Skip to main content
x

कांबळे, काशिनाथ शिवरुद्र

       काशिनाथ शिवरुद्र कांबळे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील धाफळपूर येथे झाला. दि. १३ सप्टेंबर १९७१ पासून त्यांनी भारतीय भूसेनेतील दुसऱ्या महार फलटणीमध्ये सेवा करण्यास सुरु केली. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात राजस्थान भागातील पर्वत आली येथे हल्ला करण्यासाठी निघालेल्या महार फलटणीच्या कंपनीमध्ये त्यांचा समावेश होता. हि कंपनी वाटचाल करीत जेव्हा आपल्या लक्ष्यापासून केवळ ५० यार्डांवर पोहोचली, तेव्हाच शत्रूने मध्यम पल्ल्याच्या मशीनगनचा जोरदार मारा चालू केला. या माऱ्यात कंपनीचे भारी नुकसान होऊ लागले.
        शिपाई कांबळे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रूच्या मशीनगन मोर्चावर निकराचा हल्ला चढवला. या प्रयत्नात ते गंभीर जखमी झाले. तशाही परिस्थितीत ते मुळीच डगमगले नाहीत. आपल्या जखमांची पर्वा न करता ते शत्रूच्या दिशेने सरपटतपुढे सरकले व एक हातगोळा टाकून त्यांनी शत्रूचा तो मोर्चा उध्वस्त केला. या चकमकीत झालेल्या जखमांमुळेच त्यांचा युद्धक्षेत्रावरच मृत्यू झाला. शिपाई काशिनाथ कांबळे यांनी अद्वितीय धाडस व निष्ठेचे एक उदाहरणच सादर केले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. १२ डिसेंबर १९७१ रोजी मरणोत्तर ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

-संपादित

कांबळे, काशिनाथ शिवरुद्र