीठातील ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र’ हे संस्कृत आणि भारतीय विद्येच्या अभ्यासकांचे महत्त्वाचे अभ्यास केंद्र म्हणून अत्युच्च स्थानी असावे आणि केंद्राने संस्कृतचे आधुनिक काळातील महत्त्व विशद करून इतर संस्कृत संस्थांना मार्गदर्शन करावे ही केंद्राचे संचालक म्हणून प्रा. झा यांची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी राबवलेले काही महत्त्वाचे उपक्रम म्हणजे :

१. विविध बहुविद्याशाखीय विषयांवर चर्चासत्रे आयोजणे. अर्थातच यामुळे विविध विद्याशाखांचे विद्वान केंद्रामध्ये येत.

२. भारतभरातील विद्यापीठांतील आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांसाठी आंतर विद्याशाखीय विषयांचे पुनश्चर्या पाठ्यक्रम चालवणे. यामुळे  आधुनिक काळातील संस्कृतचे महत्त्व पुन: पुन्हा अधोरेखित झाले.

३. महत्त्वाच्या विविध विषयांवर प्रसिद्ध विद्वानांची व्याख्याने आयोजणे. नवीन संशोधकांना आणि विद्यार्थ्यांना याचा विशेषत्वाने लाभ झाला.

     या सर्व उपक्रमांमुळे ‘संस्कृतचा बालेकिल्ला’ ही केंद्राची ओळख अधिक विस्तृत होऊन ते विविध विषयांवरील चर्चेचे एक मैत्रीपूर्ण व्यासपीठ बनले. प्रा. झा यांनी आयोजलेल्या सर्व चर्चासत्रांत वाचले गेलेले निबंध त्यांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहेत, तसेच विद्वानांनी दिलेली व्याख्यानेही प्रसिद्ध केली आहेत. हे खरे असले, तरी हे उपक्रम तसे नैमित्तिकच. केंद्रात बहुविद्याशाखीय अध्ययन आणि अध्यापन याहूनही अधिक सातत्याने चालावे म्हणून प्रा. झा यांनी ‘हस्तलिखितशास्त्रा’चे दोन अभ्यासक्रम १९९१मध्ये सुरू केले, तर १९९८मध्ये त्यांनी आणखी चार अभ्यासक्रम केंद्रात सुरू केले, ते म्हणजे भारतीय तर्कशास्त्र आणि प्रमाणशास्त्र याविषयात पदविका (१ वर्ष) आणि पदवी (२ वर्षे), तसेच संस्कृत भाषाशास्त्रात पदविका (१ वर्ष) आणि पदवी (२ वर्षे).

     प्राचीन भारतीय तर्कशास्त्र आणि प्रमाणशास्त्र याबरोबरच पाश्चात्त्य तर्कशास्त्र आणि प्रमाणशास्त्राचे अध्ययन करता यावे म्हणून पहिले दोन अभ्यासक्रम विविध तज्ज्ञांच्या मदतीने तयार केले होते, तर संस्कृतातील पारंपरिक भाषाशास्त्र आणि आधुनिक भाषाशास्त्र यांच्या अध्ययनाची सोय इतर दोन अभ्यासक्रमामध्ये आहे.

     प्रा.झा यांना वेद, व्याकरण, भाषाशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय तर्कशास्त्र, हस्तलिखितशास्त्र, संशोधन पद्धती तसेच आधुनिक काळातील इ-संस्कृत, इ-शास्त्र इत्यादी विविध विषयांमध्ये रुची आहे. या विषयांवर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि संपादित केले आहेत. जिज्ञासूंना प्रा.झा यांच्या सन्मानार्थ लिहिलेल्या ‘न्याय-वसिष्ठ’ या ग्रंथामध्ये याविषयीची अधिक माहिती मिळेल. या वर उल्लेखिलेल्या सर्व विषयांवर भारतातील विविध विद्यापीठांमध्ये प्रा.झा यांनी शेकडो भाषणे, व्याख्याने दिली आहेत. खरे म्हणजे ‘सर्वोत्तम शिक्षक’ किंवा ‘गुरूंचे गुरू’ हीच प्रा. झा यांची  खरी ओळख आहे. उत्तम शिक्षक अनेक असतील, पण ‘सर्वोत्तम’ म्हणण्यासारखे फारच थोडे!

     भारताबाहेरही जपानमधील नागोया विद्यापीठात नव्यन्याय (म्हणजे भारतीय तर्कशास्त्र) या त्यांच्या सर्वाधिक प्रिय विषयाचे अध्यापन त्यांनी अनेकदा केले. या भेटींमध्ये तोक्यो विद्यापीठात, क्योतो येथील ओतानि विद्यापीठांतही त्यांनी व्याख्याने दिली. याशिवाय जर्मनीतील हुम्बोल्ट विद्यापीठ, स्वित्झर्लंडमधील लुझान विद्यापीठ तसेच मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्था या ठिकाणीही ‘भारतीय तर्कशास्त्र’ शिकवण्यासाठी प्रा. झा यांनी  वास्तव्य केले.

     नव्यन्यायाचे ज्ञान भारतात सर्वदूर पसरावे, या उद्देशाने प्रा. झा यांनी  तीन पातळ्यांवरील सारगर्भ व सखोल असे अभ्यासक्रम स्वत: तयार केले आहेत. त्यांनी २००० साली कालडी येथील श्री शंकराचार्य विद्यापीठात या अभ्यासक्रमांचे सर्वप्रथम अध्यापन केले. त्यानंतर जम्मूपासून केरळपर्यंत आणि कलकत्त्यापासून बडोद्यापर्यंत विविध विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये प्रा.झा या अभ्यासक्रमांचे अध्यापन अविरतपणे करीत आहेत. २००६ मध्ये निवृत्त झाल्यापासून तर या अध्यापनाला अधिकच गती मिळाली आहे. या सर्व अभ्यासक्रमांमध्ये ‘संस्कृतचे ज्ञान’ अत्यावश्यक नाही असे असूनही ‘संस्कृत शिकण्याची ओढ लागणे’ हाही या अभ्यासक्रमांचा एक दृश्य परिणाम. ज्यांना ही तीव्र इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेचा पाच पातळ्यांवरील अभ्यासक्रम तयार करण्याचे काम प्रा. झा यांनी  सध्या हाती घेतले आहे. जून २०१४ मध्ये केरळमधील वेलियनाड येथे चिन्मय मिशनच्या आश्रमात या अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचा आरंभ झाला. हे आदिशंकराचार्यांचे जन्मस्थान होय. भारतभर परिक्रमा करून वेदान्ताच्या ज्ञानाचा प्रसार करणार्‍या सातव्या शतकातील विभूती आदिशंकराचार्यांच्या पवित्र स्थानापासून प्रा. झा यांच्या  सर्व अभ्यासक्रमांच्या अध्यापनाची सुरुवात व्हावी, हा एक विलक्षण योगायोगाच म्हणायचा. ‘गुरूंकडून मिळवलेल्या ज्ञानाचे पुढील पिढीला दान केल्यानेच ऋषिऋणातून थोडेफार मुक्त होणे शक्य आहे’ अशी प्रा.झा यांची  श्रद्धा आहे.

     प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलनाने २००२मध्ये प्रा.झा यांना ‘संस्कृत महामहोपाध्याय’ ही उपाधी देऊन गौरवले, तर २००७मध्ये तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘वाचस्पती’ पदवी दिली. राजमुंड्री येथील मॉरिस स्टेला कॉलेजने त्यांना २००८मध्ये ‘पंडित सार्वभौम’ ही उपाधी दिली. २०१२मध्ये राष्ट्रीय संस्कृत संस्थानने डी.लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.                                                                                        

उज्ज्वला झा

झा, वशिष्ठ नारायण