Skip to main content
x

कोल्हटकर, मधुसूदन रामचंद्र

         धुसूदन रामचंद्र कोल्हटकर यांचा जन्म कराड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड येथेच झाले. १९५३ मध्ये एस.एस.सी.च्या परीक्षेत चार विषयांत त्यांनी प्रथमपदाचे पारितोषिक पटकावले. मराठीचे राम गणेश गडकरी, तर संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी घेतली. सामाजिक शास्त्र विषय घेऊन ते १९५९ मध्ये एम.ए.ला पुणे विद्यापीठात पहिले आले. ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्याच वेळी देत होते.

        १९५९-६० या वर्षात ते या आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. दि.१६ मे १९६० पासून आय.ए.एस.अधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेस प्रारंभ केला.

       शासकीय सेवेत काम सुरू केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनातील अर्थ, नियोजन, शेती, अन्न, सामान्य प्रशासन अशा महत्त्वाच्या खात्यांबरोबरच त्यांच्या आवडत्या शिक्षणखात्यातही काम केले. उपसचिव, सहसचिव, तसेच सचिवपदाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण रितीने पार पाडली. त्यामुळेच केंद्र शासनाने सोपविलेली अत्यंत महत्त्वाची कामेही त्यांच्याकडे चालून आली. ३३ वर्षे (१९६० ते १९९३) शासकीय कामे करून त्यांनी कार्याचा आनंद मिळविला. १९८५ ते १९८७ या कालखंडात शिक्षण सचिव म्हणून कार्य करताना त्यांच्यातील विद्यार्थी जागृत होता. त्यांनी शासकीय विधी महाविद्यालय मुंबईमधून एलएल.बी.ची पदवी प्राप्त केली.  सेवानिवृत्तीनंतर म्हणजे १९९३ ते १९९८ या काळात त्यांनी ‘सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्यूनल’चे अहमदाबाद व मुंबई बेंचचे सदस्य म्हणून साडेचार वर्षे काम केले.

        सेवानिवृत्तीनंतरही त्यांंचे वाचन, लेखन, मनन, चिंतन चालू असते. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी, ऑगस्ट २००७ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून फेडरेशन इन अ‍ॅक्शन-द केस ऑफ एज्युकेशन सेक्टर या विषयात पीएच.डी.ची पदवी मिळविली. कोल्हटकर यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे.  ‘एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड नॅशनल डेव्हलपमेंट’, तसेच ‘पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इनोव्हेशन’ या दोन पुस्तकांचे ते लेखक आहेत.

        राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांनी अकरा संशोधनपर लेख लिहिले आहेत. समीक्षक म्हणून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. शैक्षणिकतज्ज्ञ परीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. डॉ.कोल्हटकर यांना प्रशासकीय कामानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने इटलीत चोवीस आठवड्यांचे परदेशगमन करावे लागले. तसेच वॉशिंग्टन येथे अकरा आठवड्यांसाठी जावे लागले. थायलंड, मनिला, सिंगापूर, काठमांडू, सार्क परिषदेच्या निमित्ताने ढाका, इस्लामाबाद येथे जाऊन त्यांनी भारताची बाजू समर्थपणे मांडण्याचे कार्य केले. डॉ. कोल्हटकर यांनी अनेक अभ्यासवर्ग परिषदा, परिसंवाद यांत भाग घेतला आहे. आय.आय.एम, बंगलोर टाटा मॅनेजमेंट सेंटर, पुणे, एनआयबीएम, पुणे, आयआयएम, कोलकाता, इंडियन सोसायटी ऑफ सीए, न्यू दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राइझेस, हैद्राबाद या नामवंत संस्थांच्या प्रशिक्षणवर्गात प्रशिक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जुलै २००५ ते जुलै २००७ पर्यंत काम पाहिले. २०१० च्या या संस्थेच्या अहवालात कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे भाषण छापले आहे. ‘राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ टीचिंग, लर्निंग ऑफ संस्कृत लंग्वेज इन द पिरीयड ऑफ १५०० टू २०००’ हा विषय डॉ. मधुसूदन कोल्हटकर यांनी भाषणात मांडला.

       अलीकडच्या काळात, नोव्हेंबर २००९ मध्ये नवी दिल्ली येथील ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन फेडरॅलिझम’ या भारत सरकारच्या गृहखात्याने आयोजिलेल्या परिषदेत डॉ. कोल्हटकर उपस्थित होते. तसेच मार्च २००९ मध्ये डॉ. वि.म. दांडेकर यांनी पुणे येथे  स्थापन केलेल्या ‘इंडियन स्कूल ऑफ पोलिटिकल अ‍ॅकॅडमी’ या संस्थेत अ क्रिटिकल अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन इन पोस्ट-इंडिपेंडन्स इंडिया’ हे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. गेल्या पन्नास वर्षांत अशा अनेक प्रकल्पांची कामे सतत करण्याचे सामर्थ्य डॉ. कोल्हटकरांकडे आजही आहे.

       शिक्षण क्षेत्राची बांधीलकी त्यांनी केली आहे, त्याबरोबर इतर क्षेत्रांना नाकारले नाही. ज्याचा खास उल्लेख करावासा वाटतो ते एमएसएफसी या महामंडळाने दिलेल्या एप्रिल १९७९ च्या मानपत्रात म्हटले आहे, “डॉ. कोल्हटकर साहेब, आपण आपल्या छोट्या कारकिर्दीत महामंडळाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी रात्रंदिवस झटलात, परिणामी महामंडळाच्या कामात गती व नीटसपणा तर आलाच; पण त्याचबरोबर महामंडळाच्या कार्याची व्याप्तीही अधिक सखोल व विस्तारित झाली,” हे कौतुकास्पदच होय. शासनाच्या विविध विभागांत काम करताना महाराष्ट्राचे अनेक यूजीसी, एनसीईआरटी मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. नियोजन मंडळ इत्यादी संस्थांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या संधीचे त्यांनी देशहितासाठी सोने केले.

     जुलै-डिसेंबर २०१० च्या ‘समाजप्रबोधन पत्रिके’त डॉ. कोल्हटकरांचा ‘यशपाल समितीचा अहवाल - एक गमावलेली संधी’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा उल्लेख करून कै. डॉ.चित्रा नाईक (शिक्षणतज्ज्ञ) यांनी २४ ऑगस्ट २०१० रोजी डॉ. कोल्हटकरांना पत्र देऊन सन्मानच केला आहे.

     प्रशासनाच्या माध्यमातून देशसेवा करून देशविदेशात त्यांनी कराड नगरीची कीर्ती विश्वपातळीवर पोहोचविली, या कार्याच्या गौरवार्थ १९९८ मध्ये ‘कराडभूषण’ हा पुरस्कार ‘आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठान कराड’ यांनी देऊन त्यांचा गौरव केला.

     - डॉ. मधुकर नानकर

कोल्हटकर, मधुसूदन रामचंद्र