Skip to main content
x

कोलटकर, अरुण

रुण कोलटकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. तेथेच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात नाव मिळविले. आजच्या मराठी कवींमधले महत्त्वाचे, ठळक नाव म्हणजे अरुण कोलटकर होय. मर्ढेकरांना गंगाधर गाडगीळांनी ‘दुसरा केशवसुत’ म्हटले, त्याप्रमाणे कोलटकरांना ‘दुसरा मर्ढेकर’ म्हणता येईल इतकी त्यांची कविता सातत्याने प्रयोगशील राहिली. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून त्यांनी वैश्विक साहित्यातील आधुनिक प्रवाह जोडून घेतले. मराठीत अतिवास्तववाद तसा प्रयोगापुरताच राहिलेला आहे. मात्र कोलटकरांच्या कवितेत तो मानसिक गुंतागुंत घेऊन प्रकट होतो.

आजच्या जगण्यातली अर्थशून्यता, अमानुषता, वेदना, क्रौर्य, बेतालपणा, विरोधाभास भयावह आहे. या भयावहतेचे ठोक चित्रण कोलटकरांच्या कवितेत येते. अमानुष अशा महानगरी संस्कृतीत माणूस अधिकाधिक असुरक्षित होत जातो, त्याच्यावर निर्जीव वस्तूंचे सतत, चहूबाजूंनी आक्रमण होत असते, ही जाणीव कोलटकर विलक्षण प्रतिमांमधून व्यक्त करतात. तरसासारखे स्टूल, रानडुकरासारखी मुसंडी मारत येणारा रेडिओ, झडप घालणारे डोंगर, टोळासारखे धुणे वाळत घालायचे चिमटे, अशा प्रकारे अतिवास्तववादी प्रतिमांमधून एक गोठवून टाकणारे भय ते व्यक्त करतात. यंत्रयुग, माणसाच्या मूल भावनांचा झगडा (कामप्रेरणा, अस्तित्ववाद, नातेसंस्कार आणि विकृतींचे प्राबल्य आदी), मृत्यू-संकल्पना आणि अनुभूती यांच्या सीमारेषेवर चिरफाळलेले मन, नेणिवेच्या जगातील स्वप्नवत वाटणारे भासमय अनुभव या सार्‍याचे मूलभूत स्वरूप त्यांच्या कवितेत प्रकट होते. त्यांच्या कवितेची मांडणी सहज, सरल वाटत असतानाच जाणवते की त्यातला आशय भेदक आणि विलक्षण आहे. म्हणूनच त्यांची कविता आजच्या कवितेपेक्षा अधिक थेट, पृथगात्म आणि वैश्विक पातळीवर जाणारी अभंग आहे.

कोलटकरांच्या कवितेत काही विकृत वाटणारे शब्द किंवा अनागरी, अशिष्ट शब्द येतात; पण बहुतेक कवितांतून नागरी जीवनाचा भेदक वेध घेतलेला दिसतो. प्रामुख्याने मुंबई शहरातील व्यावहारिक बोलीभाषेतून तो घेतलेला आहे. त्यांची कविता ही स्वयंभू होती. मर्ढेकरोत्तर काळातील एक नवे वेगळेपण स्वीकारणारी त्यांची कविता सामान्य मराठी माणसांकडून अलक्षित राहिली, तरी त्यातील प्रयोगशीलतेने समीक्षकांना आणि विचारवंतांना आकर्षून घेतले. ‘जेजुरी’ हा त्यांचा इंग्रजी कवितांचा संग्रह आहे. त्याला कॉमनवेल्थ राष्ट्रकुल पुरस्कार लाभला. मराठी कवी वैश्विक पातळीवर पोहोचणे ही दुर्मिळ गोष्ट यामुळे घडली.

‘भिजकी वही’ (२००३) हा त्यांचा मराठी कवितासंग्रह असून या कवितांमधली प्रतिमासृष्टी मानवाच्या यंत्रजड आयुष्यात डोकावणारी आहे. शब्दांचे विरूपीकरण आणि भेदक प्रतिमासृष्टी यांमुळे ही ‘भिजकी वही’ रेखीव कवितांना शब्दरूप अक्षरपण देणारी ठरते. या ‘भिजकी वही’ला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला. २००३ मध्ये त्यांचा ‘चिरीमिरी’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. काळाघोडा फेस्टिवलवर आधारीत ‘कालाघोडा पोएम्स’ आणि ‘सर्पसत्र’ (२००३) हे त्यांचे आणखी लक्षणीय संग्रह होत. ‘प्रास प्रकाशन’ संस्थेने कोलटकरांच्या कवितेला प्रकाश दाखवला. या कवितांचे संकलन ‘द्रोण’मध्ये आहे. त्यांच्या मृत्यूनंतर लोकवाङ्मय गृहाने ‘अरुण कोलटकरच्या कविता’ ह्या संग्रहात त्यांच्या कविता एकत्रितपणे प्रसिद्ध केल्या.

- प्रा. सुहासिनी कीर्तीकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].