Skip to main content
x

कोसंबी, धर्मानंद दामोदर

       र्मानंद दामोदर कोसंबी यांचा जन्म भारतामधल्या गोवा राज्यातील लहानशा खेड्यात झाला. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई, तर वडिलांचे नाव दामोदर होते. लहानपणी त्यांची प्रकृती तोळामासाच होती. त्यांचे केवळ शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपर्यंत झाले. धर्मानंद फर्ग्युसन महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, काशी विद्यापीठ, कोलकात्याचे नॅशनल महाविद्यालय, कोलकाता विद्यापीठ, महात्माजींनी अहमदाबादेत स्थापलेल्या गुजरात विद्यापीठात (पाली भाषा व बौद्ध धर्म या विषयांचे प्राध्यापक, विभागप्रमुख) व अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात एकूण चार वेळा संशोधक साहाय्यक म्हणून निमंत्रित केले गेले. धर्मानंद यांनी साधलेली संस्कारित, चिकित्सा केलेली, संपादित आचार्य बुद्धघोष ‘विशुद्धिमार्ग-विसुद्धिमग्न’ या अभिधर्मविषयक लघुज्ञानकोशांची रोमन लिपीतील आवृत्ती हार्वर्ड विद्यापीठाने प्रथम व भारतीय विद्या भवन प्रकाशनाने देवनागरी लिपीत त्यानंतर प्रथम प्रकाशित केली. हार्वर्ड विद्यापीठाने ग्रंथ प्रकाशित करावा, असे पहिले भारतीय व आपल्या दृष्टीने महाराष्ट्रीय संशोधक पंडित म्हणजे आचार्य धर्मानंद कोसंबी होत.

     १८९७ मध्ये ‘बालबोध’ या मासिकात प्रकाशित झालेला बुद्धाच्या जीवनावरचा लेख वाचून व मग हाती पडेल ते बुद्धचरित्र व बौद्धविचारधारा या विषयांवरची पुस्तके झपाटल्यासारखी वाचून काढून स्वत:चे आयुष्य बौद्धपरंपरेचा प्रचार-प्रसार-विकास यांस वाहून घेण्याचा निर्धार करून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारे बुद्धोपासक म्हणजे धर्मानंद कोसंबी. तरुणपणातच नैराश्यजनक विचारांनी ग्रस्त होऊन, शरीराने व मनाने पार कमकुवत झाल्यामुळे आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचलेले धर्मानंद कोसंबी, तुकाराम महाराजांचे चरित्र, तुकाराम गाथा यांचे पारायण करून, त्यांतून प्रेरणा घेऊन अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी उत्साहित झाले. याच उत्साहित मन:स्थितीत, खिशात पैसा नसतानाही धर्मानंद कोसंबी ज्ञानार्जनासाठी जगप्रवासाला निघाले. कधी बैलगाडी, आगगाडी, आगबोट आणि नाही तर निव्वळ पायपीट करत, तहान-भूक विसरून, जवळजवळ पूर्ण भारतवर्ष, नेपाळ, सिक्कीम, तिबेट, श्रीलंका, ब्रह्मदेश, इंग्लंड, रशिया, अमेरिका (थोडक्यात त्रिखंडी) संचार करून मिळेल तेवढे ज्ञान व अनुभव गाठी बांधतच राहिले. या सर्व स्थळांना पर्यटकांप्रमाणे धावती भेट न देता यांतील बर्‍याच ठिकाणी बर्‍यापैकी मुक्काम करून धर्मसाधना करणारा चिनी ह्युएनत्संग, फाहिआन, इत्सिंग यांचा नकळत अनुसार करणारा श्रेष्ठ प्रवासी, राहुल सांकृत्यायनांच्या आधीचा जागतिक ज्ञानक्षेत्राचा एक ज्ञानवेचक प्रवासी ठरले.

     बौद्धधर्मविषयक इतके विपुल व दर्जेदार लेखन त्यांनी केले, की त्यांतील अनेक ग्रंथांचे हिंदी-गुजराती इत्यादी भाषांत अनुवाद करण्याचा मोह रत्नपारखी अभ्यासकांना आवरता आला नाही. कित्येक ग्रंथांच्या कितीतरी पुनरावृत्त्या काढाव्या लागल्या. उच्च सारस्वत ब्राह्मण कुळात जन्मलेल्या, हीन वागणूक प्राप्त न झालेल्या धर्मानंदांनी बौद्धधर्माचे वैश्विक कार्य प्रज्ञेने जाणून स्वेच्छेने केवळ बौद्धधर्माची उपासक-दीक्षाच नव्हे, तर श्रामणेर-दीक्षा आणि पुढे जाऊन उपसम्पदापूर्वक बौद्ध-भिक्षु-दीक्षा धर्मद्वीप मानल्या गेलेल्या श्रीलंकेत सुमंगलाचार्यांसारख्या थोर महाभिक्षूंकडून घेऊन ‘भगवान बुद्ध’ हे अद्वितीय पुस्तक लिहिले.

     या पुस्तकाची महती ओळखून भारताच्या केंद्र शासनाने राष्ट्रीय पातळीवर भव्य रितीने साजर्‍या केलेल्या बौद्धधर्माची २५०० वर्षे (2500 Years of Buddhism) या राष्ट्रव्यापी ज्ञानसोहळ्यात मूळ मराठी भाषेसहित इतर तेरा राष्ट्रीय भाषांमधून या पुस्तकाचा अनुवाद भारतीय साहित्य अकादमीतर्फे प्रसिद्ध केला व त्यांतील हिंदी अनुवादाची एक छापील प्रत तत्कालीन राष्ट्रपती व भारतीय धर्म-तत्त्वज्ञानाचे मूलग्रही गाढे अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २४ ऑक्टोबर १९५६ या दीक्षा दिनाच्या आधीच २२ मे १९५६ रोजी सादर करण्यात आली. धर्मानंदांच्या कार्यकाळात अशोकाच्या शिलालेखांचे धार्मिक-सांस्कृतिक-राष्ट्रीय-ऐतिहासिक महत्त्व जाणून, चिकित्सक लेखन भारतीयेतर, विशेषत: पाश्चात्य बौद्ध अभ्यासकांकडून झाले होते. ज्या अशोकस्तंभाच्या चक्राचा प्रतीक म्हणून स्वीकार भारतीय राष्ट्रध्वजावर झाला, त्या अशोकाच्या एकूण शिलालेखांपैकी महत्त्वाच्या शिलालेखांचा मराठी अनुवाद करून त्यावर महत्त्वाचे चिकित्सक लेखन करणारे पहिले भारतीय महाराष्ट्रीय विद्वान म्हणजे धर्मानंद कोसंबी. पुढे श्री.व्यं. केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशात अशोकाच्या शिलालेखांची सुयोग्य दखल, त्यासाठी पुष्कळ पाने खर्चून घेतली आणि आचार्यांकडून स्फूर्ती घेऊन ज्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आचार्यांनी पालीचे अध्यापन केले, तेथेच पुढे ज्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली, त्या ना.वा. तुंगार यांनी ‘अशोकाचा राजधर्म’ या नावाची संस्थाच पुण्यातील नारायण पेठेतील मुंजाबाच्या बोळात, राहत्या घरात स्थापून त्या विषयावर सहस्राधिक व्याख्यान-यज्ञांचे सत्र यशस्वी रितीने पार पाडले. त्यांचे स्फूर्तिस्थान होते ते अर्थातच आचार्य धर्मानंद कोसंबी.

     अनेक बौद्धसंस्था व प्रार्थना मंदिरांसारख्या बौद्धेतर-संस्थांशी आचार्यांचा केवळ कार्यरूप संबंध होता एवढेच नाही, तर प्रार्थना समाजाच्या व्यापक समाज सुधारणात्मक कार्याची माहिती ‘सुबोधपत्रिके’सारख्या बहुवाचित दैनिकातून अनेकविध लेख लिहून धर्मानंदांनी जनतेपर्यंत पोहोचवली.

     विवाह झालेला असूनही संकुचित स्वरूपाच्या कौटुंबिक आयुष्यात न रमता, घर सोडून, जागतिक कुटुंबकार्य करत असतानाही विवाहप्राप्त अशा स्वत:च्या कुटुंबासाठीची कर्तव्ये धर्मानंद कधीही विसरले नाहीत. भिक्षुपद स्वीकारून, विशाल मानव कुटुंबाचे कार्य पुरेसे आटोपून धर्मानंद मात्र पुन्हा एकदा गृहस्थ झाले व त्याही आधी कालिदासाचा महत्त्वाचा शब्द वापरून सांगायचे झाले, तर या ‘सर्वोपकारक्षम’ गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यांचा भिक्षू जीवनातही त्यांना कधीच विसर पडला नव्हता. माफक प्रमाणात का होईना, पण कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरी करून अर्थार्जन साधणे, मुलाच्या शिक्षणाची पुरेपूर काळजी व व्यवस्था करणे, रुग्ण व नातेवाइकांना आर्थिक मदत व वडिलांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी पार पाडणे, अशा कर्तव्यांच्या बाबतीत धर्मानंदांनी कधीच कसूर केली नाही. त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक एका गोष्टीला मात्र मुकले. माया-मोहपाश व डोळ्यांतील अश्रू यांना टाळण्यासाठी निग्रह कठोर धर्मानंदांनी आसन्नमरण अवस्थेतही एकाही कुटुंबियाला, जवळच्या वा दूरच्या नातेवाइकाला; वर्धास्थित पवनार आश्रमात भेटीस येण्यासाठी मरणापर्यंत मज्जाव केला. पण धर्मानंद एकाच वेळी रामकृष्ण भांडारकरांना अपेक्षित असे ‘ज्ञानयोगी’ व ‘कर्मयोगी’ असे दोन्ही एकस्थ होते व त्यांचे वर्णन करण्यास गीतेतील पदसंहती ‘स संन्यासी च योगी च’ ही अतिशय समुचित वाटते.

     एकदा बौद्ध विचारधारा सतत प्रवाहित ठेवण्याचे जीवनकार्य अंगीकारले म्हटल्यावर आपल्या पश्चातही ही गंगा वाहती कशी राहील व आटली कशी जाणार नाही या दूरदर्शी विचाराने आचार्यांनी, विशेषत: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन करत असताना भक्कम अभ्यासाची बैठक असलेली, संशोधनाची कुवत असणारी,सतत व्यासंगी राहणारी छात्रांची एक मांदियाळीच जन्माला घातली. याला आपल्या भारतीय परंपरेत ‘शिष्यवंश’ असे म्हणतात.

     रशियातील वास्तव्यात रशियन भाषेच्या ज्ञानाबरोबरच रशियन क्रांती, त्या आधीची फ्रान्सची क्रांती, मार्क्सवाद, समाजवाद इत्यादी विषयांवरील ग्रंथांच्या वाचन-मननाने समाजवाद-साम्यवाद यांकडे धर्मानंद ओढले गेले. अशा प्रकारच्या विचारांचा काही स्वरूपात पाली-बौद्ध ग्रंथांत, अशोकाच्या शिलालेखात आढळ झाल्यावर त्यास अनुसरून आचार्यांनी ‘सुबोधपत्रिके’सारख्या दैनिकातून क्रमश: लेख लिहिले. पैकी तीन लेख एकाच मुख्य मथळ्याखाली होते. त्यांचा विषय मराठी-हिंदी कामगारांची स्थिती सुधारण्यास उपाय : १) हिंदुस्थान सरकारचे कर्तव्य, ‘आलसस्य बलं राजा’, २) हिंदी धनिकांचे कर्तव्य, ३) उपोद्घात ४) नगरपालिकांचे कर्तव्य असा होता. या विषयावर लिहिताना धर्मानंदांनी अचूकपणाने ज्ञानेश्वरीतील अशा विचारांची पार्श्वभूमी असणाऱ्या ओव्यांचे उद्धरण दिले हे त्यांचे विशेष.

     १९३० मध्ये महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यविषयक सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग व तुरुंगवास, अनेक सत्याग्रही छावण्यांचे पुढारीपण व एकूणच मानव समतेविषयी आंतरिक ओढ असल्याने १९३७ मध्ये त्यांनी विपुल वस्तीच्या मुंबईमध्ये ‘बहुजनविहार’ स्थापण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

     महात्मे हे सर्वधर्मियही असतात व सर्वधर्मातीतही असतात व म्हणूनच खरेखुरे ‘निधर्मी’ही असतात. त्यांचा धर्म असलाच तर एकच : ‘सर्व -मानव-कल्याणकारी -धर्म.’ धर्मानंद तसेच होते. म्हणूनच सर्व धर्मियांसाठी त्यांनी बहुजन विहाराची द्वारे खुली ठेवली होती. बुद्धाने बोधिप्राप्तीनंतर म्हटले होते, ‘अपारुता तेसं अमतस्स द्वारा’ (तेसं म्हणजे त्यांच्यासाठी, अमतस्स-अमृताची, द्वारे म्हणजे कवाडे, अपारूता-अपावृत, उघडी आहेत.) पण धर्मानंद केवळ ब्राह्मणवादी, जैनवादी, बौद्धवादी नव्हते. ते राष्ट्रवादी, गांधीवादी, प्रार्थना समाजवादी, बहुजनविहारवादी, विश्वमानव-कल्याणवादी विश्वपुरुष होते. विशाल, उदार, असीम, परमेश श्रीकृष्ण भगवान जे याविषयी म्हणाला, तसेच ते होते. ‘वाद्यांमधला (वादी याचे बहुवचन, वाद्य याचे नव्हे) मी ‘वाद’ आहे. (शब्द आहे.) ‘वाद: प्रवदतामहम्’ (गीता, १०.३२) वाद म्हणजे शब्द व शब्द म्हणजे Logos ( At first there was God, the word was with God and the word was God. Bible) हेच उपनिषदांचे व वाक्यपदीयकार भर्तृहरीचे ‘शब्दब्रह्म’.

     ब्राह्मणवादी... गांधीवादी... मार्क्सवादी... विश्वकल्याणवादी असे आपणांस भासणारे धर्मानंद खरे तर होते ‘धर्मानंदवादी’. गांधीजींचा संलेखना सोडण्याचा आग्रह त्यांनी मानला; पण अखेर संलेखना स्वीकारलीच. ते बौद्ध भिक्षू झाले आणि पुन्हा गृहस्थही झाले. या सर्वांचे कारण म्हणजे अंधपणाने गांधीवाद, बौद्धवाद, प्रार्थना-समाजवाद, तुकारामवाद, मार्क्सवाद पूर्णपणे स्वीकारणारे ते नव्हते. ते वैचारिक निवड करणारे ‘निवडक’ होते. त्यांचा वाद ‘वि-वेचक’ वाद (मराठीतील ‘वेच’ करणारा हा शब्द) होता. त्यांचा ism हा  Electecism होता.

     गांधीजींचा मान राखायचा म्हणनू संलेखनाव्रताची केलेली ‘धारणा’ त्यांनी ‘पारणा’ रूपात परिवर्तित केली, पण करण्यासाठी काही उरलेले नाही. म्हणूनच आपण ‘कतकिच्च’ (कृतकृत्य) झालो आहोत या प्रत्ययाने त्यांनी ४ जून १९४७ मध्ये, विदर्भात वर्धा येथील पवनार आश्रमात देह ठेवून निर्वाणग्रामी महाप्रस्थान केले.

- प्रा. डॉ. मो.गो. धडफळे

कोसंबी, धर्मानंद दामोदर