Skip to main content
x

काळे, वसंत रंगनाथ

         संत रंगनाथ काळे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथेच झाले. त्यानंतर १९४८मध्ये त्यांनी पुणे, कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.(कृषी)ची पदवी संपादन केली आणि १९५८मध्ये एम.एस्सी. (कृषी)ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९६२मध्ये त्यांनी नवी दिल्ली येथून वनस्पती-शरीरक्रियाशास्त्र या विषयात पीएच.डी पदवी संपादन केली. याशिवाय चित्रकलेतील इंटरमिजिएट, हिंदी प्रवीण परीक्षा, कृषी खात्याची अकाऊंटंटची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्यांनी १९४८ ते १९६८ या काळात महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्यामध्ये नोकरी केली. तसेच १९६८ ते १९८५ या काळात त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी केली. काळे यांनी १० वर्षे कृषी अधिकारी, ९ वर्षे वनस्पतिशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक, ३ वर्षे वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक, ३ वर्षे म.फु.कृ.वि.तील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख, ११ वर्षे सहयोगी अधिष्ठाता, एक वर्ष म.फु.कृ.वि.तील संशोधन विभागाचे संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे मानद प्रोफेसर प्लँट फिजिओलॉजी या पदावर ५ वर्षे संशोधन कार्य केले. त्यांना अध्यापनाचा व संशोधनाचा एकूण ३० वर्षे अनुभव होता. तसेच प्रशासन व व्यवस्थापनाचा १२ वर्षांचा अनुभव होता.

         डॉ.काळे यांनी स्वतःचे एम.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करताना वरखतांच्या मात्रांचा चार्‍याच्या गवतावर पोषण आहार दृष्टीने होणारा परिणाम याबाबत अभ्यास केला. त्यांनी पीएच.डी. करत असताना नवी दिल्ली येथे गव्हाच्या चार वाणांची क्षारांसाठी असलेली सहनशीलता व पिकांच्या विविध गुणधर्मांवर त्याचा होणारा परिणाम अभ्यासला. त्याच्या निष्कर्षांचा उपयोग गहू उत्पादनवाढीसाठी करून घेता येतो. तसेच लाख, वांगे आणि भात यांच्या विविध वाणांची रोगप्रतिकार क्षमताही ४ वर्षे त्यांनी तपासली. रायझोबियाच्या कार्यक्षम प्रजाती शोधण्यासाठी नत्र वरखतांचा शेंगवर्गीय पिकांवर होणारा परिणाम अभ्यासला. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध पिकांची वाढ व उत्पादन यांचे पृथक्करण, ओलाव्याच्या ताणास व क्षारास असलेली सहनशीलता, बियाणातील सुप्तता इ. बाबींचा अभ्यास केला. २८ एम.एस्सी. व २ पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तणनाशकांचा पिकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. पिकांच्या वाढीचे नियमन करणाऱ्या संप्रेरकांचा पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. उसाचे उत्पादन व साखर उत्पादनवाढीसाठी सायटोकायनिन, ट्रायकाँटेनॉल, ग्लायफोसिन इथिलिन (तुरा येण्यास प्रतिबंध) ही संप्रेरके उपयुक्त आहेत, असे त्यांच्या अभ्यासातून आढळून आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संशोधन सिंहावलोकन समितीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प’ तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या कार्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधील ऊस लागवड क्षेत्राची पाहणी करून, अभ्यासून या भागात साखर कारखाने सुरू करण्याविषयीच्या शक्यतांचे तांत्रिक अहवाल तयार केले. त्यांना कृषी व इतर क्षेत्रांतील कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरवले. नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर प्लँट फिजिओलॉजी या संस्थेचे ते आजीव सदस्य होते.

         - संपादित

काळे, वसंत रंगनाथ