Skip to main content
x

कर्वे, दत्तात्रेय गोपाळ

     दत्तात्रेय गोपाळ कर्वे यांचा जन्म पुणे येथे झाला. ते एक वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या आईनी घरची सर्व जबाबदारी सांभाळून दत्तात्रेय यांचा सांभाळ केला. त्यांचे शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्गसन महाविद्यालय या संस्थांमध्ये झाले. त्यांनी  1921 मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यांच्यावर अर्थशास्त्रज्ञ वा. गो. काळे यांचा प्रभाव होता. कर्वेे  डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले आणि फर्गसन महाविद्यालयात 1923 मध्ये आपल्या गुरुसमवेत ते अर्थशास्त्राचे अध्यापन करू लागले. ते 1935 मध्ये सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्राचार्य पदावर बदली होऊन गेले. पुढे त्यांनी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय काढण्यासाठी प्रयत्न केले. ते 1943 मध्ये या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. त्यांनी या महाविद्यालयाच्या कार्याला व कारभाराला योग्य दिशा दिली. कर्वे 1959 ते 1961 या काळात पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.

     सहकार हे कर्वे यांचे मुख्य कार्यक्षेत्र होते. या क्षेत्राचा अभ्यास करताना त्यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सहकाराविषयक धोरणे आणि सहकारी संस्था यांच्याशी सतत संपर्क राखला. भारतातील ग्रामीण जीवनाचा उद्धार करण्याचे सहकार हे योग्य साधन आहे, असे कर्वे यांचे मत होते. त्यामुळे सहकाराचे तत्त्व आणि त्याचे तंत्र-मंत्र यांचा खेड्यापाड्यात प्रचार करून सहकार तेथे प्रत्यक्षात यायला हवा, अशी त्यांची धारणा असल्यामुळे त्यांनी सहकाराचा प्रसार जाणीवपूर्वक केला. कृषी अर्थशास्त्र प्रगत होण्यासाठी त्यांनी सहकारचा पुरस्कार केला.

     कर्वे यांना 1962 मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज, नेदरलँड यांचे सन्माननीय सभासदत्व मिळाले. याच काळात ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षही होते. 1960-1962 या काळात बँक ऑफ इंडियाचे सहसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या सहकार प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्षस्थानही भूषविले. तेथील त्यांच्या लक्षणीय कामामुळे सहकार चळवळीला दिशा व गती प्राप्त झाली. व्हिएना येथे 1966 मध्ये झालेल्या 23 व्या जागतिक सहकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मान कर्वे यांना मिळाला होता. सहकार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी ‘को-ऑपरेटिव्ह मुव्हमेंट अ‍ॅण्ड सबस्टन्स्’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

    कर्वे यांनी अर्थशास्त्रीय विषयांवर इंग्रजी व मराठी भाषांमधून बरेच लेखन केले आहे. त्यांनी इंग्रजीत राज्यशास्त्राविषयीचे निबंध, ग्रंथही लिहिले आहेत. ‘अर्थशास्त्र’ (1927) व ‘भारतीय अर्थशास्त्र’ (1929) व हे दोन ग्रंथ लिहिताना त्यांचे गुरू वा.गो.काळे यांचे सहकार्य त्यांना लाभले होते.

    ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात कर्वे यांनी अर्थशास्त्राची मूलतत्त्वे सामान्य मराठी माणसाला कळतील अशा सोप्या व सुलभ भाषेत विशद केली आहेत. न्यायमूर्ती रानडे यांनी 1892 मध्ये ‘हिंदी अर्थशास्त्र’ या शीर्षकार्थाचा निबंध इंग्रजीत लिहिला होता. त्याकाळी हा निबंध नावाजला गेला. या निबंधावरून कर्वे यांना आपल्या ‘भारतीय अर्थशास्त्र’ या ग्रंथाची मूळ कल्पना सुचली होती. आपल्या ग्रंथात कर्वे यांनी रानडे यांची अर्थशास्त्रविषयीची प्रवर्तक विचारसरणी सविस्तरपणे मांडली होती. हिंदी कारखाने (1942) हेही कर्वे यांचे पुस्तक उल्लेखनीय आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात भारतातील कारखानदारी क्षेत्राची भरभराट झाली. भारताच्या भविष्यकाळातील आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ही कारखानदारी कशी फायदेशीर ठरणार आहे, त्याचे विस्तृत विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे.

     थोडक्यात कर्वे यांचे अर्थशास्त्रातील कर्तृत्व पाहता, भारत स्वतंत्र होण्याआधी व स्वतंत्र झाल्यावर ज्यांनी अर्थशास्त्र विषयात मोलाचे कार्य केले आहे अशा अर्थशास्त्रज्ञांमध्ये त्यांची गणना करावी लागेल. अर्थशास्त्रातील कर्वे यांचे कार्य हे थोर अर्थशास्त्रज्ञ वा. गो. काळे, धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या कार्याच्या तोडीचे आहे.

- अशोक ठाकूर

कर्वे, दत्तात्रेय गोपाळ