Skip to main content
x

काळे, शिवाजी महादेव

     शिवाजी महादेव काळे यांचा जन्म जुन्नर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण  जुन्नर तालुक्यातील आमरापूर येथील प्राथमिक शाळेत झाले. नंतर त्यांनी घरच्या शेतीच्या व्यवसायात लक्ष घातले. त्यांना कुस्ती खेळण्याची व दांडपट्टा चालवण्याची हौस होती. काळे यांनी वयाच्या 20 व्या वर्षी आदिवासी भागात सामाजिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी लोकांच्या जमिनी मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांच्या या समाजकार्यामुळे ते जुन्नर तालुक्यात दादासाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले.

     सामाजिक कार्यासाठी राजकारणाची जोड लागते, हे लक्षात घेऊन काळे यांनी समाजवादी पक्षातून आमदार पदासाठी दोन वेळा निवडणूक लढवली. ते 1957 मध्ये निवडून आले. त्यांना एस. एम. जोशी, जयप्रकाश नारायण, प्र. के. अत्रे यांसारख्या दिग्गजांचा सहवास लाभला.

     काळे यांनी 1961 मध्ये जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. त्यांना बाळासाहेब देसाई व यशवंतराव चव्हाण यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रात पहिला टोमॅटो बाजार जुन्नर येथेच काळे यांच्या सहकार्याने उभा राहिला. जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापनाही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच झाली.

     काळे यांनी 1970 मध्ये डॉ. आबासाहेब पारीख यांच्या सहकार्याने जुन्नर-शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या अंतर्गत त्यांनी शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी 1950 च्या आसपास अण्णासाहेब आवटे विद्यालयाची स्थापना करून जुन्नर तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांनी जुन्नर सहकारी प्रेसची स्थापना करण्यातही पुढाकार घेतला. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकपद सलग 53 वर्षे सांभाळले. त्यांनी 2005 पर्यंत सदर बँकेचे अध्यक्षपदही भूषविले. त्यांनी जुन्नर तालुक्यातील सहकारी पतपेढ्यांची निर्मिती करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना कर्ज आणि आर्थिक मदत मिळू लागली.

     काळे यांचा 1962-1963 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था/पंचायत राज्य निर्मितीचा कायदा करण्यातही सहभाग होता. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. सदर परिषदेचे प्रथम उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली होती. आरोग्य शिक्षण समितीचे अध्यक्ष या नात्यानेही त्यांनी काम पाहिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालकपद 5 वर्षे सांभाळले. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच त्यांची पुणे जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती झाली होती. त्यांनी पुणे जिल्हा शेतकी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.

     काळे यांनी जुन्नर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक निवृत्तिशेठ शेरकर यांना भाग भांडवल पुरवठा करून कारखान्याच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. जुन्नर तालुका देखरेख सोसायटीच्या संघटना उभारणीचे श्रेय काळे यांनाच द्यावे लागते.

     काळे यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना सातकर पुरस्कार देऊन सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामाचा गौरव गेला. वयाच्या 75 निमित्ताने त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना सहकार महर्षी ही उपाधीही देण्यात आली. काळे यांच्या सहकार क्षेत्रातील यशामागे त्यांची पत्नी पार्वतीबाई यांची साथ होती. त्यांना संजय, प्रकाश, अरुण असे तीन सुपुत्र असून मालती व विनिता या दोन कन्या आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव संजय समर्थपणे सांभाळत आहेत.

- संपादित

काळे, शिवाजी महादेव