Skip to main content
x

कुंदनानी, खुशीराम एम.

        मुंबईतील फोर्ट भागातील दिनशा वाच्छा रोडवरील किशनचंद्र चेलाराम महाविद्यालय (के.सी. कॉलेज) चे प्राचार्य खुशीराम एम. कुंदनानी ह्यांचा जन्म सिंध प्रांतात हैद्राबाद येथे झाला. ते (दयाराम जेथामल सिंध महाविद्यालय) कराची व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईचे विद्यार्थी होते. खेळ, गिर्यारोहण व व्यायाम हे त्यांचे आवडीचे विषय होते. १९३० मध्ये हैद्राबाद (सिंध) येथील डी. जे. राष्ट्रीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. महाविद्यालयाच्या जिमखान्याचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

     भारताच्या फाळणीनंतर कुंदनानी मुंबईत आले. त्यावेळी ते महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील उपकरणे, ग्रंथालयातील ग्रंथ बरोबर घेऊन आले. भारत सरकारने दिलेले उच्च पदाचे अनेक प्रस्ताव त्यांनी नाकारले. कारण विभाजनामुळे उद्ध्वस्त जीवन जगणार्‍या जातीबांधवांच्या उन्नतीचे काम त्यांना करावयाचे होते. ही उन्नती केवळ शिक्षणानेच होईल, असा त्यांचा विश्‍वास होता.

     मुंबईत वांद्य्रासारख्या त्यावेळच्या ओसाड जागेत एक भूखंड त्यांनी खरेदी केला. पण मुंबई विद्यापीठाने त्यांना महाविद्यालयासाठी परवानगी दिली नाही. तेव्हा हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाच्या मदतीने त्यांनी अनेक महत्त्वाचे भूखंड खरेदी केले.

     आतापर्यंत जमविलेला सर्व पैसा त्यांनी संस्थांच्या उभारणीत ओतला. १९४९ मध्ये वांद्रे महाविद्यालय सुरू झाले. त्या पाठोपाठ कला, विज्ञान, वाणिज्य, विधि, अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, औषधनिर्माण विज्ञान, तंत्रनिकेतन, तांत्रिक संस्था, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, पत्रकारिता, व्यवस्थापन अशा विविध ज्ञानशाखांचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची मालिका त्यांनी उभी केली.

     प्रा. कुंदनानी स्वत: महाविद्यालयाची रूपरेखा तयार करीत. त्यांनी १९५४ ते १९६६ व १९६७ ते १९९२ या कालावधीत किशनचंद्र चेलाराम  महाविद्यालय, चर्चगेट येथे प्राचार्यपद भूषविले. १९५९ ते १९६५ अशी सहा वर्षे ते मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटवर मुंबईतील महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे प्रतिनिधित्व करत होते. विद्यापीठाच्या एथलिट स्पोर्ट रौप्यमहोत्सवाचे ते अध्यक्ष होते.

     प्राचार्यपदाच्या निवृत्तीची मर्यादा पासष्ट वर्षांची असते. पण प्रा. कुंदनांनी ह्यांच्या बहुमोल सेवेचा मान राखून अपवाद म्हणून हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट बोर्डाने ही मर्यादा त्यांची इच्छा असेपर्यंत वाढविली. त्यांच्या मृत्यूपर्यंत तेच प्राचार्यपदी होते. प्रारंभी सिंधी बांधवांच्या व पुढे पर्यायाने सर्व भारतीयांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान करणारे प्रा. खुशीराम कुंदनानी हे थोर, क्रियाशील विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ होते.

- वि. ग. जोशी

कुंदनानी, खुशीराम एम.