Skip to main content
x

कर्वे, दत्तात्रेय नारायण

प्रज्ञानानंद सरस्वती

प्रज्ञानानंद सरस्वती म्हणजेच पूर्वाश्रमीचे दत्तात्रेय नारायण कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात गिम्हवणे येथे गार्ग्य गोत्री, कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव गंगा होते. दत्तात्रेयाचे लाडके नाव दत्तू असून तो आपल्या वडिलांच्या कीर्तनात टाळ घेऊन साथ करीत असे. त्याचे वडील शिक्षक होते. मुरुड-जंजिरा येथील माध्यमिक शाळेतून ऑक्टोबर १९१३ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण होऊन दत्तू बडोदा येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेला आणि संस्कृत मुख्य विषय घेऊन १९१८ मध्ये बी.ए. झाला. पुढे सहा वर्षांनी एस.टी.सी. झाला.

त्यांच्या मनावर रामदास स्वामी आणि लोकमान्य टिळक यांचा विशेष प्रभाव होता. सरकारी नोकरी करायची नाही या निश्चयामुळे त्यांनी काही काळ मिशन स्कूल, तसेच काही काळ वसईच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली व नंतर कांजी धरमसी हायस्कूल, चिंचणी (तारापूर) या शाळेत सोळा वर्षे अध्यापकी केली. ते संस्कृत, गणित व इंग्रजी शिकवीत असत आणि घरीसुद्धा शिकवण्या करीत.

नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांनी १९१५ साली श्रीधर रामचंद्र जोशी यांची कन्या द्वारका हिच्याशी विवाह केला. त्यांनी १९१५ ते १९२९ दरम्यान गृहस्थधर्माचे आदर्श पालन केले. त्यांना दोन अपत्ये झाली; पण दुर्दैवाने दोन्ही जगली नाहीत. अध्यापन कार्य करीत असतानाच कर्वे यांनी पारमार्थिक वाङ्मयाचे विपुल वाचन, मनन केले होते. त्यांची मूळ वृत्ती वैराग्याची होती. वाचन, मननाने ती तीव्र होत गेली. कर्वे यांची १९२९ साली श्रीधरस्वामी बिडवाडीकर ऊर्फ रावजीबुवा यांच्याशी गाठ पडली. बुवांच्या दर्शनाने कर्वे प्रभावित झाले व त्यांनी बुवांकडून तेरा अक्षरी गुरुमंत्र मिळविला. भक्तिज्ञानाची तळमळ तीव्रतर झाल्याने अधिक मार्गदर्शन मिळावे म्हणून ते पुन्हा रावजी बुवांकडे पोहोचले. ‘‘साडेतीन कोटी जप करून ये, मग पुढचा मार्ग सांगेन,’’ अशी बुवांची आज्ञा झाली. कर्वे यांनी शाळेच्या मधल्या सुट्टीचाही उपयोग करून साडेचार कोटी जप सिद्ध केला व ते पुन्हा बुवांकडे गेले. पुढील मार्गदर्शनाचा आग्रह करताच बुवांनी उत्तर दिले, ‘‘राम तुला सर्व सांगेल.’’ हा आशीर्वाद समजून कर्वे यांनी साधना खडतरपणे, तीव्रपणे चालू ठेवली. १९३१ च्या सुमारास त्यांची पहिली भेट तारापूरच्या श्री गंगादासबाबांशी झाली. हे बाबा संत तुलसीदासांचे परमभक्त होते. बाबांच्या सात-आठ वर्षांच्या सान्निध्यामुळे कर्वे यांना तुलसीदास रचित ‘रामचरितमानस’ याचे जणू वेडच लागले. बाबा गंगादासांनी एका मध्यरात्री शिवपूजेतून निवृत्त होऊन प्रसन्नपणे कर्वे यांना सांगितले, ‘‘अब ज्ञान का रहस्य एक ही बात में कहूँगा... जैसे है वैसा रहना, कुछ बनना नहीं।’’ अशा तऱ्हेने श्री रावजीबुवा व बाबा गंगादास हे दोघे जण कर्वे यांचे सद्गुरू होत!

पोटे स्वामींनी १८ जानेवारी १९४३ रोजी कर्वे यांचे विधिवत ‘प्रज्ञानानंद सरस्वती’ असे नामकरण केले. अशा रीतीने दत्तात्रेय नारायण कर्वे ‘प्रज्ञानानंद’ बनले व त्यांचा उच्च आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. प्रज्ञानानंदांनी पहिली शिष्या म्हणून आपल्या पत्नीलाच दीक्षा दिली. त्यानंतर दीड वर्षानेच तिचा अचानक मृत्यू झाला. १९४६ च्या रझाकारांच्या जुलमातून व छळातून गरीब जनतेची सुटका व्हावी म्हणून संन्यासी प्रज्ञानानंदांनी ‘हिंदूंनो संघसंपन्न व्हा’, या अर्थाचे समाज-जागृतीचे काव्य केले आणि केसरीने ते प्रसिद्ध केले. आपल्या आयुष्यातील शेवटची उणीपुरी २५ वर्षे त्यांनी रामध्यान, राममंत्र, रामायणावर प्रवचने व आध्यात्मिक लेखनात व्यतीत केली. त्यांनी विपुल ग्रंथरचना केली.

‘संगीत समश्लोकी गीता’ व ‘श्री गीता कीर्तन तरंगिणी’ हे गीताविषयक ग्रंथ; ‘अभिनव रामायण’ आणि ‘वेदान्तसार अभंग रामायण’ हे रामायण विषयक ग्रंथ; ‘ब्रह्मस्तुती’ व ‘वेदस्तुतिभास्कर’ हे श्रीमद्भागवतातील तत्त्वविवेचक अंगावरील ग्रंथ; ‘श्री परमामृत प्रकाश’ व ‘श्री गुरुगीता प्रबोधिनी’ हे अद्वैत वेदान्तनिष्ठ साधकांना मार्गदर्शक ठरणारे ग्रंथ आणि या सर्वांवर कळस म्हणजे रामचरितमानसवरील प्रचंड हिंदी-मराठी ग्रंथ ही त्यांची प्रचंड ग्रंथसंपदा विस्मयचकित करणारी आहे.

‘रामचरितमानस’विषयीचे प्रज्ञानानंदांचे कार्य पाहून वाटते, की विसाव्या शतकात महाराष्ट्रात संत तुलसीदासच अवतीर्ण झाले असावेत. ज्योतिष, मंत्र, तंत्र, वैद्यक या शास्त्रांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शेतकरी, सुतार, गवंडी, माळी अशी कुणीही व्यक्ती त्यांच्यापाशी आली, की ते त्यांच्या धंद्यातील समर्पक दृष्टान्त देऊन अध्यात्म पटवून देत.

प्रज्ञानंद सरस्वती यांची लोकप्रियता एवढी, की रामायणावर हिंदीतून प्रवचने करण्यासाठी त्यांना उत्तर भारतातून आमंत्रणे येत. प्रवासात जेथे-जेथे मुक्काम पडे, तेथे-तेथे ते प्रवचन करीत. अयोध्या, गया, काशी, प्रयाग यात्रांच्या वेळी (१९३७-३८) एकांतात राहून त्यांनी दीर्घकाळ उपासना केली होती, तसेच नर्मदाकाठीच्या निबीड अरण्यात, कोटेश्वर मंदिरात अनुष्ठान केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात परांडे येथे त्यांचे अखेरचे वास्तव्य झाले. आयुष्यात कसल्याच कामासाठी पैसा जमा न करणाऱ्या प्रज्ञानानंदांनी समाधी घेण्यापूर्वी गुुरुदक्षिणा व स्वत: लिहिलेल्या ग्रंथ विक्रीच्या पैशांतून बाबा गंगादास धर्मशाळा व श्री वासुदेव कूप बांधून या आपल्या दोन्ही गुरूंचे स्मारक निर्माण केले. त्यांच्या हस्ताक्षरातील दुर्मिळ मुद्रण प्रती परांडे येथे सुरक्षित ठेवल्या असून अभ्यासकांना अवलोकनार्थ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  — रेखा पटवर्धन

कर्वे, दत्तात्रेय नारायण