कोसंबी, दामोदर धर्मानंद
बहुआयामी संशोधक, वैशिष्ट्यपूर्ण इतिहास संशोधन- पद्धतीचे जनक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म गोव्यातील कोसंबे या गावी झाला. त्यांचे वडील प्रख्यात बौद्ध पंडित, भाषातज्ज्ञ व महात्मा गांधींचे निकट सहकारी होते. शालेय शिक्षण पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल येथे झाल्यानंतर दामोदर कोसंबी १९१८ साली वडिलांबरोबर अमेरिकेत गेले. केंब्रिज येथील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. १९२९ पर्यंत त्यांनी गणित, इतिहास, भाषा या तीन विषयांत बी.एस्सी. ही पदवी मिळविली.
‘संख्याशास्त्र’ हा त्यांच्या खास आवडीचा विषय होता. अनुवंश शास्त्राच्या अभ्यासात त्यांचा ‘कोसंबी थिअरम’ उपयुक्त ठरतो. १९४९ साली शिकागोला भूमितीचे ‘व्हिजिटिंग प्रोफेसर’ म्हणून गेलेल्या कोसंबी यांनी प्रख्यात गणिती आइन्स्टाइन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
कुशाग्र बुद्धिमत्ता, अखंड परिश्रम व चिकित्सक वृत्ती हे संशोधकाला आवश्यक असणारे गुण त्यांच्यात होते. कोसंबी यांनी अनेक विद्याशाखांचा अभ्यास जिज्ञासू संशोधकाच्या नजरेतून केला. विशेष म्हणजे, त्यांचे संशोधन साचेबद्ध मार्गाने जाणारे नव्हते. ‘वैज्ञानिक, संश्लेषणात्मक इतिहास संशोधन पद्धतीचे जनक’ अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासाला त्यांनी पूर्णत: वेगळे वळण दिले. केवळ तारखा व घटना यांमध्ये गुंतून न पडता, व्यक्तिनिष्ठ व घटनानिष्ठ दृष्टिकोनातून इतिहासाचा मागोवा घेत असताना सामाजिक परिस्थिती, प्राचीन वाङ्मयीन संदर्भ हेदेखील कोसंबी महत्त्वाचे मानीत असत. इतिहास संशोधनाच्या जोडीनेच नाणकशास्त्र, मानववंशशास्त्र, पुराणवस्तू संशोधन इत्यादी शाखांतील ग्रंथांचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. त्यांचे एक प्रमुख कार्य म्हणजे, मोहेंजोदारो येथे सापडलेल्या नाण्यांची कालनिश्चिती. नाण्यांची होणारी झीज व त्याला लागणारा काल प्रमाणभूत मानून, ७००० नाण्यांचे वजन करून त्यांनी हा सिद्धान्त मांडला.
दामोदर कोसंबी १९३१ साली नलिनी मडगावकर यांच्याशी विवाहबद्ध झाले. १९३३ पासून पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन केले. तत्पूर्वी, बनारस हिंदू विद्यापीठ व अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथे काही काळ त्यांनी अध्यापन कार्य केले होते.
दामोदर कोसंबी हे खर्या अर्थी चतुरस्र प्रतिभेचे संशोधक होते. इटालियन, जर्मन, फ्रेंच रशियन, लॅटिन, ग्रीक इत्यादी बारा भाषा त्यांना अवगत होेत्या. त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या व निबंधांच्या शीर्षकांवरून त्यांनी हाताळलेल्या विषयांच्या विविधतेची कल्पना येते. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे: ऊर्वशी आणि पुरुखा, गेल्डनरचे ऋग्वेद, सॉक्रेटिसच्या चौकशीच्या निमित्ताने भारतातील जाती आणि मुक्ती, उत्तर हिंदुस्थानातील जातीय संस्थेचे प्राथमिक टप्पे, भारतातील सुती कापडाच्या उत्पादनाचा आणि उपयोगाचा विकास, मार्क्सवादी दृष्टिकोनातून भारतातील कालगणना, भर्तृहरीच्या काव्यातील सर्वसंग परित्यागाचा गुणविशेष.
१९४६ ते १९६२ हा प्रदीर्घ काळ मुंबईच्या TIFR ( Tata Institute of Fundamental Research) या संस्थेत गणित व इतिहास विषयक संशोधन कार्य कोसंबी यांनी अविरत चालू ठेवले.
त्यांचे बहुतेक सर्व लिखाण इंग्रजीत आहे. सातत्याने चालू असलेल्या संशोधनाचे फलित असे त्यांचे अनेक लेख व निबंध प्रसिद्ध झाले आहेत. विविध विषयांशी निगडित असलेले हे लिखाण कोसंबी यांच्या बहुआयामी प्रतिभेचे द्योतक आहे.
१९३० ते १९३६ या काळात त्यांनी गणित- संशोधनात्मक असे आठ निबंध लिहिले. कोसंबी यांनी एकूण १४९ संशोधनात्मक लेख व प्रास्ताविक ग्रंथ लिहिले. त्यांतील काहींचे एकत्रीकरण करून दोन ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत : १) The Study of Indian History’ (१९५६), २) ‘ The Culture and Civilisation of Ancient India in Historical Outline(१९६५).
’Myth and Reality’ ‘Exasperating Essays’ हे त्यांंचे आणखी दोन प्रकाशित झालेले लेखसंग्रह आहेत.
कोसंबी यांची विचारसरणी मार्क्सवादी होती. त्यांनी ‘उत्पादन साधने व उत्पादन संबंध यांतील बदलांचा कालक्रमाने झालेला विकास’ अशी इतिहासाची व्याख्या केली आहे.
दामोदर कोसंबी यांनी १९४७ साली इंडियन सायन्स कोंग्रेसच्या गणित विभागाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांना १९३४ साली संख्याशास्त्रातील संशोधनाबद्दल ‘रामानुजम’ पुरस्कार, १९४९ साली ‘भाषा’ पुरस्कार मिळाला आणि १९६५ साली CSIR ( Council for Scientific and Insutrial Research) तर्फे ‘सायंटिफिक एमिरेट्स’ म्हणून गौरव करण्यात आला.
जागतिक मान्यता प्राप्त गणिती आणि आंतरविद्याशास्त्रीय (Interdisciplinary) इतिहास- संशोधन पद्धतीचे जनक अशी दुहेरी कीर्ति लाभलेले दामोदर धर्मानंद कोसंबी एक चतुरस्र प्रतिभेचे संशोधक म्हणून नेहमी स्मरणात राहतील यात शंका नाही.