Skip to main content
x

कीलहोर्न, फ्रेन्झ

       फ्रॅन्झ कीलहॉर्न यांचा जन्म जर्मनीत झाला. प्रथमपासूनच यांचा ओढा संस्कृत भाषा व व्याकरण यांकडे होता. प्रख्यात प्रो. मॅक्समूलर यांनी सायण भाष्यासह ऋग्वेद-संहिता प्रथम प्रसिद्ध केली. त्यास डॉ. कीलहॉर्न यांचे सहाय्य झाले. १९६६ मध्ये यांची पूना कॉलेजात संस्कृत व प्राच्यभाषा यांचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वीच शांतनवाचार्यकृत फिट्सूत्रे प्रसिद्ध करून व्याकरणाचे सूक्ष्म अभ्यासक असे नाव त्यांनी कमावले होते. येथे आल्यावर पं. अनंतशास्त्री पेंढारकर व इतर विद्वानांशी त्यांचा संबंध येऊन व्याकरणातील परिभाषेन्दुशेखरासारख्या कठीण ग्रंथांच्या इंग्रजी भाषांतरास त्यांनी हात घातला आणि नंतर पतंजलीच्या महाभाष्याची आवृत्ती प्रसिद्ध केली. इतरही अनेक व्याकरणविषयक लेख लिहून वेळोवेळी इंडियन अँटिक्वरी व इतर शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध करून पहिल्या प्रतीचे वैय्याकरण व संस्कृत पंडित अशी यांनी ख्याती मिळविली.

१८८५ नंतर त्यांनी आपल्या अनुपम संस्कृत ज्ञानाचा ओघ प्राचीन लेख-साहित्याकडे वळवला आणि शिलालेख-ताम्रपट आदिकरून इतिहासाची साधने शास्त्रीय पद्धतीने कशी संपादावीत व त्यापासून इतिहासाची पुनर्घटना कशी करावी, याचा नव्यानेच उपक्रम केला. यांच्याच पुरस्कारामुळे, हिंदुस्थान सरकारने ही इतिहासाची साधने प्रसिद्ध करण्याकरता इंडियन अँटिक्वरीचे परिशिष्ट म्हणून ‘एपिग्रफिया इंडिका’ या त्रैमासिकाची जबाबदारी ५० वर्षांपूर्वी घेतली व त्याचे २५ खंड प्रसिद्ध झाले आहेत.

पाली-प्राकृत भाषांतून लिहिलेल्या प्राचीनतर लेखांकडे ते विशेष लक्ष वेधतात. गुप्तकालापासून नंतरच्या संस्कृत भाषेत लिहिलेल्या निरनिराळ्या ऐतिहासिक घराण्यांच्या राजवटीतील लेखांवरच भर देऊन, त्यांचा कालनिर्णय स्थिर करण्यासाठी डॉ. कीलहॉर्न यांनी अविरत श्रम घेतले. लेखात सापडणाऱ्या वर्ष-तिथी-वार इत्यादींचा मेळ घालून, बरोबर तिथी ठरवून मगच घराण्यांचे व राजांचे काल अचूक ठरवावयाचे असतात, त्या बाबतीत अविश्रांत मेहनत करून त्यांनी या अभ्यासाचा  पाया घालून दिला. कलचूरी अथवा चेदिवत यांचे आरंभस्थान त्यांनीच शोधून काढले. सर्वांत महत्त्वाची व संशोधकांस अत्यंत उपयोगी अशी त्यांची कामगिरी म्हणजे त्यांनी उत्तर व दक्षिण हिंदुस्थानात प्रसिद्ध झालेल्या सर्व लेखांची वर्षानुक्रमे पद्धतशीर यादी व राजवंशांची परिशिष्ट तयार करून भावी संशोधकांचा मार्ग सुलभ करून ठेवला आहे. यांच्या लेखवाचनातील बिनचूकपणा, त्यांनी नमूद केलेल्या तारखांचा काटेकोरपणा व ऐतिहासिक निष्कर्ष-साधनांतील पद्धतशीरपणा अद्याप आदर्श मानला जातो. याप्रमाणे या देशातील भाषा व इतिहास यांच्या संशोधनांत पूर्णपणे रंगून गेलेल्या या विद्वानाने सेवानिवृत्तीनंतर स्वदेशी गेल्यावर तेथील विश्वविद्यालयात संस्कृत प्राध्यापकाची जागा स्वीकारली व हिंदी विद्या व संस्कृती यांच्या अभ्यासाची आवड अनेक तरुण जर्मन विद्यार्थ्यांत उत्पन्न केली.

डॉ. कीलहॉर्न व डॉ. बुल्हर यांच्याच प्रयत्नाने प्रसिद्ध आर्य भाषा व संस्कृती यांच्या संशोधनात्मक लेखमाला प्रसिद्ध होत होत्या. भूमीचे वैभव व महत्त्व युरोपात प्रस्थापित करणे  आणि अलीकडील संशोधकांस चिकित्सापद्धतीचे आदर्श घालून देणे; या दुहेरी कामगिरीमुळे ;  कीलहॉर्न हे,  पूर्व व पश्चिम यांना सांधणारे खरेखुरे दुवे होत, असे म्हणणे योग्य होईल.

संपादित

कीलहोर्न, फ्रेन्झ