Skip to main content
x

क्षीरसागर, रामकृष्ण कृष्णाजी

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, वेद, उपनिषदे आदी संचितांचे संवर्धन करणारे श्री रामकृष्ण कृष्णाजी क्षीरसागर महाराज यांचा जन्म फाल्गुन शुक्ल तृतीया शके १९३४ रोजी राहुरी येथील पारनेरमधील रायतल गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधा होते. वडील शिक्षक होते आणि घरचे वातावरणही धार्मिक होते; परंतु अचानक वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे चार मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली. आईने सर्व कुटुंब जवळच्या नगरपट्टण येथे हलवले. हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाची गुजराण चालू होती. आईने चौदाव्या वर्षी श्रीराम यांची मुंज केली आणि तेव्हापासूनच त्यांची प्रकृती बिघडू लागली.

वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांना काही संकेत श्रीदत्तांच्या दृष्टान्तामार्फत मिळत होते. आजारपणात त्यांच्यासमोर एक स्त्री उभी राहून काही सांगत आहे, असे त्यांना वारंवार भास होत. ‘मी तुमचे कुलदैवत अंबामाता आहे. केडगावला माझे स्थान आहे. तेथून मला हलवा’ असे एका मांत्रिकाने श्रीरामांच्या तोंडून वदवले. त्यानुसार केडगावहून अंबामातेच्या मूर्तीला घरी आणले आणि त्यानंतर त्यांची तब्येत सुधारू लागली. त्या घटनेपासून श्रीराम अंबामातेच्या सेवेत राहू लागले.

त्यानंतर एकदा एका योग्याच्या रूपात श्री दत्तगुरूंनी त्यांना दृष्टान्त दिला आणि क्षीरसागरांच्या घरात श्रीदत्तांसह नवनाथ, शनी, शिव, तसेच तुळजाभवानी, रेणुका, कालिका, मरीमाता, महालक्ष्मी, सप्तशृंगी, चतु:शृंगी या सात देवीही प्रविष्ट झाल्या; म्हणजेच त्यांची पूजा यथासांग सुरू झाली.

क्षीरसागर महाराजांना एकदा सर्पदंश झाला होता. त्यातून त्यांना जणू पुनर्जन्मच मिळाला. परंतु त्यानंतर त्यांना अनेक व्याधीग्रस्तांच्या व्याधी, समस्या निराकरणाची जणू सिद्धीच प्राप्त झाली. कित्येकांच्या प्रपंचात, जीवनात महाराजांनी आशांचे दीप प्रज्वलित केले. ‘‘माणसाचा प्रपंच त्याच्या नशिबाने सिद्ध होतो; परंतु माणसाचा आध्यात्मिक विकास आणि ऐश्वर्य त्याला त्याच्या कर्मामधूनच प्राप्त होत असते,’’ असे महाराज म्हणत. क्षीरसागर महाराज यांनी त्यानंतर अनेक व्याधीग्रस्त आणि समस्याग्रस्त प्रापंचिकांना समस्या, व्याधिमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले आणि उपाय सुचविले. आपले धार्मिक, आध्यात्मिक, वेद, उपनिषदे इत्यादींचे संवर्धन करणे यावर श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा जास्त भर होता. हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेले आपले वेद आपल्या जगण्याची चेतना आहेत. ही चेतना, संजीवनी आता लुप्त होतेय की काय, ही भीती क्षीरसागर महाराजांनी व्यक्त केली. तस्मात् अहमदनगरच्या अंबिकानगर येथे महाराजांच्या भक्तांनी ‘श्रीदत्त देवस्थान विश्वस्त मंडळ’ स्थापले आणि त्या अंतर्गत ‘वेदान्त विद्यापीठा’ची स्थापना केली. तो दिवस होता पौष शुद्ध २, शके १९१० म्हणजेच ११ मार्च १९७४. विद्यापीठाच्या वेदान्त भवनात आज वसतिगृहासह अभ्यासिका, यज्ञमंडप, ग्रंथालय, गोशाला, त्याचप्रमाणे योगाभ्यासासाठी सोय उपलब्ध आहे. गुरुकुल शिक्षणपद्धतीच्या या विद्यापीठात वेदाभ्यास पूर्ण करण्यास किमान सोळा वर्षे लागतात. येथे उच्चारशास्त्र, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या वेदांगांचा अभ्यास होतो.

श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अनेक भक्तगण देशात व परदेशांतही पसरले आहेत. अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर, कॅनडा, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांत त्यांच्या शिष्य-भक्तगणांनी महाराजांच्या बोधामृतामधून भारतीय वेदान्त, अध्यात्माचा प्रसार केला आहे. महाराजांच्या आश्रमाच्या कार्याची माहिती प्रापंचिक भक्तगणांना व्हावी या उद्देशातूनच अहमदनगरसह, मुंबई, ठाणे, राहुरी, सांगली, औरंगाबाद, पुणे, वाशी, उरण इत्यादी ठिकाणची त्यांची सत्संग मंडळे कार्यरत आहेत.

संदीप राऊत

क्षीरसागर, रामकृष्ण कृष्णाजी