केतकर, श्रीधर व्यंकटेश
महाराष्ट्रीय समाजाच्या प्रबोधनासाठी आयुष्यभर निर्धारपूर्वक कार्य करणारे समाजशास्त्रज्ञ व ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांना त्यांच्या मूलगामी संशोधनामुळे ‘प्रतिभाशाली, व्यासंगी समाजशास्त्रज्ञ’ अशी जागतिक कीर्ती प्राप्त झाली. पांडित्य आणि प्राचंड्य हे ज्यांच्या प्रतिभेचे दोन पैलू होते, त्या केतकरांनी ज्ञानार्जन आणि विद्याप्रसार हेच आपले जीवनध्येय मानले व ते एखाद्या व्रतासारखे निष्ठेने पार पाडले.
रायपूर येथे जन्मलेल्या श्रीधर केतकर यांचे वडील पोस्टमास्तर होते. त्यांची आर्थिक स्थिती मध्यम होती. श्रीधर यांच्या जन्मानंतर वडिलांची मुंबईस बदली झाली; पण लगेचच दोन-तीन वर्षांत ते मृत्यू पावले. पाच वर्षांचे श्रीधर व त्यांची तीन मोठी भावंडे यांना घेऊन त्यांची आई अमरावतीस काकांच्या आधाराने राहिली. श्रीधर केतकर यांचे सर्व शालेय शिक्षण तेथेच झाले.
बुद्धिमान केतकर ‘व्हर्नाक्युलर फायनल’, ‘हायस्कूल एन्ट्रन्स’, इतर स्पर्धात्मक परीक्षा यांत सतत वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होत. त्यांचे चौफेर वाचन, बहुश्रुतता, तीव्र स्मरणशक्ती, उपक्रमशीलता व त्यातील नावीन्य यांमुळे शाळेतच त्यांना ‘चालता-बोलता ज्ञानकोश’ अशी पदवी मिळाली होती. मॅट्रिकला असताना आई व बहीण यांचा पाठोपाठ मृत्यू झाला. एक मोठा भाऊ आधीच निवर्तला होता. त्यामुळे घराची ओढ संपली. काकांच्या आग्रहामुळे त्यांनी मुंबईला विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला.
लहानपणापासूनच स्वराज्य, स्वदेश व स्वभाषा यांचे तीव्र प्रेम असल्याने महाविद्यालयात अनुभवास येणारी युरोपियन साम्राज्यवादी वृत्ती व भारतीयांची होणारी हेटाळणी यांचा त्यांना विलक्षण त्रास होई. सहपाठी विद्यार्थ्यांबरोबर भारतीय स्वातंत्र्य व समाजप्रबोधन यांसंबंधी सतत चर्चा करीत असताना सशस्त्र क्रांतीनेच भारताला स्वातंत्र्य मिळेल असा विश्वास केतकरांना वाटू लागला. त्यासाठीचे लष्करी शिक्षण अमेरिकेस मिळेल अशी शक्यता दिसल्याने त्यांनी अमेरिकेस जाण्याचे ठरवले व त्यासाठी इतर कुटुंबीयांशी भांडून पैशांची जुळवाजुळव केली. १५ एप्रिल १९०६ रोजी त्यांनी अमेरिकेस प्रयाण केले; मात्र तेथे जाईपर्यंत त्यांचे विचार बदलले आणि भारतीयांची सामाजिक स्थिती आधी सुधारणे जरुरीचे आहे व त्यासाठी ज्ञानप्रसार करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा झाली.
पूर्व अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर तेथील लवचीक शिक्षणपद्धतीचा आधार घेत त्यांनी दोन वर्षांत बी.ए. व एम.ए. या पदव्या आणि लगेचच तीन वर्षांत, १९११ मध्ये, पीएच.डी.ची पदवी मिळविली. या पदवीसाठी त्यांनी ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ हा विषय निवडला. भारतातील अनेक सामाजिक समस्यांचे मूळ असणार्या जातिसंस्थेबद्दलचे एका भारतीयाचे हे मूलगामी, व्यासंगपूर्ण संशोधन पाश्चात्त्य जगतात ंमहत्त्वपूर्ण ठरले. पाश्चात्त्य संशोधकांच्या संशोधनातील त्रुटी दाखवून मूळ समस्येेची उकल करून दाखवणार्या केतकरांच्या या संशोधनाची पाश्चात्त्य विद्वज्जगाने मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. हार्वर्ड, येल, लंडन, मॅन्चेस्टर यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांतील समाजशास्त्रज्ञांशी, तत्त्वज्ञांशी केतकरांचा संवाद सुरू झाला व त्यांना तिथे अनेक मानसन्मान मिळाले.
‘ढहश कळीीिीूं षि उरीींश ळि खविळर’ या नावाने त्यांच्या प्रबंधाचा पहिला खंड न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध झाला. या खंडात ‘मनुस्मृती’चे परीक्षण करून इसवी- सनाच्या तिसर्या शतकातील भारतीय, सामाजिक परिस्थितीवर त्यांनी प्रकाश टाकला. या प्रबंधाचा दुसरा खंड इ.स. १९११ मध्ये लंडन येथे ‘कळर्विीळीा, ळीीं ऋिीारींळिि रवि र्र्ऋीीीींश, खश्रर्श्रीीीींरींळसि ींहश ङरुी षि डलिळरश्र र्एींर्श्रिीींळिि री ठशषश्रशलींशव ळि ींहश कळीीिीूं षि ऋिीारींळिि षि कळर्विी र्उिााीळिीूं’ या नावाने प्रसिद्ध झाला.
त्यांनी आपल्या प्रबंधात जात, जमात (राष्ट्रजाती) या संकल्पनांच्या नेमक्या, स्पष्ट व समावेशक व्याख्या केल्या, त्याचबरोबर महावंश (ठरलश), उपजाती यांच्याही व्याख्या करून स्पष्टीकरण दिले.
केतकर म्हणतात, ‘जात म्हणजे दोन वैशिष्ट्यांनी युक्त असा एक सामाजिक समूह असतो. पहिले वैशिष्ट्य म्हणजे या समूहाचे सदस्यत्व जन्माधिष्ठित असते व दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या गटातील सदस्यांना गटाबाहेरच्या व्यक्तीशी विवाह करण्यास कडक सामाजिक निर्बंधाने मनाई असते.’ जातीची एवढी समर्पक व स्पष्ट व्याख्या त्यापूर्वी कोणीही केली नव्हती, असे त्यांच्या विरोधकांनीही मान्य केले.
केतकरांचे आपल्या प्रबंधातले महत्त्वाचे प्रतिपादन असे होते की : १) पूर्वीच्या अभंग, एकरूप हिंदू समाजाचे तुकडे पडून आजच्या जाती निर्माण झाल्या ही समजूत चुकीची असून असा एकसंध समाज कधीच अस्तित्वात नव्हता. २) आर्यलोक हिंदुस्थानात आले त्या वेळी येथे अनेक राष्ट्रे व राष्ट्रजाती (जमाती) अस्तित्वात होत्या व त्यांपैकी अजूनही पुष्कळ जातिरूपाने अस्तित्वात आहेत. ३) त्याचप्रमाणे, आर्य उत्तरेकडून येथे आले हे जरी खरे असले, तरी येथे येऊन ते उच्चवर्णीय झाले आणि येथे असणारे आधीचे लोक रानटी, अनार्य होते, त्यांच्यात युद्धे झाली व नंतर वर्णभेद निर्माण झाला ही समजूत साफ चुकीची आहे. ४) आर्य येथे येण्यापूर्वी येथील प्रत्येक राष्ट्रजातीत चार वर्ण होते व कर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचा वर्ण ठरत असे.
याशिवाय यामध्ये जातिव्यवस्था कशी असावी, जातिसंस्था आणि हिंदू धर्म यांचे परस्पर नाते, हिंदू समाजाची जडणघडण कशी असावी व हिंदू समाजाचे भवितव्य काय असेल, काय असावे, याबद्दलचे आपले विचार त्यांनी मांडले आहेत. हिंदू धर्म म्हणजे हिंदूंची कर्तव्ये असे सांगून ‘हिंदू कुणाला म्हणावे’, यासारख्या प्रश्नांचीही त्यांनी चर्चा केली.
‘जातिसंस्थेचा इतिहास’ या पहिल्या खंडाला श्रीधर केतकर यांनी जे परिशिष्ट जोडले, त्यात मानववंशशास्त्रातील काही संज्ञांचे स्पष्टीकरण त्यांनी प्रथमच केले. त्यात महत्त्वाचे मुद्दे असे मांडले की : १) ‘सापेक्ष स्थिरते’च्या तत्त्वानुसार मानवी समाजांचे वर्गीकरण करावे. २) ज्यांची समान शारीरिक वैशिष्ट्ये सापेक्षत: स्थिर असतील असे लोकसमूह एका महावंशाशी संबंधित असावेत व म्हणून त्यांची नावे संस्कृतिनिदर्शक (आर्य-द्रविड-सेमेटिक) अशी न ठेवता प्रदेशनिदर्शक (उत्तरेकडील मानववंश, भूमध्यसमुद्राजवळील मानववंश इ.) ठेवावीत. यामुळे पाश्चात्त्यांनी ‘आर्य’ हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरून शेकडो वर्षे जो गोंधळ घातला आहे, तसे गोंधळ होणार नाहीत.
हिंदू समाजाची धर्ममूढता, निष्क्रियता, दैववादी, नियतिवादी जीवनव्यवहार यांची केतकरांना जाणीव होती व त्यांबद्दलची कारणमीमांसा त्यांनी मांडली आहे. जातिसंस्थेवर आधारित या समाजरचनेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी असंख्य छोटे छोटे बदल घडवून आणल्यास ते मुळापर्यंत पोहोचतील, असे त्यांचे मत होते. आपल्या विविध पुस्तकांमधून, कादंबर्यांमधून त्यांनी समाजपरिवर्तनाचाच विचार मांडला व त्यातून या खर्या समाजशास्त्रज्ञाचा ऐतिहासिक दृष्टिकोनच दिसतो. मानवधर्मशास्त्राचा अभ्यास करताना, जातिव्यवस्थेचे प्रमेय मांडतानाही हाच दृष्टिकोन होता. सामाजिक क्रांतीऐवजी सामाजिक उत्क्रांतिवादी दृष्टिकोन स्वीकारावा, त्यातच समाजहित आहे, असे त्यांचे मत होते. समाजपरिवर्तनासाठी ज्ञानविकास झाला पाहिजे, त्यातच राष्ट्रोद्धार आहे अशा ठाम विचारांमुळे, अमेरिकेत उपलब्ध असणार्या संशोधनाच्या संधी न घेता ते भारतात परतले. मात्र, येण्यापूर्वी सव्वा वर्ष इंग्लंडमध्ये घालवून विकसित देशातील भिन्न संस्कृतीचे निरीक्षण आणि आधुनिक ग्रंथालयांद्वारे ज्ञानार्जन करण्यास ते विसरले नाहीत.
सप्टेंबर १९१२ मध्ये भारतात परतल्यावर तत्कालीन ‘फॉरेन रिटर्ण्ड’ लोकांप्रमाणे प्रतिष्ठेची पदे वा नोकरी न स्वीकारता त्यांनी कोलकाता विद्यापीठात दहा-अकरा महिने पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांचे अध्यापन केले. त्याच काळात त्यांनी ‘अि एीीरू िि खविळरि एलिििाळली’ हा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय अर्थशास्त्रासंबंधी त्यांनी केलेली विधाने व वर्तवलेले अंदाज आज खरे ठरले आहेत असे दिसते.
१९१३ पासून पुढे जवळजवळ दोन वर्षे भारतभर व्याख्यानदौरे करून त्यांनी आपल्या ‘सुधारणात्रयी’चा प्रचार केला. ही सुधारणात्रयी अशी : १) भाषावार प्रांतरचना, २) देशी भाषांमध्ये राज्यकारभार व ३) देशी भाषांमधून शिक्षण देणारी प्रांतवार विद्यापीठे. या तीन गोष्टींची समाजविकासाला नितांत आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते.
या दौर्यांमध्ये त्यांची पूर्वीची मते ठाम झाली, तसेच ज्ञानकोशासारख्या ज्ञानात्मक कामाची समाजाला गरज आहे असा त्यांना विश्वास वाटू लागला. ज्ञानकोशनिर्मितीचा मार्ग खडतर आहे अशी जाणीव लोकमान्य टिळक, इतिहासाचार्य राजवाडे यांसारख्या ज्येष्ठांनी करून दिली; पण त्याचबरोबर हे काम आवश्यक आहे असे पटल्याने केतकरांना पाठिंबाही दिला. राष्ट्रसेवा आणि राष्ट्रबलसंवर्धन यांसाठी ज्ञानकोशनिर्मिती करण्याचे ठरवून केतकर यांनी आपले सारे आयुष्य त्यासाठी झोकून दिले.
ज्ञानकोशाचा दर्जा, त्यातील ज्ञानपूर्ण लेखन यांच्याबरोबरच त्यातील व्यावहारिक बाजूचादेखील विचार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी केला. प्रत्येक राज्याला, प्रत्येक राष्ट्राला जसा आपला वेगळा भूगोल व वेगळा इतिहास असतो, तसेच प्रत्येक राज्याची स्वतंत्र अस्मिता आणि निराळे मानबिंदू असतात हे लक्षात घेऊन महाराष्ट्रीय समाजाच्या आवश्यकतेनुसार त्यांनी विषय निवडले. हा ज्ञानकोश म्हणजे पूर्वपरंपरागत ज्ञान आणि भविष्यकालीन स्थिती यांना जोडणारा, तसेच पाश्चात्त्य आणि पौर्वात्य संस्कृतींना जोडणारा दुवा ठरावा अशी त्यांची धारणा होती व ती त्यांनी संपूर्णपणे यशस्वी करून दाखवली.
केतकरांनी ‘ज्ञानकोशमंडळ लिमिटेड’ ही कंपनी स्थापून त्यासाठी शेअर काढले आणि वर्गणीदारांना आवाहन केले. ग्रंथनिर्मितीसाठी अशा प्रकारे भागधारकांच्या मदतीने भांडवल उभे करणे ही कल्पना त्यांनी प्रथमच अवलंबिली. संपादक मंडळ नेमून परिपूर्ण वाङ्मयसूची तयार केली. ज्ञानकोशाचे एकूण तेवीस भाग झाले. प्रस्तावनेचे पाच खंड, शरीरखंडाचे सोळा भाग, सूची खंड व हिंदुस्थान खंड असे भाग केले.
प्रस्तावना खंडाचे पाच भाग केवळ अपूर्व असे आहेत. ‘हिंदुस्थान आणि जग’ या पहिल्या खंडात त्यांनी भारतीय जनतेचे स्वत्व विस्तारपूर्वक उलगडून दाखवले, जग घडवणार्या शक्तींची ओळख करून दिली. समाज हळूहळू कसा रूपांतरित होतो, समाजविघटन कसे होते याचे अतिशय मूलगामी व सूत्ररूप विवेचन केतकरांनी यात केले आहे.
दुसरा व तिसरा खंड अनुक्रमे ‘वेदविद्या’ आणि ‘बुद्धपूर्व जग’ या नावाने प्रसिद्ध झाले. ज्ञानकोश हे संकलनात्मक काम असतानाही वेदविद्येबद्दलची चुकीची पाश्चात्त्य मते महाराष्ट्रीयांपुढे मांडणे त्यांना अयोग्य वाटले व त्यात आपले बौद्धिक परावलंबित्व आहे असे त्यांना जाणवले. आपल्याकडे असे सखोल संशोधन झालेले नाही हे लक्षात येताच केतकरांनी य.रा. दाते, वेदवेत्ते सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांसारख्यांच्या मदतीने चारही वेदसंहिता, ब्राह्मणे, उपनिषदे इ. वेदांगांचा मुळातून अभ्यास केला. या दोन खंडांमधून त्यांनी यज्ञसंस्था आणि वैदिक वाङ्मय यांचे परस्पर नाते व त्यांच्या विकासाचा क्रम व इतिहास यांबद्दलचे अत्यंत महत्त्वाचे, नवीन तीस सिद्धान्त मांडले आहेत. यामुळे आपली वैदिक संशोधन परंपरा त्यांनी समृद्ध केली. म.मो. कुंटे, राजारामशास्त्री भागवत, लोकमान्य टिळक यांच्यासारख्यांच्या संशोधकीय परंपरेत केतकरांना स्थान मिळाले.
त्यांचा व्यासंग व विद्वत्ता यांनी महाराष्ट्र तर दिपून गेलाच; पण जर्मन संशोधक प्रो. विंटरनिट्झ यांच्यासारख्यांनी हे लेखन इंग्रजीत व जर्मनमध्ये भाषांतरित करण्याची तयारी दाखवली. परंतु, त्यापेक्षा ज्ञानकोश पूर्ण करण्याची गरज अधिक वाटल्याने केतकरांनी त्या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नाही. १९२१ पासून १९२९ पर्यंत २३ खंडांचा संपूर्ण ज्ञानकोश छापून झाला. त्याआधी १९२८ मध्ये ज्ञानकोश मंडळातील सदस्य, संपादक यांच्यातील मतभेद तीव्र झाले व मंडळ फुटले. विविध प्रकारच्या अडचणी आल्या. छपाईदारांनी त्रास दिला. जे काही कर्ज होते ते एकट्या केतकरांवर पडले आणि त्याची फेड करण्यासाठी ज्ञानकोशाचे खंड घरोघरी जाऊन विकण्याची वेळ केतकरांवर आली.
मात्र, त्यांचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक व सचोटीचा राहिला. त्यांनी कुणाहीकडून कसल्याही प्रकारच्या देणग्या या कामासाठी घेतल्या नाहीत व कुणालाही बुडवले नाही. केवळ बारा वर्षांत त्यांनी हे काम पूर्ण केले. त्यातले बहुतांश लेखन त्यांनी एकट्याने केले. ज्ञानकोशाचे गुजराती भाषांतर होत होते; पण त्यात महात्मा गांधींची आडकाठी आली आणि त्यासंबंधी झालेला खर्च वाया गेला.
ज्ञानकोशाचे खंड जसजसे बाहेर पडले, तसतसे समाजात त्यांचे कौतुक झाले, पण त्याबरोबर वादही उफाळले. ‘केसरी’सारख्या वृत्तपत्राने ज्ञानकोशाची फारशी दखल न घेतल्याने न.चिं. केळकर व केतकर यांच्यात वाद झाला. ज्ञानकोशाच्या चौथ्या खंडात मुहंमद पैगंबराबद्दल चुकीची व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध झाल्याच्या कारणावरून मुसलमानांनी कडवी चळवळ उभारली व केतकरांवर मोठे संकट आले. नंतर आपण मिळविलेल्या माहितीची खातरजमा करून त्यांनी पुन्हा नवीन, योग्य माहिती दिली. असाच वाद गौतमबुद्धाच्या चरित्राबद्दल झाला, विविध जातीजमातींबद्दल झाला. पण बुद्धचरित्राबाबत केतकरांनी स्वत: संशोधन केले होते आणि इतर जातींबद्दलचेही योग्य ते पुरावे त्यांच्याजवळ होतेे. त्यामुळे त्या निषेध चळवळींमधून काही निष्पन्न झाले नाही. केतकर इंग्लंडमध्ये असताना एडिथ कोहन नावाच्या जर्मन-ज्यू तरुणीशी त्यांची ओळख झाली होती. ज्ञानकोशातील कामात मदत करायला, जर्मन ग्रंथांचे भाषांतर करायला कोहन भारतात आल्या. पुढे १९२० मध्ये त्यांचा केतकरांशी विवाह झाला. मात्र, विवाहापूर्वीव्रात्यस्तोमविधीद्वारे कोहन यांना हिंदू धर्मात घेऊन त्यांचे नाव शीलवती ठेवण्यात आले.
समाजशास्त्रज्ञ, ज्ञानकोशकार केतकरांनी साहित्यनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर केली होती. ज्ञानकोश निर्मितीच्या वेळी ते ‘विद्यासेवक’ नावाचे मासिक चालवत असत. त्यांच्या सात कादंबर्या, कविता, स्फुट लेख बरेचसे यातूनच प्रकाशित झाले.
आपल्या कादंबर्यांमधून समाजशास्त्रीय प्रश्नांवर आधारित कथानके रचून, त्या प्रश्नांच्या अनेक बाजू, त्यांवरील त्यांना सुचणारे उपाय व या प्रश्नांचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कादंबरी हे माध्यम हाताळले. ‘ब्राह्मणकन्या’ या सुरचित कलात्मक कादंबरीत मिश्रविवाह व त्यांची संतती हा विषय आहे तर ‘गोंडवनातील प्रियंवदा’ यामध्ये समाजव्यवहारात स्त्री-पुरुषसंबंध कसे असावेत, पुनर्विवाहावेळी कसा विचार केला जावा, समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने काय करणे आवश्यक आहे या गोष्टींचा विचार त्यातील पात्रांद्वारे व्यक्त केला आहे.
याशिवाय ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ हा काव्य-समीक्षेची समीक्षा करणारा त्यांचा ग्रंथही लक्षणीय आहे. स्फुटलेखनात नगररचनेपासून तो सौंदर्यस्पर्धा असाव्यात की नाही, यासंबंधीच्या अभिप्रायापर्यंत अनेक विषयांचा ऊहापोह केलेला दिसतो. याशिवाय ‘महाराष्ट्र वाग्विलास’ नावाचे आणखी एक मासिक त्यांनी अमेरिकेस जाण्यापूर्वी काही महिने चालवले होते. ज्ञानकोश मंडळातर्फे त्यांनी ‘पुणे समाचार’ नावाचे दैनिकही वर्षभर चालवले. ‘नि:शस्त्रांचे राजकारण’मध्ये महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या मार्गाला समांतर वाटावा असा मार्ग त्यांनी ‘स्वयंनिर्णयी संघा’ची स्थापना करताना सुचवला आहे.
१९२९ नंतरची सात-आठ वर्षे केतकरांना अतिशय हलाखीची गेली. डोक्यावर प्रचंड कर्ज, सहकारी सोडून गेल्याने आलेले एकटेपण व मनात विलक्षण, नवनवीन कल्पना स्फुरत असतानाही त्या प्रत्यक्षात आणता येत नाहीत याबद्दलची हतबलता, यांमुळे त्यांना मानसिक क्षीणता आली असावी. त्यातूनही त्यांची आशावादी वृत्ती व संशोधनाची उमेद टिकली हे नवल!
‘प्राचीन महाराष्ट्र’ या नावाने त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहास लेखनास आरंभ केला. त्यातील पहिला भाग त्यांनी प्रसिद्ध केला व दुसरा त्यांच्या मृत्यूनंतर शीलवतींनी प्रकाशित केला. पहिल्या भागातील ‘शकपर्व’ व ‘सातवाहनपर्व’ या विभागांमध्ये त्यांनी १२५ नवीन सिद्धान्त मांडले आहेत. या सर्व लेखनातून त्यांनी महाराष्ट्रीय समाजाच्या वाढीचे आणि विकासाचे चित्र उभे करून त्याच्या आत्म्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला, तो एकमेवच ठरला आहे.
मराठी भाषेविषयी त्यांना विलक्षण प्रेम होते. आपल्या विपुल लेखनाने स्वभाषेत त्यांनी ज्ञानात्मक भर टाकली आहेच, पण भाषेमध्ये नवीन शब्दांचीही भर टाकली आहे. ‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘समाजचित्र’, ‘गृहचित्र’ यांसारखे अनेक नवीन शब्द त्यांनी निर्माण केले.
१८ फेब्रुवारी १९२८ रोजी पुण्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी त्यांचा मोठा सत्कार करून नवीन पिढीतर्फे कृतज्ञता व्यक्त केली. ज्ञानकोशाच्या पूर्तीनंतर नागपूरमध्येही त्यांचे सत्कार होऊन मानपत्रे दिली गेली. १९३१ मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देऊन त्यांचा सन्मान केला गेला. या सर्व प्रसंगी केलेली त्यांची भाषणे त्यांच्या चिंतनशील वृत्तीची द्योतक होती व मराठीचा अभिमान दर्शवणारी, मराठीचा सर्वत्र वापर व्हावा असा आग्रह धरणारी होती.
तीव्र बुद्धिमत्ता, अफाट ग्रहणशक्ती यांची देणगी लाभलेल्या डॉ. केतकरांचे व्यक्तित्व बहुरंगी होते. एकाच व्यक्तीने विविध क्षेत्रांतील प्रश्न जाणून घ्यावेत, अलक्षित क्षेत्रे ध्यानी घ्यावीत व त्यासाठी विशेष योजना सुचवाव्यात हे विशेष होते. फार पुढच्या काळातले विचार त्यांनी मांडल्याने त्यांच्यावर ‘विक्षिप्त’ असा शिक्का बसला. परंतु ‘एका नव्या जगाची कल्पना’ मांडताना त्यांनी दाखवलेला द्रष्टेपणा अपूर्व होता.
आपल्या पहिल्याच पुस्तकात त्यांनी एका जगाची, विश्व, राष्ट्रीयत्वाची, सांस्कृतिक ऐक्याची कल्पना मांडली होती. ‘मनुष्यजातीचे परमोच्च ध्येय व कल्याण, जगातील सर्व माणसांचा एक समाज बनवणे हेच होय’, असे ठासून प्रतिपादन करणारे डॉ. केतकर दुर्दैवाने आपल्या या कल्पनेचा पाठपुरावा करण्यास फार काळ जगले नाहीत. मधुमेहाने व इतर किरकोळ आजाराने पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. प्रसिद्ध संशोधक व अभ्यासक डॉ. प.ल. वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘डॉ. केतकर म्हणजे मूर्तिमंत साहस! त्यांनी दिलेली बौद्धिक आव्हाने स्वीकारण्याची पात्रता असणारा विद्वान महाराष्ट्रात पुन्हा केव्हा निर्माण होईल तो होवो!’’ (लोकशिक्षण, जुलै १९३७) पुणे येथील कमला नेहरू पार्कमध्ये डॉ. केतकर यांचे स्मारक १९६४ मध्ये उभारले गेले आहे.
२. वैशंपायन, मीना; ‘ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर’; श्रीगंधर्ववेद प्रकाशन; नोव्हेंबर २०१०.