Skip to main content
x

केतकर, शीलवती श्रीधर

     शीलवती केतकर ह्या मूळच्या जर्मन ज्यू असून ईडिथ व्हिक्टोरिया कोहन हे त्यांचे माहेरचे नाव होय. त्यांचे शिक्षण जेना विद्यापीठातून झाले. स्कॉटलन्डमधील सेन्ट अ‍ॅन्ड्र्यूज विद्यापीठातून ‘कम्पॅरिटिव्ह रिलिजन्स’ या विषयात त्यांनी पदवी संपादन केली.

     शीलवतीबाईंचे वडील मिस्टर कोहन हे व्यापारी होते. ते कुठलाही धर्म, जात-पात न मानणारे होते. शीलवतीबाईंची आईदेखील निरीश्वरवादी होती. अशा पुरोगामी वातावरणात शीलवती-बाईंचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांनी इंग्लंडमध्ये राहत असताना त्यांच्या-सारख्याच काही बुद्धिवादी इंग्रज लोकांच्या साहाय्याने ‘द नोबडीज क्लब’ स्थापन केला. शीलवतीबाई ह्या क्लबच्या चिटणीस होत्या. याच काळात श्रीधर व्यंकटेश केतकर शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये स्थायिक होते. ह्या क्लबमध्ये ते कायम येत असत. तिथेच त्यांचा आणि शीलवतीबाईंचा परिचय झाला. काही काळाने केतकर हिंदुस्थानात परतले, तरीही शीलवतीबाई आणि केतकर ह्यांचा पत्रव्यवहार चालू राहिला होता.

     केतकरांचे ज्ञानकोशाचे कार्य वेगाने पुढे जात होते. त्यांना परकीय भाषेतील ग्रंथांची भाषांतरे करून ते ग्रंथ मातृभाषेत आणण्याची गरज भासू लागली. त्यांनी शीलवतीबाईंना विंटरनिटइच्या ‘हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर’ ह्या ग्रंथाचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार शीलवतीबाईंनी लंडनमध्ये असतानाच ह्या ग्रंथाचे भाषांतर पूर्ण केले. भाषांतराच्या गरजेपोटी तसेच कोशकार्याच्या ओढीने १९१९मध्ये शीलवतीबाई भारतात आल्या. १९२०मध्ये व्रात्यस्तोम पद्धतीने त्या हिंदू झाल्या आणि नंतर त्यांचा व केतकरांचा विवाह झाला. शीलवतीबाईंना हिंदू धर्माबद्दल आत्यंतिक अभिमान होता. तो त्यांच्या आत्मकथेतून स्पष्टपणे जाणवतो. त्या काळात केतकर दांपत्याने दोन मुले दत्तक घेतली होती.

     भारतीय केंद्र सरकारने शीलवतीबाईंची अनुवादक समितीवर नेमणूक केली. वनस्पतिशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, मानवशास्त्र अशा विविध विषयांसंबंधाने शीलवतीबाईंनी अनुवाद केले.

     १९३७ साली केतकरांचे निधन झाले. त्यानंतर चाळीसहून अधिक वर्षे शीलवतीबाईंना आयुष्य लाभले. केतकरांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. १९६९ मध्ये त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ हे आत्मचरित्र लिहिले. ह्या आत्मचरित्राच्या निवेदनामध्ये त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. केतकर पति-पत्नींच्या बाबतीत समाजात बरेच समज-गैरसमज होते. केतकरांचे पारदर्शी व्यक्तिमत्त्व लोकांसमोर आणण्याच्या उद्देशाने आत्मचरित्र लिहिले, असे त्यांनी निवेदनात सांगितले आहे. मूळ इंग्रजीत असलेले हे आत्मचरित्र रा.य.ओलतीकर ह्यांनी मराठीत आणले. 

- अंजली जोशी

केतकर, शीलवती श्रीधर