Skip to main content
x

कुळकर्णी, भगवान रघुनाथ

बी. रघुनाथ

बी.रघुनाथ यांचा जन्म सातोना, जिल्हा परभणी येथे झाला. बालपण सातोन्यातच गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर हैद्राबादला नातेवाइकांकडे वास्तव्य. मॅट्रिकपर्यंत तेथे विवेकवर्धिनी या शाळेत शिक्षण घेतले, पण महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. १९३२साली परभणी येथे आले व सरकारी बांधकाम खात्यात नोकरी केली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना, आर्थिक हलाखी सोसताना, मानसिक ताण आणि जुलमी सरंजामी राजवट यांना तोंड देता-देता त्यांचे शरीर इतके खंगले की, कार्यालयाध्येच हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.

इतक्या अल्प काळातही त्यांनी विपुल लेखन केले. १९३० साली लिहिण्यास सुरुवात झाली आणि २० वर्षांच्या काळात त्यांनी १५०च्या आसपास कविता, ६० कथा, ७ कादंबर्‍या असे लिखाण केले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘आलाप आणि विलाप’ १९४१ साली प्रसिद्ध झाला. त्यांच्या कवितांवर निसर्गाचा, बालकवींचा, गोविंदग्रजांचा व मर्ढेकरांचा प्रभाव जाणवतो. त्यांचा स्वभाव अत्यंत मनस्वी व बोलणे कमी त्यामुळे त्यांची कविता आत्ममग्न आहे. ‘रे ओल्या काष्ठा’, ‘वर्ष नवे’, ‘अजुनि गाव दूर’ इत्यादी कविता आत्मभानाचे प्रकटीकरण करताना दिसतात. तर ‘रस्ता नगर झाला’, ‘अन्नदेवता’, ‘राव अधिकारी झाले’, ‘धुराड’, ‘आज कुणाला गावे’, ‘एक गरजते ढगाड’, ‘उजेड झाला’, ‘गरिबांचा संसार’, ‘देव आणि दासी’ या सामाजिक जाणिवेच्या कविता आहेत. बी.रघुनाथांच्या मनात असलेली स्त्री कशी विविधरूपी आहे, हे त्यांच्या ‘उन्हात बसली न्हात’, ‘ज्वार’, ‘दर्पण’, ‘रात्र संपली तरी’, ‘ये मनात राया कधी’, ‘रंगार्‍याचे गाणे’, ‘नेस नवी साडी’, ‘नगरभवानी’, ‘उजेड झाला’ या कवितांतून प्रकट होते. तसेच त्यांच्या कवितेत स्त्री-देह, शृंगार, प्रणय यांचे सुंदर चित्रण दिसते. ‘देखियला चल एक हिमालय’, ‘लहर’, ‘पांढर्‍या पर्‍या’ या काहीशा गूढ कविता त्यांनी लिहिल्या.‘टिचकी’, ‘पडली बघ झाकड’, ‘लागली जीवास घरची वड’ या कवितांतून परभणीच्या अस्सल बोली भाषेचा अनोखा सौंदर्याविष्कार आढळतो.‘स्वस्त धान्याचे दुकान’, ‘कुरण’, ‘माझी चिमणी’ आणि ‘मुद्रिका’ या चार दीर्घ कविता त्यांनी लिहिल्या. ‘काळास मिटव नेत्र तेव्हाच’ या चिंतनात्मक व अंतर्मुख करणार्‍या कविता आहेत.

बी.रघुनाथ यांचा पहिला कथासंग्रह ‘साकी’ १९४० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘फकिराची कांबळी’, ‘छागल’, ‘आकाश’, ‘काळी राधा’ या कथा प्रसिद्ध. त्यांच्या कथा तीन विभागांत मोडतात. पहिल्या प्रतीक कथा, दुसर्‍या निझामी राजवटीतील आराजकतेच्या आणि तिसर्‍या प्रकारात निझामी नोकरशाहीचे आणि समाजाचे वर्णन करणार्‍या कथा. ‘बेगम सकीना’ ही गाजलेली कथा! या कथेतील चपराश्याचे दारिद्य्र, त्याचे मनोरथ, लाचारी आणि शेवटी अपेक्षाभंग यांचे सुरेख चित्रण आहे.

 ‘अभावती’ ही बी.रघुनाथांचे अनुभवांचे मर्म लेवून उभी राहते. या कथेत लावण्याबरोबर संयमाचा सुसंस्कृतपणा आहे. भावनिक रस आहे. ‘गंगाधर’ ही स्टोअरकीपरची कथा, एक हंगामी जागा व बारा रुपड्यांवर उरी  फुटेपर्यंत काम करणार्‍या कारकुनाची कथा. ‘थैली’ ही आत्मनिवेदन असणारी, त्यांच्या मनातील तडफड व्यक्त करणारी, मनाला चटका लावणारी कथा आहे.

 ‘प्रधानांचा दौरा’, ‘पैसा कुठे जातो’, ‘जिथं तांबड फुटायचं आहे’, ‘शेख मस्तान’ इत्यादी कथांतून सरंजामशाहीचे विस्तृत भेदक वर्णन येते. गंगाधर गाडगीळ त्यांच्याबद्दल म्हणाले होते, “बी. रघुनाथांनी मराठी नवकथेची पायवाट तयार केली.” तर अरविंद गोखले म्हणाले, “बी रघुनाथांनी हळवा ध्येयवाद व फसवा बोधवाद यांतून मराठी कथेला बाहेर काढून अंतर्मुख आणि काव्यात्म बनवले.”

बी.रघुनाथ यांनी एकूण सात कादंबर्‍या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी ‘ओ’ १९३६मध्ये प्रसिद्ध झाली. तत्कालीन समीक्षकांना आणि रसिकांना मान्य नसलेला वास्तववादी वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला. ‘हिरवे गुलाब’ या कादंबरीतील अमीर जानकीराम यांच्या व्यक्तिरेखेवरून व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांच्या मुळाशी असलेल्या प्रेेरणांचा ते शोध घेतात आणि विविधस्तरीय सामाजिक वास्तवाचे चित्र रेखाटतात. ‘बाबू दडके’, ‘उत्पात’ या कादंबर्‍यांतून त्यांना आनुभवास आलेली आत्मवंचना व न्यूनगंडाच्या जाणिवेचा अविष्कार दिसतो. ‘जगाला कळलं पाहिजे’, ‘म्हणे लढाई संपली’ यांतील बाबूराव, डी.हानुमंतराव, रावजी या व्यक्तिरेखा म्हणजे जीवनमूल्ये पायदळी तुडवणे, अन्याय करणे, विवेकापासून भ्रष्ट होणे यांची उदाहरणे आहेत.

लहान-मोठे विविध तपशील, लहान-सहान व्यक्तिरेखा यांचे विस्तृत वर्णन बी.रघुनाथ यांच्या कादंबर्‍यांतून अढळते. टांगेवाले, टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलातील पोरे, पानपट्टीवाले, कारकून इत्यादी विविध स्तरांतील व्यक्तींचे सुस्पष्ट वर्णनही दिसते.

     अत्यंत प्रतिभासंपन्न अशा या साहित्यकाराचा त्या काळी योग्य सन्मान झाला नाही; की कोणत्याही पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले नाही.

- निशा रानडे

कुळकर्णी, भगवान रघुनाथ