Skip to main content
x

कदम, डी के

व्यंगचित्रकार

 

गेल्या शतकातील पन्नासाव्या दशकाच्या सुमारास मुंबईमधील गुजराती, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांमधून जी व्यंगचित्रे प्रसिद्ध होत, त्यांतील बहुसंख्य तत्कालीन राजकीय घटनांवर आधारित असत.

जवळजवळ २०० वर्षांपूर्वी झाशीमार्गे कोटा संस्थानात स्थायिक झालेल्या कदम कुटुंबापैकी डी.के. कदम लखनौ विद्यापीठाची बी.कॉम. पदवी प्राप्त करून मुंबईत आले व त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. विद्यार्थिदशेतच त्यांची ब्लिट्झ’, ‘जन्मभूमी’, ‘बॉम्बे समाचार’, ‘बॉम्बे क्रॉनिकलया वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रे प्रसिद्ध होऊ लागली. नवभारत टाइम्सया टाइम्स वृत्तसंस्थेच्या हिंदी दैनिकात डी.के. कदम यांनी १९५० मध्ये पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी पत्करली. त्यामध्ये ते १९८३ पर्यंत कार्यरत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही २००२ पर्यंत त्यांनी चित्रमाला काढल्या. त्यामुळे व्यंगचित्रकार म्हणून त्यांची महत्त्वाची आणि लक्षवेधी कामगिरी तेथेच झाली.

या कालावधीत त्यांच्या व्यंगचित्रांची मुंबई, दिल्ली, लखनौ, इंदूर, हैद्राबाद, कोटा, त्रिवेंद्रम आणि इतर अनेक शहरांतून प्रदर्शने झाली व सर्व ठिकाणी त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांच्या १९५७ मधील प्रदर्शनाला जवाहरलाल नेहरू आले होते आणि प्रदर्शनातील चित्रांना उत्तम प्रतिसाद देताना कदमांनी काढलेल्या, कमरेत वाकलेल्या कॉमन मॅनच्या चित्राला खुद्द त्यांनी तसाच वाकून सलाम केला होता.

कदम यांना मिळालेल्या सन्मानांमध्ये द पॉप्युलेशन इन्स्टिट्यूट (वॉशिंग्टन) चा ग्लोबल अवॉर्ड फॉर मीडिया एक्सेलन्स’, ‘बेस्ट कार्टुनिस्टहे महत्त्वाचे आहेत, तसाच वाटुमल फाउण्डेशन (हवाई, यूएसए) चा बेस्ट कार्टुनिस्ट१९८७ (सुवर्णपदक) हा आहे. कार्टुनिस्ट कंबाइन या संस्थेनेही त्यांना १९९७ चा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

चॅलेंज अॅक्सेप्टेडहे भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित इंग्रजी व हिंदी भाषेतील कदमांचे पुस्तकही  प्रकाशित झाले आहे व त्याने जाणकारांची वाहवा मिळवली आहे.

- वसंत सरवटे

संदर्भ :
https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/step-cartoonist-died-dk/articleshow/39436589.cms