Skip to main content
x

कुलकर्णी, गोविंद मल्हार

     गो.म.कुलकर्णी ह्यांचे शालेय शिक्षण इचलकरंजी व उच्च शिक्षण सांगली येथे झाले. पुणे येथे मराठी-संस्कृत विषय घेऊन एम.ए.ची पदवी ‘तर्खडकर’ सुवर्ण पदकासह त्यांनी प्राप्त केली होती. १९४६ पासून १९७४ पर्यंत विजय महाविद्यालय, विजापूर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. १९६९पासून कर्नाटक विद्यापीठात पीएच.डी.चे ते मार्गदर्शक होते. १९७४मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कराडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. १९७५मध्ये शिवाजी विद्यापीठातही ते पीएच.डी.चे मार्गदर्शक होते.

     ‘प्राची’ या काव्यसंग्रहाद्वारे त्यांनी साहित्य विश्वात पाऊल टाकले. पण पुढे मात्र आयुष्यभर त्यांनी समीक्षा-लेखनाचाच ध्यास घेतला. ‘रसग्रहण: कला आणि स्वरूप’ (१९५२), ‘खंडन-मंडन’ (१९६८), ‘साद-पडसाद’ (१९७५), ‘वाटा आणि वळणे’ (१९७५), ‘मराठी साहित्यातील स्पंदने’ (१९८५) हे समीक्षा लेखनावरचे मर्मग्राही ग्रंथ त्यांच्या चिकित्सक दृष्टीतून साकार झाले. या ग्रंथांमधून साहित्यातील विविध विषयांचा परामर्श त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या ग्रंथांतील समीक्षा स्फुट स्वरूपाची असली, तरी ती सर्वसमावेशक झाली आहे. याशिवाय ‘झपूर्झा’ (१९६२), ‘हृदयशारदा’ (१९६९), ‘चांदणवेल’ (१९७२) या ग्रंथांमधून अनुक्रमे केशवसुत, गोविंदाग्रज, बोरकर यांच्या निवडक कवितांचे सहसंपादन त्यांनी केले; तेही या कवींच्या अभ्यासकाला वेगळी दृष्टी प्रदान करणारे आहे. ‘अभिरुची ग्रामीण आणि नागर’ (१९७६) आणि ‘नवसमीक्षा’ (१९८२) हे अन्य सहसंपादित ग्रंथही त्यातील नेमक्या विवेचनामुळे उल्लेखनीय आहेत. प्रा.द.गो.कर्वे लिखित ‘न्यायमूर्ती रानडे’ यांच्या इंग्रजीतील चरित्रग्रंथाचा त्यांनी ‘भारताचे द्रष्टे न्यायमूर्ती रानडे’ (१९४२) या नावाने केलेला मराठी अनुवादही आदर्श वस्तुपाठ देणारा अनुवाद आहे.

    प्राचीन संतवाङ्मयापासून ते आधुनिक साहित्यातील दलित-ग्रामीण साहित्य चळवळीपर्यंत सर्वच साहित्य प्रकारांचा व त्यांतील-वृत्ती प्रवृत्तींचा वेध त्यांनी आपल्या समीक्षा-लेखनामधून घेतला आहे. संत-साहित्याचा विचार करताना केवळ राजकीय, सामाजिक वा वाङ्मयीन दृष्टिकोन पत्करून चालणार नाही तर शुद्ध आध्यात्मिक भूमिकेवरूनच संत-साहित्याकडे पाहिले पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले. इ.स.१६८० ते १८२० या कालखंडातील साहित्याचा वेध घेताना या काळातील पौराणिक आख्यानांमधून तत्कालीन चालीरीती मिसळण्याची प्रवृत्ती एका बाजूने बळावत असतानाच दुसर्‍या बाजूने बखर वाङ्मयासारखे इतिहासाधिष्ठित वाङ्मय; पुराणवलयांकित करण्याचाही प्रयत्न कसा होत होता, हे त्यांनी साक्षेपाने नोंदविले आहे. अव्वल इंग्रजी राजवटीतील मराठी वाङ्मयाचे विवेचन करताना ब्रिटीश राजवटीमुळे सार्‍या भारतीय जीवनाचे स्थित्यंतर कसे घडून आले व त्यामुळे जीवनाच्या राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अंगांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन विकसित होऊन त्याचा प्रभाव वाङ्मय निर्मितीवर कसा पडला, हे त्यांनी नेमकेपणाने उलगडून दाखविले आहे. केशवसुतांपासून मर्ढेकरांपर्यंतच्या मराठी कवितेत सौंदर्य स्फुरणापेक्षा विचार-चिंतनाला अग्रक्रम मिळाला आहे, असे स्पष्टपणे सांगून सौंदर्य संवेदनांच्या दृष्टीने बालकवी, तांबे, बोरकर, पु.शि.रेगे, आरती प्रभू, ग्रेस, महानोर या कवींचे महत्त्वही ते प्रतिपादन करतात. पण एकंदर आधुनिक कवितेचा किंवा नवकवितेचा तोंडवळा संसृतिटीकात्मक तरी आहे किंवा बौद्धिक स्वरूपाच्या प्रयोगप्रवणतेकडे तरी तो झुकतो; असे कटाक्षाने ते नोंदवितात. दलित साहित्य व ग्रामीण साहित्य यांविषयीचे त्यांचे चिंतनही असेच मर्मग्राही आहे. दलित साहित्याने आधुनिक मराठी साहित्यविश्वात जाणिवेचा एक नवा प्रवाह आणून सोडला, हे स्पष्ट करतानाच या साहित्यासाठी वेगळ्या साहित्यशास्त्राची मागणी तर्कसंगत आहे, हेही त्यांनी मान्य केले आहे तर ग्रामीण साहित्याच्या यशस्वितेचा आढावा घेऊन ते एका आवर्तात कसे सापडले आहे, याचे स्पष्ट दिशा-दिग्दर्शन त्यांनी केले आहे. हे सगळे लक्षात घेतले म्हणजे गो.म.कुलकर्णी यांनी मराठी वाङ्मयविश्वाच्या वृत्ति-प्रवृत्तीचा वेध किती चिकित्सकपणे पण आस्था न ढळू देता घेतला आहे, हे लक्षात येते. समीक्षेला शोधयात्रा मानून मोठ्या ध्येयनिष्ठेने त्यांनी आयुष्यभर ही शोधयात्रा केली आणि समीक्षा-विचार प्रगल्भ केला. मराठी समीक्षा क्षेत्राला समन्वयाची दृष्टी बहाल करणारा समीक्षक म्हणून त्यांचे नाव अग्रस्थानी राहील यात शंका नाही.

     मराठी समीक्षा जगतात कोणतीही एकांगी भूमिका न घेता वाङ्मयप्रेमी रसास्वादाच्या भूमिकेतून पण अतिशय डोळसपणे समीक्षा लेखन करणारे थोर समीक्षक म्हणजे गो.म.कुलकर्णी होत.

- डॉ.संजय देशमुख

कुलकर्णी, गोविंद मल्हार