Skip to main content
x

काणे, गोविंद पांडुरंग

       विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची महाविद्यालयातील शिक्षणाशी योग्य सांगड घालून खऱ्या अर्थाने ते जनताभिमुख करणाऱ्यांमध्ये डॉ.गोविंद पांडुरंग काणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

       डॉ.काणे यांचा जन्म कोकणातील दापोली या गावी झाला. या गावाचे वैशिष्ट्य असे की, या गावातले दोघेजण ‘भारतरत्न’ म्हणून सन्मानित झाले. महर्षी धोंडो केशव कर्वे आणि महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे हे दोघेही दापोलीचे. डॉ.गोविंद काणे हे महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे पुत्र होत.

      त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या विल्सन शाळेत, तर बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (सध्याची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि सेंट झेवियर्स महाविद्यालय येथे झाले. एम.एस्सी.साठी मात्र ते बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे गेले. भारतातील विज्ञानाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रमण त्या वेळी त्या इन्स्टिट्यूटचे संचालक होते. नंतर काणे यांनी इंग्लंडच्या इंपीरियल महाविद्यालयातून प्रा. बोन यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन (फ्युएल) या विषयावर संशोधन करून पीएच.डी. ही पदवी मिळवली.

     या काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि भारतातदेखील स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले होते. डॉ.काणे या सुमारास मुंबईच्या माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये (आय.सी.टी.) सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर याच संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक आणि प्रभारी संचालक म्हणून काम केले. जवळपास १९ वर्षे ते या संस्थेमध्ये काम करीत होते. विविध पदांवर कार्य करतांना अध्ययन व अध्यापनाव्यतिरिक्त त्यांनी रूढ परंपरेच्या चाकोरीपासून दूर जाऊन जे काम केले, ते महत्त्वाचे आहे.

     इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे काम करीत असताना एका आगळ्यावेगळ्या कल्पनेने त्यांच्या मनात जन्म घेतला. वैद्यकीय शिक्षण घेत असताना, प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयाला एक रुग्णालय उपलब्ध असते. अशी सोय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना का उपलब्ध नसावी, असा विचार डॉ.काणे यांच्या मनात आला. त्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कालावधीत विविध कारखान्यांना आणि उद्योगांना भेटी देता येतील, असे अभ्यासक्रम आणि योजना त्यांनी तयार केल्या. त्यासाठी त्यांना शिक्षणतज्ज्ञ एच.एल. रॉय यांचे सहकार्य लाभले. यामुळे तेव्हापर्यंत साध्य न झालेल्या अनेक गोष्टी साध्य झाल्या. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना विविध कारखान्यांना आणि उद्योगधंद्यांना भेटी देण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. परिणामी, विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना कारखानदारांच्या अडचणी समजू लागल्या, तर दुसर्‍या बाजूने कारखानदारांना त्यांचे प्रश्‍न सोडवताना अभ्यासू आणि हुशार प्राध्यापकांची मदत होऊ लागली. अशा मदतीमुळे मग प्राध्यापकांना त्यांच्या संशोधनासाठी उद्योजकांकडून भरपूर निधीदेखील उपलब्ध होऊ लागला.

     डॉ.काणे यांच्या अशा प्रयत्नांमुळे अभियांत्रिकी शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था, उद्योजक आणि, कारखानदार यांच्यामध्ये परस्परपूरक वातावरण निर्माण झाले. तथापि ही प्रक्रिया एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर शिक्षण घेतलेल्या संस्थेबरोबर विद्यार्थ्यांचे एक भावनिक नाते निर्माण झाले. याचा परिपाक म्हणून विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृसंस्थेला भरघोस देणग्या द्यायला प्रारंभ केला. त्यामुळे या संस्था केवळ शासकीय मदतीवर अवलंबून व राहता आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या. भारतातल्या विविध आय.आय.टी. आणि मुंबईची आय.सी.टी. या जणू भारताच्या ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर’ आहेत असे म्हटले, तर वावगे होणार नाही.

     हा एक प्रकारचा ‘कास्केडिंग इफेक्ट’ होता आणि त्याचे श्रेय काणे यांनी तयार केलेल्या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला जाते. आजकाल आपापल्या शिक्षणसंस्थांना विद्यार्थ्यांनी ‘अल्मामॅटर’ म्हणण्याची जणू फॅशन निघाली आहे. पण ‘अल्मामॅटर’ ही विद्यार्थ्यांची भावना केवळ शाब्दिक न राहता, डॉ.काणे यांच्या दूरदृष्टीमुळे प्रत्यक्षात उतरली आणि उद्योजक, कारखानदार व शिक्षणसंस्था या तिघांचाही फायदा झाला.

     डॉ.काणे यांच्या अशा कल्पक योजनांची कीर्ती त्या वेळचे भारताचे केंद्रीय उद्योगमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी यांच्या कानांवर गेली आणि त्यांनी डॉ.काणे यांना केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयात रासायनिक उद्योगांचे सल्लागार म्हणून काम पाहण्याची विनंती केली. ती स्वीकारून डॉ.काणे दिल्लीला गेले. १९५४ ते १९६९ या त्यांच्या पंधरा वर्षांच्या दिल्लीतील वास्तव्यात त्यांचे कर्तृत्व पुन्हा एकदा अनेक अंगांनी फुलले. औषधे, अल्कोहोल्स, कोळशावर आधारित रसायने, पेट्रोरसायने, खते, कागद इत्यादी विविध वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांच्या गरजांचा अभ्यास करणार्‍या अनेक समित्यांवर डॉ.काणे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिवाय हे कारखाने भारतातील विविध राज्यांमध्ये कार्यरत होणार होते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे एक अवघड कामदेखील त्यात अंतर्भूत होते. असा समन्वय साधला गेला तरच हे उद्योग स्थापन करायच्या जागा आणि ठिकाणे ठरवता येणार होती. शिवाय या उद्योगधंद्यांना आणि कारखान्यांना लागणारे आधुनिक तंत्रज्ञान परदेशातून आयात करण्याचे महत्त्वाचे कामसुद्धा होते. डॉ.काण्यांनी या सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. त्यासाठी अनेक वेळा परदेश दौरे केले. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि क्षमतेवर कारखानदारांचा एवढा विश्वास बसला, की १९६९ साली सल्लागार या पदावरून निवृत्त झाल्यावरही त्यांना अनेक उद्योगसमूहांनी त्यांच्या संचालक मंडळावर घेतले होते. ही जबाबदारी डॉ.काणे यांनी आपल्या मृत्यूपर्यंत निभावली.

     डॉ.काणे यांच्या चौफेर कर्तृत्वामुळे आणि त्यांना १९६९ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

डॉ. काणे यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दबदबा लक्षात येण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. भारतामध्ये एखाद्या कोरड्या किंवा शुष्क हवेच्या ठिकाणी चलनी नोटा छापायचा कारखाना काढण्याचे निश्चित झाल्यावर जागा ठरवण्यासाठी इंग्लंडहून काही तज्ज्ञ आले होते. त्या तज्ज्ञांबरोबर डॉ.काणे यांची विविध ठिकाणी भ्रमंती चालू होती आणि अर्थातच चर्चापण होत होती. डॉ.काणे यांचे त्या क्षेत्रातील ज्ञान आणि व्यासंग पाहून ते परदेशी तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्याकडील नोटांचे कारखाने पाहण्यासाठी त्यांनी डॉ. काणे यांना आमंत्रण दिले. डॉ.काणे यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला; पण अनेक वेळा इंग्लंडला जाऊनही त्यांना तेवढी सवड मिळाली नाही आणि ही भेट मूर्त स्वरूपात येऊ शकली नाही. नंतरच्या भेटीत त्यांना एक दिवस मोकळा वेळ मिळाला; पण तो दिवस नेमका रविवार होता. पण डॉ.काणे यांना पुन्हा वेळ मिळणार नाही म्हणून त्या रविवारी टाकसाळ चालू ठेवली गेली आणि तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

     पण खरी कमाल पुढेच घडली. डॉ.काणे यांचा अभिप्राय नोंदवण्यासाठी टाकसाळीच्या अधिकाऱ्यांनी जी वही त्यांच्यापुढे ठेवली, त्या वहीमध्ये त्यापूर्वी फक्त दोघांचे अभिप्राय नोंदवले गेले होते. एक होती ब्रिटनची महाराणी आणि दुसरे होते ब्रिटनचे अर्थमंत्री. टाकसाळीच्या अधिकाऱ्यांनी डॉ.काणे यांच्यासाठी आजवरच्या प्रथा मोडल्या होत्या. परंपरांना घट्ट धरून ठेवणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना डॉ.काणे यांच्यासाठी अपवाद करावासा वाटला, असाच त्यांचा दबदबा  होता.

     डॉ.काणे यांचे आयुष्यात खूप सन्मान झाले. तथापि त्यांतला एक आणि आगळावेगळा सन्मान होता, त्यांना मराठी विज्ञान परिषदेच्या पहिल्या मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे. ‘भारतापुढील काही समस्या, विज्ञानाला एक आव्हान’ या विषयावर डॉ. काणे यांनी अध्यक्षीय भाषण केले.

     डॉ.काणे यांनी त्यांच्या भाषणात भारतापुढील सर्व समस्यांचा ऊहापोह केला होता. दुभती जनावरे खूप, पण त्यांची दूध देण्याची क्षमता कमी, ती वाढवायला हवी; कापडाच्या वार्षिक उत्पादनात वाढ व्हायला हवी, त्यासाठी सुती कापडाला नायलॉन, टेरिलीन इत्यादी कृत्रिम धाग्यांची जोड द्यायला हवी, पेट्रोरसायनांचे उद्योग सुरू करून त्यातून मिळालेल्या उत्पादनाची जोड नैसर्गिक उत्पादनाला द्यायला हवी, जागोजागी उग्र होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍नाला सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वापरता येऊ शकेल का, याची शक्यता पडताळून पाहणे, लोकांना पुरेसा प्रोटीनयुक्त आहार मिळावा यासाठी नापीक, पडीक जमीन लागवडीखाली आणणे, अशा  भेडसावणाऱ्या अनेक प्रश्‍नांचा आणि त्यांवरील उत्तरांचा त्यांच्या भाषणात विस्तृत अंतर्भाव होता. पण सर्वांत महत्त्वाची आणि श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारी खंत डॉ.काणे यांनी भाषणात व्यक्त केली ती अशी होती- ‘‘आज दूरदर्शन, संगणक, पेट्रोरसायनांचे कारखाने, अणुऊर्जा केंद्रे, प्रतिजैविक औषधे, प्लॅस्टिक इत्यादींमुळे आपले जीवन सुखी झाले आहे,’’ असे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली होती की, ‘‘यांतील एकही शोध भारताने लावला नाही.’’ वैयक्तिक बघायला गेले, तर एकेक भारतीय शास्रज्ञ परदेशी शास्रांच्या तोडीचा आहे. पण काम करण्यासाठी लागणारी उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध नाही, याचे त्यांना विलक्षण वाईट वाटायचे.

डॉ. यशवंत देशपांडे

काणे, गोविंद पांडुरंग