Skip to main content
x

क्षीरसागर, अनुपमा अरविंद

     अनुपमा क्षीरसागर यांनी पुणे विद्यापीठातून अकार्बनी रसायनविज्ञान या विषयात १९६५मध्ये एम.एस्सी. ही पदवी संपादन केली व नंतर दोन वर्षे (१९६५-६६) पुणे विद्यापीठातच रसायनविज्ञान विभागात डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केले. त्यानंतर घरातील जबाबदारी समर्थपणे पार पाडून १९७७ मध्ये संशोधनाच्या क्षेत्राकडे परतल्या व डेक्कन महाविद्यालयामध्ये पुरातत्त्व विभागात १९८० मध्ये संशोधन साहाय्यक या पदावर रुजू झाल्या.

डेक्कन महाविद्यालयामध्ये पुरातत्त्व विभागात नोकरी करत असतानाच त्यांनी प्रा. रामचंद्र जोशी या भारतातील सुप्रसिद्ध पुरातत्त्वीय भूवैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली १९८४मध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘Flurine and other Chemical Studies of Quternary Animal Fossils from India’ असा होता. अनुपमा क्षीरसागर यांना १९८४-१९८५मध्ये स्वीडिश इन्स्टिट्यूटतर्फे शिष्यवृत्ती मिळाली व या अंतर्गत त्यांनी स्टॉकहोमच्या सुप्रसिद्ध आर्किओलॉजीकल रिसर्च लॅबोरेटरीत सहा महिने संशोधन केले व पुरामापनविज्ञानात प्रावीण्य मिळवले.

सेवानिवृत्त होईपर्यंत अनुपमा क्षीरसागर यांनी पुरारसायनविज्ञान (Archaeological Chemistry) आणि पुरामापनविज्ञान (Archaeometry) या विषयांमध्ये संशोधनाचे व अध्यापनाचे कार्य केले. प्राचीन आहार हा त्यांच्या संशोधनाचा एक प्रमुख विषय होता. तसेच त्यांनी कालमानाची रासायनिक पद्धत यशस्वीपणे वापरून भारतातील अनेक ठिकाणी प्राप्त झालेल्या अश्मीभूत अस्थींचे कालमापन केले. त्यामध्ये इनामगाव, वाळकी व कवठे या खेरीज डेक्कन महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रात उत्खनन झालेल्या स्थळांचा समावेश आहे.

त्यांच्या संशोधनावर आधारित एक पुस्तक व ५० शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘प्राचीन संस्कृतीचे कालमापन’ ही मराठीतून पुस्तिका पुरारसायनविज्ञानाची सर्वसामान्य वाचकांना अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी ‘मराठी विश्वकोश’, ‘संशोधक’, ‘सकाळ’, ‘केसरी’ यांमधून अनेक मराठी लेख प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. प्रमोद जोगळेकर

क्षीरसागर, अनुपमा अरविंद