Skip to main content
x

कुंटे, रामचंद्र गोपाळ

         रामचंद्र गोपाळ कुंटे हे नाशिकमध्ये रामभाऊ कुंटे म्हणून ओळखले जात. त्यांचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेरमध्ये व माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालयामधून गणित व इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी. ए. पदवी संपादन केली.

त्यांनी १९५४ पासून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक रोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश शाळेमध्ये शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. ते गणित व इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक होते. १९५७ मध्ये ते बी. टी. झाले. ते अतिशय बुद्धिमान होते, प्रतिभावान गणिती होते. एम. एड. ला प्रायोगिक मानसशास्त्र व संख्याशास्त्र हे विषय घेऊन पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळविला. एक निष्णात गणित अध्यापक म्हणून केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमध्ये त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक म्हणून उत्तम काम केले. १९८० पासून नांदगाव येथील व्ही. जे. विद्यालय, नाशिकचे रूंग्टा विद्यालय व रात्र विद्यालय अशा तीन शाळांत मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. व्ही. जे. विद्यालय ही लहान गावातील शाळा, रूंग्टा विद्यालय ही मोठ्या शहरातली शाळा, रात्र विद्यालय ही व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा असे, या तिन्ही शाळांमधील वातावरण भिन्न होते. पण ह्या तिन्ही शाळांत त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली.

अध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर पसरली होती. म्हणूनच त्यांच्या नांदगावच्या कार्यकाळात जवळ असलेल्या वाखारी गावच्या ग्रामस्थांनी संस्थेने शाळा चालवावी असा प्रस्ताव त्यांच्यावरील विश्‍वासामुळेच संस्थेस दिला. हा विश्‍वास त्यांनी सार्थ ठरविला. संस्थेने शाळा चालवायला घेतली व मुख्याध्यापकपदी त्यांची नेमणूक झाली. मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या सर्वच अंगांकडे त्यांचे बारीक लक्ष असे. रूंग्टा विद्यालयाचे वाचनालय त्यांनी योजना आखून, परिश्रमपूर्वक समृद्ध केले. प्रयोगशाळा, रंगभूमी व क्रीडांगण ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरविले. कै. रं. कृ. यार्दी व्याख्यानमालेच्या निमित्ताने ज्ञानाची पाणपोई उभी करून यार्दी यांची स्मृती कायम ठेवली. कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या शोधाला व विकासाला संधी दिली. ते उत्तम क्रिकेटपटू होते. ते स्वत: दोन्ही हातांनी गोलंदाजी करीत. ते मुलांबरोबर उत्साहाने खेळत व त्यांना मार्गदर्शन करीत असत. नंतरच्या काळात त्यांनी ह्या शाळेस पन्नास हजार रूपयांची देणगी दिली.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळह्या संस्थेचे मानद चिटणीस म्हणून त्यांनी अजोड काम केले. अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी संस्थेचे समर्थपणे नेतृत्व केले. त्यामुळे संस्थेच्या विकासास लक्षणीय गती मिळाली.

गणित विषयाचे अध्यापन, लेखन व संशोधन ह्यातही त्यांचे योगदान फार मोठे आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक मार्गदर्शन वर्गास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. गणित शिक्षणमासिकात अनेक वर्षे त्यांनी मेंदूला खुराकहे सदर चालविले. ते नाशिक जिल्हा गणित अध्यापक संघाचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाचे ते सदस्य होते. वैदिक गणितह्या ग्रंथाचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. भारतीय शिक्षणमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले.

त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ग्रंथलेखनाचे काम केले. भारतीय इतिहास संकलन समिती, ग. वि. अकोलकर मानसिक क्षमता संशोधन संस्था, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अशा विविध संस्थांसाठी त्यांनी मोलाचे कार्य व मार्गदर्शन केले. अतिशय कठीण काळात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या पायाभरणीच्या कामात त्यांचा सहभाग होता. निवृत्तीच्या काळातही संगणक विज्ञान नव्याने शिकून ते मार्गदर्शन करीत होते.

- प्रा. सुहासिनी पटेल

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].