Skip to main content
x

खानझोडे, समीर

          लिंक अ‍ॅड्स नावाची स्वतःची जाहिरातसंस्था स्थापन करून नावारूपाला आणणारे संकल्पनकार समीर खानझोडे यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांनी १९६८ मध्ये सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून  सुवर्णपदक मिळवून उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी व्हिज्युअलायझर, संकल्पनकार म्हणून एव्हरेस्ट जाहिरातसंस्थेत त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि या जाहिरातसंस्थेचे पहिले चीफ आर्ट डायरेक्टर होण्याचा मान त्यांना मिळाला. कॅगतर्फे देण्यात येणारा आर्ट डायरेक्टर ऑफ द इयरहा सन्मान त्यांना १९७४, १९७५ आणि १९७६ मध्ये सलग तीन वर्षे मिळाला. २००४ मध्ये त्यांना कॅग हॉल ऑफ फेमदेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

खानझोडे यांनी टेकसन्सकंपनीसाठी केलेल्या जाहिराती, इडीसी (इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा, दमण अ‍ॅण्ड दीव लि.) साठीची जाहिरातमोहीम, दिनेश सूटिंग्जच्या आणि गरवारे उद्योगसमूहासाठी केलेल्या जाहिराती या विशेष गाजल्या. विशेषतः दिनेशसूटिंग्जसाठी केलेल्या जाहिरातींमध्ये खानझोडे यांनी ती आणि तो यांच्या नात्यातील विविध छटा तू’, ‘तो’, ‘आम्ही’, ‘आपणअशा नेमक्या कॉपीमधून आणि त्याला साजेशा क्लोजअप छायाचित्रांमधून समर्थपणे व्यक्त केल्या होत्या. छायाचित्रांचा एका वेगळ्या पद्धतीने त्यात वापर केला होता. जाहिरातीच्या मजकुरातील भावार्थ दृश्यमाध्यमातून नेमकेपणाने साकारण्याचे त्यांचे कौशल्य यात दिसून येते.

कॅगवार्षिकाच्या मुखपृष्ठांचे खानझोडे यांनी केलेले संकल्पन असेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. १९७४-७६ च्या सत्ताविसाव्या वार्षिक अंकावर त्यांनी कबुतराचे प्रतीक वापरले आहे. कबुतराच्या एकमेकांत मिसळलेल्या बदलत्या रंगांमधल्या प्रतिमा जाहिरातीसारख्या संवाद-माध्यमातील होणारे स्थित्यंतर दर्शवतात. कबुतराच्या पायाशी संदेश असलेल्या कागदाची गुंडाळी आहे. त्यावर ट्वेन्टिसेव्हन्थ कॅग अ‍ॅन्युअलअसे शब्द आहेत.

खानझोडे यांनी १९८१-८२ च्या तेहेतिसाव्या कॅगवार्षिकाचे मुखपृष्ठ करताना बुद्धिबळाचा पट अधांतर अवस्थेत दाखवला आहे आणि त्यावर प्रतिष्ठेची मानाची ट्रॉफी अथवा मानचिन्ह ठेवले आहे. संपूर्ण लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर लालच, पण थोड्या वेगळ्या रंगछटेत असलेला पट दिसेल न् दिसेल असा आहे. दृक्संवाद- कलेतील सर्जक बुद्धिमत्ता, दृश्यानुभवाला शिस्त लावणारे काळ्या-पांढर्‍या चौकोनांचे ग्रिड आणि सार्‍या व्यावसायिक उद्योगांतली कलात्मक आनंद देणारी क्रीडा असे अनेक अर्थ या अतिवास्तव आणि गूढ वाटणार्‍या चित्रातून निघू शकतात.

त्यांनी लिंक अ‍ॅड्सही स्वतःची जाहिरातसंस्था सुरू केली आणि पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेला जाहिरातकला क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान मिळाले.

जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक कामांमध्ये सर्जनशीलतेचा वापर करीत असतानाच खानझोडे यांच्यातल्या अभिजात चित्रकारालाही त्यांनी जपले आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत १९९९ मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते. समीर खानझोडे कॅगचे (कम्युनिकेशन आटर्स गिल्ड) अध्यक्ष आहेत.

 - रंजन जोशी, दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].