Skip to main content
x

कुलकर्णी, अंबा

अनंतपुर अंबा पद्मानाभाराव

        भारतीय शास्त्रांची पताका संगणकशास्त्राद्वारे झळकवून आज दोन तपांहून अधिक काळ विदेशी शास्त्रज्ञांसाठी या क्षेत्रात संशोधनाची स्फूर्ती नि त्याच वेळी पारंपरिक पंडितांना आधुनिक काळातील संशोधनार्थ शास्त्रांची उपयुक्तता उदाहरणांनी समजावून मानवी भाषांच्या संगणकीकृत संस्करणास त्यांचे कुतूहल जागवण्याचा वसा घेतलेली विदुषी म्हणजे डॉ. अंबा कुलकर्णी. स्वामी चिन्मयानंदांच्या आध्यात्मिक परंपरेतील तंत्रशिक्षणाचे द्रष्टे विनीत चैतन्यजी, कुशल संगणकशास्त्रज्ञ व ख्यातनाम व्यवस्थापक प्रा. राजीव संगलजी यांच्या मार्गदर्शनाने १९९२-९४ या काळात आयआयटी, कानपूर येथे संगणकशास्त्रात एम.टेक.साठी ‘विज्ञान-आणि-तंत्रज्ञांसाठी नव्य-न्याय’ या विषय निवडीने सुरू झालेली कुलकर्णी यांची शोधयात्रा त्यातून पुढे अक्षरभारतीच्या माध्यमातून उदयास आली.

     पाणिनीच्या अष्टाध्यायीतील गणनप्रक्रियेवर आधारित ‘अनुसारक’ ही संगणकीकृत भाषांतर प्रणाली. डॉ.अंबा कुलकर्णी यांना या दशकभरात स्पेन, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका, झेक रिपब्लिक इत्यादी देशांकडून व्याख्यानार्थ, तसेच संशोधन प्रकल्पांत सहभागी होण्यास मिळालेल्या निमंत्रणांतून त्यांच्या या योगदानाची जागतिक स्तरावरील मान्यता व्यक्त होते. प्राचीन संशोधनास इतिहास म्हणून महत्त्व आहेच; पण कालातीत अशी त्यांची ओळख उपयोजनांतून निर्माण करणे हे अधिक महत्त्वाचे. बहुभाषी राष्ट्रांत संगणकीकृत भाषांतरांतून संवाद-सुलभता या प्रेरणेस बाईंनी स्वत:ला वाहून घेतले. अनुसारकाची इंग्लिश-हिंदी भाषांतरक्षम प्रणाली १९९८-२००६ या काळात कार्यान्वित झाली तेव्हापासून डॉ. अंबा यांनी त्यांचे गुरू, सहकारी व विद्यार्थी यांच्या सहभागाने अनुसारकाच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर चढताच ठेवला. तेलुगू, कन्नड, मराठी, गुजराती, बांगला, पंजाबी आणि उर्दू या भाषांसाठी अनुसारकाच्या आवृत्तींचे काम विविध टप्प्यांवर उपलब्ध आहे. लोकसहभागातून भाषिक संसाधने वृद्धिंगत करणे हे या प्रकारच्या प्रकल्पांसाठी आवश्यकच. त्यासाठी गेल्या दशकात डॉ. अंबा यांनी हैदराबाद विद्यापीठ या त्यांच्या सध्याच्या कर्मभूमीसह उस्मानिया विद्यापीठ, उपयोजित भाषाविज्ञान आणि भाषांतर अभ्यास केंद्र, आयआयआयटी (हैदराबाद), चिन्मय शोध संस्थान, शंकराचार्य विद्यापीठ, मद्रास विद्यापीठ, केंद्रीय भारतीय भाषा संस्थान (म्हैसूर), महाराजा सयाजीराव विद्यापीठ, द्रविडीयन, तसेच नॉर्थ-ईस्टर्न हिल विद्यापीठ, एशियाटिक सोसायटी (कोलकाता), संस्कृत अकादमी (मीरत), बनारस हिंदू विश्वविद्यालय, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (मुंबई, कानपूर) अशा विविध ठिकाणी अक्षरश: शेकडो व्याख्यानांतून व चर्चासत्रांतून विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांना हिरीरीने मार्गदर्शन केले.

     २०१२ साली भारतात ‘पाणिनी पद्धतीने संगणकाद्वारे मानवी भाषा संस्करण’ या विषयातील संशोधनाला २५ वर्षे झाली, त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या त्या प्रमुख संयोजक होत्या. २०१३ साली उज्जैन येथील संस्कृत साहित्योत्सवात त्यांनी ‘संस्कृत संगणकीय संसाधने’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले. २००२ साली ‘श्लेषनिराकरण’ या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेसाठी त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ ब्रायटन या लंडनस्थित विद्यापीठाचे साहाय्य मिळाले होते, ही त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची व तिला मिळालेल्या पावतीची वानगी.

     अंबा कुलकर्णी या पूर्वाश्रमीच्या अंबा पद्मनाभराव अनंतपूर. गणिताचे विख्यात प्राध्यापक ए.बी.पी. राव यांच्या कन्या. अंबा कुलकर्णी यांचा जन्म बिहार येथे झाला आणि त्यांचे शिक्षण सोलापूर मधील सरस्वती हायस्कूल आणि सिद्धेश्‍वर हायस्कूल येेथे झाले. अत्यंत अचूक अंदाज हे त्यांचे वैशिष्ट्य प्रत्येक परीक्षेच्या निकालानंतर सिद्ध झालेले होते. दहावी-बारावीत उत्तम गुण मिळवूनही वैद्यक-अभियांत्रिकीला न जाता विज्ञानशाखा निवडून ९१% गुणांसह शिवाजी विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गणित विषयात त्यांनी नवा उच्चांक झळकवला.

     राधाकृष्णन आणि कुंभोजकर या प्राध्यापक द्वयींच्या मार्गदर्शनाने १९८२ साली गणितातील पदव्युत्तर पदवी, टीआयएफआर निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक, आकाशवाणीवर भाषण आणि संगीतातही गती असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात गणित व्याख्याता अशी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात करून पुढे १९८५ पासून त्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत झाल्या.

     विवाह हा साधारणत: भारतीय मुलींच्या शैक्षणिक-व्यावसायिक विकासास अडथळा असल्याची उदाहरणे अधिक; पण डॉ. अंबा मात्र १९९० साली प्रदीप कुलकर्णी यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर एखाद्याच वर्षात वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा बाऊ न करता सासरच्या प्रोत्साहनाने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, कानपूर या ख्यातनाम संस्थेत संशोधिकेच्या पदावर, तेही मानवी भाषा संस्करण या आधुनिक विषयात स्वत:ला सिद्ध करण्यात ठाकलेल्या दिसतात.

     १९९८ ते २००३ दरम्यान सत्यम कॉम्प्युटर्स या त्या काळातील अत्यंत नावाजलेल्या कंपनीमध्ये त्या सल्लागार होत्या. शिक्षक-संशोधक या तुलनेत वेगळ्याच अपेक्षा असणारा तो अनुभव. संगणकीय आज्ञाप्रणाली संशोधित करून व्यावसायिक दर्जाने कार्यान्वित करण्यात हातखंडा या त्यांच्या विशेष गुणाचे बीज कदाचित इथे रुजले असेल. विभक्ती, कारक, समास, श्लेष, संयुक्त शब्द, नव्य-न्यायपद्धतीने वाक्य-विश्लेषण आणि मांडणी, वाद-विश्लेषण, पाणिनीमध्ये न आलेल्या व्याख्या, धातुकोश यांसारख्या सैद्धान्तिक विषयांसह बालकांड, सुंदरकांड, संक्षेप रामायण, अमरकोश, हितोपदेश यांचे संगणकाधारे विश्लेषण हे ग्रंथविषय त्यांनी २००४ पासून आय.आय.आय.टी., हैदराबाद विश्वविद्यालय तसेच तिरुपती राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ येथे संशोधक-मार्गदर्शिकेच्या भूमिकेतून हाताळलेले दिसतात. सहकारी नि विद्यार्थी यांच्यासमवेत त्यांनी विकसित केलेल्या तेलुगू, मराठी, कन्नड, पंजाबी, बांगला मॉरफॉलॉजिकल अ‍ॅनलायजर, तसेच इंग्लिश-हिंदी आणि संस्कृत-इंग्लिशसह या भाषांसाठी अनुसारक, उर्दू-हिंदी मशीन ट्रान्सलेटर, संस्कृत मॉरफॉलॉजिकल अ‍ॅनलायजर अ‍ॅण्ड जनरेटर या प्रणाली; संधी, समास, अष्टाध्यायी, अमरकोश, संक्षेपरामायण यांचे संगणकीकृत विश्लेषण तुम्हाला LTRC Website,Anusaaraka Website आणि  Department of Sanskrit Studies Websitre HCU येथे पाहायला मिळतील. व्याकरणशास्त्रीय वाक्यविच्छेद (parsing),टिप्पणी (tagging and annotations), लेखनपद्धती (notations), रूप-रचनेच्या आधारे शब्द-विश्लेषण (morphological analysis), अर्थशोधन (semantic processing), शब्दलेखनसाहाय्य ( sperll check), तसेच अमरकोश, गीता, छंदशास्त्र अशा अनेक विषयांवरील त्यांचे संशोधन, सहलेखन नामांकित संशोधनपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लँग्वेज अ‍ॅक्सेस - ऍन इन्फर्मेशन बेस्ड अ‍ॅप्रोच, अ‍ॅन्नाकोर्रा - बिल्डिंग ट्री बँक्स इन इंडियन लँग्वेजेस, अनुसारक - ओव्हरकमिंग लँग्वेज बॅरिअर इन इंडिया, इंग्लिश ग्रमर फ्रॉम हिंदी स्पीकर्स पॉइंट ऑफ व्ह्यू इन द लाइट ऑफ पाणिनीयन ग्रमर, इंग्लिश फ्रॉम हिंदी व्ह्यू पॉइंट - पाणिनीयन पर्स्पेक्टिव्ह, देवनागरी लिपी और संगणक, संस्कृत मॉरफॉलॉजिकल अ‍ॅनलायजर सम इश्यूज, इन्फॉर्मेशन कोडिंग इन अ लँग्वेज, सम इन्साइट फ्रॉम पाणिनीयन ग्रामर, सब्जेक्ट इन इंग्लिश इज अभिहित, तेलुगू स्पेल चेकर हे त्यांचे वैयक्तिक किंवा अक्षरभारती, वरखेडीजी आणि इतरही सहकार्‍यांच्या सोबतचे संशोधनपर निबंध पुढीलांसाठी मैलाचे दगड ठरावे.

     डॉ. अंबा कुलकर्णी यांच्यासारख्या विषयाला वाहून घेतलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अडचणीही तळमळीने समजून घेऊन समुपदेशन करणाऱ्या आदर्श मार्गदर्शिका हे भाग्य असल्याचे देश-विदेशात पुढील संधी मिळालेल्या त्यांच्या अनेक संशोधनार्थींनी आवर्जून नमूद केले आहे. २००६ साली हैदराबाद विश्वविद्यालयाच्या नव्याने सुरू झालेल्या संस्कृत अध्ययन विभागाची सूत्रे हाती घेतल्यावर विभाग उभारणीचे आव्हान आणि २००७ साली अकाली पती निधनाचा आघात यांवर मात करून त्यांनी २०१० साली ‘उपयोजित भाषाविज्ञान’ या विषयात अनुसारक प्रणालीच्या संशोधनावर प्रबंध सादर करून हैदराबाद विश्वविद्यालयाची पीएच.डी. संपादन केली. प्राध्यापक जी. उमा महेश्वर राव या त्यांच्या सहकारी व त्यांच्या शोधप्रबंधाच्या मार्गदर्शिका. संस्कृत अध्ययन केंद्रप्रमुख म्हणून काम करायचे तर संस्कृतमधील औपचारिक पदवी हवी, म्हणून डॉ. अंबा यांनी २०१२ साली कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठातून एम.ए.संस्कृतही केले. त्यांच्यातील विजिगीषु स्वभाव सदैव जागृत आहे तो असा.

     संगणकाद्वारे प्रगती साधण्यात प्राचीन भारतीय शास्त्रांचे उपयोजन हा आगळा विषय जनमानसात रुजविण्यातले अंबा कुलकर्णी यांचे यश खचितच उल्लेखनीय आहे. गेली पंचवीस वर्षे मानवी भाषांचे संगणकाद्वारे संस्करण, संगणक आज्ञा-प्रणालींचे लेखन, भारतीय आणि पाश्चात्त्य तर्कशास्त्राचा तौलनिक अभ्यास, भारतीय गणित, संख्याशास्त्रीय संकल्पना आणि अष्टाध्यायीतील संगणन असे विविध विषय त्या सोलापूर, हैदराबाद, तिरुपती आणि म्हैसूर येथील शिक्षण-संशोधन संस्थांमधून विज्ञानाच्या, तसेच मानव्यशास्त्राच्या पदव्युत्तर आणि संशोधन छात्रांना शिकवत आल्या आहेत. आयआयआयटी, हैदराबाद येथील गणनीय भाषाविज्ञानातील पीएच.डी. आणि तिरुपती राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातील ‘शब्दबोध आणि भाषा तंत्रज्ञान’ या विषयातील पदव्युत्तर पदविका या त्यांच्या कल्पनांना अनुक्रमे २००२ आणि २००४ साली विद्यापीठ आयोगाकडून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे.

     श्री वेंकटेश्वरा वैदिक विद्यापीठ आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती), महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ (वर्धा) इत्यादींच्या अभ्यासमंडळांमध्ये आणि शिक्षणप्रक्रियेत सक्रिय सहभाग, केंद्रीय भारतीय भाषा संस्थानांंतर्गत भारतीय भाषांची भाषावैज्ञानिक माहिती संकलन गट, भारतीय भाषा ठेवा संकलन प्रकल्प (Indian Language Corpora Initiative), भारतीय भाषांसाठी माहिती-तंत्रज्ञानाचे विशेष गुणवत्ता केंद्र, तसेच भारत सरकारचे द्रविडी-इंग्लिश संगणकीय भाषांतरासाठी साधन आणि संसाधन निर्माण या देशांतर्गत उपक्रमांत नेतृत्व, संस्कृत लायब्ररी या अमेरिकन प्रकल्पाच्या संचालक मंडळात स्थान, आयकॉन, एससीएलएस, आयसीआयएसआयएल या जागतिक परिषदांचे देशविदेशांत नियोजन, तसेच शोधनिबंधपुस्तिकेच्या संपादन सल्लागार, एससीएलएस, आयसीआयएसआयएल, सिम्पल-०४, एनएलपीएआय-०६, एमएसपीआयएल-०६, किक्लिगं-२०११, कोलिंग-२०१२ आणि जर्नल ऑफ लँग्वेज इंजिनिअरिंगच्या समीक्षिका अशा अनेक भूमिकांतून त्या अव्याहत कार्यरत आहेत.

    १९९८-२००९ या काळात हैदराबाद विश्वविद्यालयाच्या दूर-अध्ययन केंद्रासाठी त्यांनी भारतीय भाषांमध्ये संगणकाचे उपयोजन या पद्व्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी संगणकाद्वारे भाषांतर (Machine Translation), मानवी भाषांचे गणिती प्रारूप (Natural Language Modelling), भाषांतराची साधने(Translation Tools) या अभ्याससामग्रीचे सहसंपादन केले. आयकॉन २००२मध्ये आणि २०१२मध्ये त्यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत सादर केलेली गणनीय भाषाविज्ञानाची ओळख (Introduction to Computational Linguistics) आणि भारतीय भाषांतील शब्दविश्लेषण, तसेच शब्दरूपांचे निर्माण (Building Morphological Analysers and Generators for Indian Languages Using FST) ही सत्रे संशोधनार्थींसाठी उद्बोधक आहेत.

    भारतीयत्वाचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकास, विशेषत: संगणक अभ्यासकांस अभिमान वाटावा, कार्यप्रेरणा मिळावी असे हे व्यक्तिमत्त्व. भारतीय भाषांतर्गत भाषांतरे या राष्ट्रीय संशोधन प्रकल्पात इंग्लिश-हिंदी-संस्कृत या भाषांतील संशोधनाचे नेतृत्व त्या यशस्वीपणे निभावत आहेत. उर्दू-हिंदी प्रकल्पाच्याही त्या समन्वयक आहेत. भारताबाहेरील जगद्विख्यात शास्त्रज्ञांनी त्यांना अशा संशोधन प्रकल्पात सहकारी म्हणून निमंत्रित केले आहे. २०११-१३ या काळात हाइनरीश हायने या जर्मन विद्यापीठातील प्रा. वेब्क पीटरसन यांच्या ‘ए क्वॉलिटेटिव्ह अ‍ॅनलिसिस ऑफ फोनोलॉजिकल डिस्क्रिप्टिव्ह टेक्निक्स अ‍ॅण्ड ए कम्पॅरिझन ऑफ पाणिनीज प्रत्याहार्स अ‍ॅण्ड फोनोलॉजिकल फीचर्स’ या प्रकल्पात भागीदारी, डाड-युजीसी योजनेअंतर्गत जर्मनीच्याच ऑलिवर हेल्विग युनिव्हर्सिटी ऑफ हायडेलबर्गकडून ‘ऍडव्हान्स्ड रिसर्च इन द कंप्युटेशनल प्रोसेसिंग ऑफ संस्कृत विथ स्पेशल फोकस ऑन वर्ड सेन्स डिसअँबिग्युएशन’ या विषयार्थ निमंत्रण आणि, ‘एनहान्सिंग अ‍ॅक्सेस टू प्रायमरी कल्चरल हेरिटेज मटेरिअल ऑफ इंडिया’ या अमेरिकेच्या ब्राउन विद्यापीठातील प्रा. पेटर शॉर्फ यांच्या प्रकल्पास कार्यान्वित करण्यातले डॉ. अंबा यांच्याकडून मिळालेले अपेक्षित सहकार्य जागतिक स्तरावरील अंबा कुलकर्णी या संशोधिकेस लाभलेली मान्यता अधोरेखित करणारे.

     प्रा. जेरार्ड ह्युए या जगद्विख्यात फ्रेंच संगणकशास्त्रज्ञाने डॉ. अंबा यांच्यासोबत सहसंशोधनासाठी २००७ पासून दाखवलेली उत्सुकता आणि उभयतांच्या सहकार्याचे नेत्रदीपक फलित हे तर त्यांच्या कारकिर्दीतील नि:संशय कौतुकाचे पान.

    अंबा कुलकर्णी यांच्या कार्याविषयी अधिक विस्ताराने माहिती http://sanskrit.uohyd.ernet.in/faculty/amba/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अंबुजा साळगावकर

कुलकर्णी, अंबा