Skip to main content
x

कर्णिक, मधू मंगेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ (ता. कणकवली) या गावात जन्मलेल्या मधू मंगेश कर्णिक यांनी शाळकरी वयातच साहित्य निर्मिती सुरू केली.

१९५६ ते १९६६ या काळात कर्णिकांनी कारकून म्हणून एस.टी.मध्ये नोकरी केली. १९६६ ते १९६९ काळात राज्य सरकारचे प्रकाशन अधिकारी म्हणून गोव्यात होते. १९६९ ते १९७३ या काळात मुंबईतील सचिवालयात प्रसिद्धी संचालक व मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली. १९८१ ते १९८३ या काळात ते महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळात महाव्यवस्थापक पद भूषवीत होते. १९८३मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी पूर्ण वेळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर लेखनाबरोबर मौलिक समाजकार्य केले.

लौकिक शिक्षण कमी असल्याने सुरुवातीला त्यांना एस.टी.त नोकरी करावी लागली. पण आपल्या जन्मदत्त प्रतिभेमुळे पुढे अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. वाङ्मयीन, सांस्कृतिक, औद्योगिक, विकासात्मक आणि प्रशासन या क्षेत्रांत त्यांचा चैतन्यशील सर्वसंचार अनेकांना प्रेरणादायी ठरला.

वास्तवदर्शी कादंबरीकार- 

मधू मंगेश कर्णिक उर्फ मधुभाई हे मुख्यतः कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. १९५४ साली ‘सत्यवादी’च्या दिवाळी अंकात त्यांची ‘सुभद्रा’ ही पहिली कथा प्रकाशित झाली. १९५८ साली मालवण येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा पहिला कथासंग्रह ‘कोंकणी ग वस्तीऽऽ’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजपर्यंतच्या काळात त्यांचे ३३ कथासंग्रह प्रकाशित झाले. १९६० नंतरच्या कालखंडातील मराठी लघुकथेच्या क्षेत्रामधील एक प्रमुख लोकप्रिय कथाकार म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. विविध भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कथांचे अनुवाद झालेले आहेत. ‘तोरण’ (१९६३) व ‘तहान’ (१९६६) या कथासंग्रहांना उत्कृष्ट साहित्याची पारितोषिके लाभली. 

मधुभाईंची पहिली कादंबरी ‘देवकी’ १९६२ मध्ये प्रकाशित झाली. तिला ‘मॅजेस्टिक पुरस्कार’ लाभला. आजवरच्या १० कादंबर्‍यांमधून मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंत, समाजजीवनातील दुःख, दैन्य, दारिद्य्र, नियतीचे अतर्क्य खेळ, राजकीय सत्तास्पर्धा, औद्योगिक आणि नोकरशाही जगातील निर्दयता आणि दंभ यांबरोबरच मानवी मनातील सात्त्विकता, सत्य आणि न्याय यांसाठी लढणारी माणसे कर्णिकांनी सहृदय अलिप्ततेने उलगडून दाखवली. ‘माहीमची खाडी’ (१९६९) या त्यांच्या कादंबरीला मराठी साहित्यातील ‘मैलाचा दगड’ मानले जाते. महानगरीय झोपडपट्ट्यांचे पहिल्यांदाच वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे अन्य भारतीय भाषांतून लाखो वाचकांपर्यंत पोहोचवली गेली. ‘देवकी’ (१९६२), ‘सूर्यफूल’, ‘भाकरी आणि फूल’, ‘वारूळ’ (१९८८), जुईली  या कादंबर्‍यांवर दूरदर्शन मालिका झाल्या. ‘संधिकाल’ (२००१) ही त्यांची अलीकडील कादंबरी. १०० वर्षांच्या प्रदीर्घ कालपटावर तीन पिढ्यांचे बदलते जीवन चित्रण या कादंबरीत करताना मधू मंगेश कर्णिक यांची प्रतिभा पूर्ण विकसित झाल्याचे दिसते.

कथा-कादंबर्‍यांबरोबरच कर्णिक यांनी वेधक ललित लेखन केले आहे. आई, वडील, बहीण अशा जवळच्या नात्यांतील माणसांची ‘लागेबांधे’मधील हृदयंगम व्यक्तिचित्रे वाचकांना आजही भूल घालतात. ‘जिवाभावाचा गोवा’मधील ललित लेख म्हणजेच एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराने जिवंत रंगांनी रेखाटलेली निसर्गचित्रे आणि पोर्ट्रेटस आहेत. या पुस्तकाला अनंत काणेकर पुरस्कार लाभला. ‘सोबत’, ‘अबीर गुलाल’, ‘माझा गाव माझा मुलूख’, ‘नारळपाणी’ हे त्यांचे ललितलेख-संग्रहही वाचकप्रिय झाले.

काव्यसंपदा-

‘बालसन्मित्र’च्या १९४५च्या अंकात वयाच्या १२व्या वर्षी मधू मंगेश यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. ‘जगननाथ आणि कंपनी’ व ‘शाळेबाहेरील सौंगडी’ ही त्यांनी बालवाचकांना दिलेली खास भेट होय. कर्णिकांचे साहित्य शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकांपासून विश्वविद्यालयीन पुस्तकांपर्यंत अभ्यासाप्रीत्यर्थ लावण्यात आलेले आहे.

‘देवकी’ (मराठी नाटक), ‘केला तुका...झाला माका’ (मालवणी नाटक), ‘घुंगरू’ (हिंदी चित्रपट कथा) या विविध साहित्य प्रांतांमधून कर्णिकांनी मुशाफिरी केली. १९८९ मध्ये भरलेल्या ‘जागतिक मराठी परिषदे’च्या विद्यमाने प्रसिद्ध झालेल्या, ‘मराठी जगत’ या वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले. इंग्रजी भाषेमध्ये ‘आन्त्रप्रिनरशिप  डेव्हलपमेन्ट’ या ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे. कवी केशवसुतांपासून नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत १०० वर्षांची मराठी कविता परंपरा अधोरेखित करणारा, मधू मंगेश कर्णिक यांनी संपादित केलेला ‘आधुनिक मराठी काव्यसंपदा’ हा काव्यग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाला आहे.

मधू मंगेश कर्णिक यांच्या कविता ‘मौज’, ‘साधना’, ‘दीपावली’ आदी दर्जेदार दिवाळी अंकांमधून अधून-मधून वाचायला मिळत असत. पण ‘कविता हे आपले खासगी शेत आहे’ असे ते म्हणत असत. अखेर रसिकांच्या आग्रहावरून ‘मॅजेस्टिक’तर्फे ‘शब्दांनो, मागुते या’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. विलोभनीय निसर्गचित्रे, उत्कट शृंगाररंग, तरल प्रीतीचे मुग्ध लावण्य, गावाकडील माणसांची सुखदुःखे, मानवी जीवनातील श्रेयस आणि प्रेयस यांचा चिंतनपर शोध; अशा विविध स्तरांवर हा कवितासंग्रह लक्षणीय ठरला आहे. ही कविता पारंपरिक वळणाची असली, तरी तिच्यातील मुरलेला काव्यरस, रसिकांची तहान वाढवत नेतो.

मधू मंगेश कर्णिक यांनी ‘साहित्य अकादमी’, ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘महाराष्ट्र राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ’, ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ आदी संस्थांचे सदस्य सल्लागार म्हणून काम पाहिले. शासनाच्या मराठी भाषा उच्चाधिकार समितीचे ते सदस्य होते. सध्या ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आहेत.

मधू मंगेश कर्णिक यांनी आपल्या मिठ्ठास वाणीने विविध क्षेत्रांतील अनेक माणसे जोडून घेतली. संघटन आणि प्रशासन कौशल्याने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची स्थापना केली. आपल्या जन्मगावी, करूळ येथे माध्यमिक विद्यालय काढले. अलीकडेच ‘शुभदा कर्णिक ग्रंथालय आणि मुक्त वाचनालय’ स्वतःची जमीन देऊन उघडले. ‘बॅ.नाथ पै वनराई ट्रस्ट’ची स्थापना करूळ इथे करून हजारो झाडे लावली. या वनराईचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी त्यांनी देणगीदारांसाठी, ‘We will not print the advertisments,we will plant the advertisment’ ही अभिनव घोषणा दिली.

कणकवली येथे ‘कै. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ची स्थापना करून कोकणातील नव्या रंगकर्मींना आणि संगीत कलावंतांना एक हक्काचे व्यासपीठ त्यांनी मिळवून दिले. या संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे राज्य स्तरावरील एकांकिका स्पर्धा आणि संगीत महोत्सव आयोजित केले जातात. कोकणातील लोककलांना उठाव देण्यासाठी ‘कोकण कला अकादमी’ची स्थापना कर्णिक यांनी केली. दशावतार, चित्रकथी, लळित, नमन खेळे, जाकडी नृत्य, कोळी नृत्य, तारपा, आगरी लोकगीते, वारली लोककला या सगळ्या कोकणकलांचा संगम साधून देशाच्या राजधानीपर्यंत कोकणचा लोक आवाज पोहोचवला. अकादमीच्या माध्यमातून चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार आणि लोककलाकार यांच्यात कलाविचारांचे आदान-प्रदान केले.

मधू मंगेश कर्णिक यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयांच्या अ‍ॅकेडेमिक कौन्सिलचे सन्माननीय सदस्य म्हणून तीन वर्षे मौलिक योगदान दिले. भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा पद्मपुरस्कार त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

‘कोमसाप’: अभिजात महाकादंबरी-

१९९० मध्ये रत्नागिरी इथे झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुभाई निवडून आले. आपण ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना करत असल्याची घोषणा त्यांनी या अध्यक्षपदावरून केली. या ‘कोमसाप’साठी गेली १८ वर्षे त्यांनी तन-मन-धनाने अविश्रांत मेहनत करून वाङ्मयीन क्षेत्रात एक अद्भूतपूर्व इतिहास घडवला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये अनेक दौरे आणि कार्यक्रम करून हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांचे प्रचंड मोहोळ निर्माण केले. निरलस सेवाभाव, चोख आर्थिक व्यवहार, सुयोग्य नियोजन आणि वाङ्मयीन चैतन्य हे आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांनी संस्थेच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांकडे संक्रमित केले. खेड्या-पाड्यांतील शेवटच्या माणसापर्यंत साहित्य विचार कसा पोहचवावा, याचे एक आदर्श उदाहरण आपल्या कृतिशीलतेने मधुभाईंनी महाराष्ट्राला घालून दिले.

‘कोमसाप’ ही मधू मंगेश कर्णिक यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे एक अभिजात महाकादंबरी आहे, असे वाङ्मयीन बुजुर्ग म्हणतात. या संस्थेच्या ५० शाखांच्या जाळ्यातून सांस्कृतिक उपक्रम सतत चाललेले असतात. मधुभाईंच्या मार्गदर्शनाखाली ‘झपूर्झा’ हे संस्थेचे द्वैमासिक निघते. गेल्या १८ वर्षांत ५०पेक्षा अधिक जिल्हा साहित्य संमेलने आणि ११ मुख्य साहित्य संमेलने ‘कोमसाप’तर्फे आयोजित करण्यात मधुभाईंनी पुढाकार घेतला. केवळ कोकणातलेच नव्हे तर महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील थोर साहित्यिकांनी या संमेलनांमधून सहभागी होऊन मधुभाईंच्या सर्वस्पर्शित्वाला दाद दिली.

आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या मालगुंड या जन्मग्रामी त्यांचे स्मारक उभारून मधू मंगेश कर्णिक यांनी ऐतिहासिक कार्य केले. १९९३ साली निर्माण झालेले हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि एकमेव कविस्मारक आहे. मराठी भाषिकांचे ते ‘काव्यतीर्थ’ झालेले आहे. भारतातील असंख्य मराठी प्रेमी दरवर्षी हजारोंच्या संख्येने या स्मारकाला भेट देतात. कवी केशवसुतांचे १८६६ पूर्वीचे जन्मघर, तत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन, स्मारकाची भव्य वास्तू, आधुनिक मराठी कवितेतील नामवंतांची माहिती करून देणारे प्रशस्त काव्यदालन, खुला रंगमंच, कविता संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका, केशवसुत उद्यान व काव्यशिल्पे हे सारे पाहून मधू मंगेशांच्या कलात्मक दूरदृष्टीला मराठीप्रेमी दाद देतात.

अखंड उद्यमशीलता, सौजन्यशील स्वभाव, अथक कार्यक्षमता, संघटन कुशलता आणि वाङ्मयीन सर्जनशीलता या गुणसमुच्चयाने ‘मधू मंगेश कर्णिक’ ही आता केवळ सही राहिलेली नाही. ती एक अमीट नाममुद्रा झाली आहे.

- डॉ. महेश केळुसकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].