Skip to main content
x

खैरमोडे, चांगदेव भवानराव

     चांगदेव भवानराव उर्फ आबासाहेब खैरमोडे यांचा जन्म पाचवड, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे झाला. शालेय शिक्षण सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९२९ मध्ये ते बी.ए. झाले. एम.ए.आाणि एलएल.बी.चे शिक्षण त्यांनी घेतले, परंतु सचिवालयात नोकरी मिळाल्याने ते परीक्षेस बसले नाहीत.

     त्यांचे सामाजिक चळवळीवरील लेख व कविता हे लेखन १९२३ ते १९६४ या काळात अनेक नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. १९२८ मध्ये ‘पाटील प्रताप’ व १९२९ मध्ये ‘अमृतनाक’ ही खैरमोडे यांची दोन सामाजिक खंडकाव्ये प्रसिद्ध झाली होती. ‘युनिव्हर्सिटी ऑफ बुस्कानसन’ (अमेरिका) येथील रॉबर्ट मिलर यांचा ‘Button Button Great Tradition. Little Tradition Whose Tradition?’ या शीर्षकाचा लेख ३० जानेवारी १९६६ रोजी प्रसिद्ध झाला. त्यात ‘अमृतनाक’ या खंडकाव्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

     बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने लेखन करणार्‍या खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या  ‘शूद्र पूर्वी कोण होते?’,  ‘हिन्दू स्त्रियांची उन्नती व अवनती’  या लेखांचे अनुवाद केले; ते प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ‘घटनेवरील तीन भाषणे’ इत्यादी भाषांतरित लेखनही प्रकाशित झाले आहे. ‘समाजप्रबोधन’, ‘अस्पृश्यता निवारण’, ‘हिंदुधर्म’, ‘हिंदुसमाज’ अशा विविध विषयांवरचे स्फुट लेखही प्रसिद्ध झाले होते. महारांच्या लढाऊ परंपरेविषयी, महार पलटणीच्या शौर्याची कहाणी सांगणारे ‘अस्पृश्यांचा लष्करी पेशा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने डिसेंबर १९८७ मध्ये डॉ. आंबेडकर चरित्राच्या नवव्या खंडातील मुळातले आठवे प्रकरण स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केले आहे. पण चरित्रकार खैरमोडे यांचे सर्वांत मोठे, महत्त्वपूर्ण लेखन आहे ते डॉ.आंबेडकर यांचे ‘बृहद्चरित्र’ लेखन. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आल्यावर खैरमोडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास घडला. तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीस आणि वैयक्तिक विकासास पोषक ठरला.

     त्यांच्या सहवासात आल्यापासून बाबासाहेबांचे चरित्र लिहिण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रचंड सामग्री जमा करून चरित्राचे अठरा खंड प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. यांपैकी ६, ७, ८ हे खंड अत्यंत महत्त्वाचे असून बाबासाहेब आणि त्यांच्या कार्याविषयी महत्त्वाची माहिती या खंडात आहे तर ९ ते १५ या अप्रकाशित भागांत बाबासाहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व व त्यांचे प्रचंड कार्य यांचा सविस्तर आढावा आहे. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी डॉ.बाबासाहेबांनी दिलेला राजकीय व सामाजिक लढा, त्यासाठी उभी केलेली व्यापक चळवळ पुराव्यांनिशी जगापुढे मांडण्यासाठी ९००० पृष्ठांचे एक दस्तऐवज स्वरूपातील हे चरित्र लिहिण्याचे फार मोठे कार्य खैरमोडे यांनी केले आहे. आंबेडकर चरित्रासाठी उपलब्ध पत्रव्यवहार जतन करणे आणि इतरांचा मिळवणे, हे काम सोपे नाही. पण हे जिकिरीचे काम खैरमोडे यांनी केले आहे.

     १९५२ पासून १९६८ पर्यंत पाच खंड प्रसिद्ध झाले. सहावा खंड छापत असतानाच म्हणजे १८ नोव्हेंबर १९७१ ह्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. पुढील खंड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काम हाती घेतल्यानेच पूर्ण झाले. डॉ. आंबेडकर चरित्रखंडाचे हे प्रचंड कार्य, हीच खैरमोडे यांच्या लेखनाची खरी ओळख आहे.

- प्रा. मंगला गोखले 

खैरमोडे, चांगदेव भवानराव