काळे, श्यामकांत पंढरीनाथ
श्यामकांत पंढरीनाथ काळे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील सोलापूर येथील हरिभाई देवकरण शाळेत शिक्षक होते. त्यामुळे काळे यांचे शालेय शिक्षण सोलापूर येथे झाले. ते १९५१मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी १९५४ साली पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५८मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. काळे हे त्या वर्षी वालचंद हिराचंद पारितोषिकाचे मानकरी ठरले. हे पारितोषिक अंतिम वर्षात कृषीविद्या व कृषी-रसायनशास्त्र विषयांत सर्वाधिक गुण प्राप्त करणार्यास देण्यात येते. कृषी महाविद्यालयात त्यांना बी.जी.जोशी गुणवत्ता शिष्यवृत्तीही मिळाली होती.
काळे यांची नेमणूक सोलापूर येथील मृदा-विशेषज्ञ कार्यालयात कृषी पर्यवेक्षक पदावर झाली. त्यांनी या कालावधीत मृदा सर्वेक्षण विभागात काम करताना महाराष्ट्रभर फिरून अनुभव घेतला. या कामाचा त्यांना पुढील वाटचालीत फार उपयोग झाला. त्यांना १९६१मध्ये कृषी -रसायनशास्त्र या विषयात एम.एस्सी. करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्यांना नागपूर येथे कृषी महाविद्यालयात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांनी १९६३मध्ये एम.एस्सी. ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. त्या वर्षी त्यांची कृषी अधिकारी पदावर बढती होऊन धुळे येथे बीजगुणन केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा त्यांनी या केंद्राचे व्यवस्थापन पाहिले. त्यांची १९६४मध्ये अकोला येथील कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी त्या पदावर १९६९पर्यंत काम केले. काळे यांना सार्वजनिक कामाची आवड असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या संबंधात व्यवस्थापनाचे काम केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अशी दोन कृषी विद्यापीठे निर्माण झाल्यामुळे १९६९मध्ये काळे यांची दापोलीतील कृषी महाविद्यालय येथे बदली झाली. त्यांची डिसेंबर १९७०मध्ये पदोन्नती होऊन सोलापूर येथील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पामध्ये मृदा-पदार्थविज्ञानवेत्ता म्हणून ते काम पाहू लागले. त्यानंतर त्यांनी संशोधनात्मक कार्यात लक्षणीय यश मिळवले. येथे त्यांना सहकारी म्हणून डॉ. ना.कृ.उमराणी लाभले. या दोघांनी मिळून पिकांच्या ओलावा वापरण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास करून प्रथमच कोरडवाहू शेतपिके ओलावा कोणत्या अवस्थेत कसा व किती वापरतात याचे आराखडे तयार केले. त्यावरूनच रब्बी ज्वारी व करडई अशी मिश्रपीक पद्धती अयोग्य असल्याचे दाखवून दिले. तेव्हा ज्वारी व करडई ही पिके अवर्षणप्रवण भागात स्वतंत्रपणे घ्यावीत ही शिफारस प्रथमच करण्यात आली.
मंद्रूप (ता.द.सोलापूर) येथे १९७०मध्ये एकात्मिक कोरडवाहू शेती प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतावर कार्यान्वित झाला होता. या प्रकल्पात सघन पीक पद्धतींच्या शिफारशीबरोबरच पीक नियोजन एक महत्त्वाचा भाग होता. जमिनीच्या उपयोग क्षमतेनुसार पीक पद्धत राबवण्यासाठी प्रकल्पातील प्रत्येक खातेदाराच्या जमिनीची शास्त्रीय माहिती एकत्र करून पीक नियोजनाचे आराखडे बनवण्यात काळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या कामी त्यांना प्रकल्प अधिकारी एन.डी.जमदग्नी व डॉ.उमराणी यांचे साहाय्य मिळाले. काळे यांनी १९७२च्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीत ‘कोरडवाहू भागातील जमिनीची जलधारण क्षमता’ याबद्दल शास्त्रीय अभ्यास आधुनिक तंत्राद्वारे करून ओलावा का व कसा कमी होतो, याचा आलेख प्रथमच उपलब्ध करून दिला. त्यासाठी त्यांनी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तील उपकरणांचा उपयोग केला. त्यांनी १९७५-७६ या एका वर्षाच्या कालावधीत पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषि-रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून काम केेले. ते १९७६मध्ये सोलापूर येथे परत मृदा-पदार्थविज्ञानवेत्ता म्हणून काम पाहू लागले. ‘जमिनीच्या उपयोग क्षमतेनुसार पीक नियोजन’ हा त्यांचा आवडीचा विषय आहे. त्यांनी पीक नियोजन कसे असावे, या संबंधात मार्गदर्शन केले. त्यांना १९७८ ते १९८२ या कालावधीत दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान इथे पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळाली. श्यामकांत काळे यांनी १९८२ ते ८७ या काळात धुळे येथील कृषी महाविद्यालयात कृषी-रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. ते पुढे १९८७मध्ये परत सोलापूर येथे मृदा-विशेषज्ञ व सहयोगी संशोधन संचालक पदावर काम करू लागले. या कालावधीत त्यांनी ‘पेरणीयोग्य पाऊस व त्याचे अंदाज’ यावर डॉ.सी.बी.पाटील यांच्याबरोबर काम करून अवर्षणप्रवण भागातील महत्त्वाच्या ठिकाणांसाठी पर्जन्यमानाची आकडेवारी प्रसिद्ध केली. या माहितीचा उपयोग पीक पेरणी केव्हा करावी, हे ठरवण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी वर्गाला कामाची आखणी करता येते. याच कालावधीत त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पीक नियोजनासंबंधी अहवाल तयार केला. भारताच्या नियोजन मंडळाने या अहवालाची दखल घेऊन डॉ. श्यामकांत काळे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले. असे नियोजन करताना त्याचे मूल्यमापन कसे करता येईल, यासंबंधीचे त्यांचे विचार आयोगाने जाणून घेतले. काही कारणास्तव हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.
डॉ.काळे यांनी १९९२मध्ये राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी-रसायनशास्त्र या विषयाचे प्रमुख म्हणून कार्य केले. ते १९९३मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन सोलापूर येथे स्वतःची शेती व इतरांना मार्गदर्शन करू लागले. निवृत्तीनंतर सुमारे दीड वर्ष त्यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत आदर्श गाव योजनेत विभागीय समन्वयक म्हणून कार्य केले. डॉ.काळे यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने सोलापूर येथील कुष्ठरोग निवारण केंद्रात सल्लागार म्हणून ते कार्य करत होते. तसेच पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या कार्यकारिणी सभेचे सदस्य म्हणून त्यांनी पाच वर्षे सोलापूर येथील शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकाळात ५० शास्त्रीय लेख, १५०हून जास्त मराठी शास्त्रीय लेख लिहिले व ३५ परिसंवादांमध्ये लेख सादर केले आहेत.