खानोलकर, वसंत रामजी
भारतात आधुनिक वैद्यक संशोधनाची पायाभरणी करणारे आघाडीचे वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म रत्नागिरीजवळच्या मठ या लहानशा गावात झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या लष्करात शल्यचिकित्सक (सर्जन) होते. त्या निमित्ताने खानोलकर कुटुंबाचे वास्तव्य पूर्वीच्या अविभाज्य हिंदुस्थानातील, सध्या पाकिस्तानात असलेल्या क्वेट्टा या शहरात होते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेथेच पूर्ण झाल्यावर खानोलकर ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून एम.बी.बी.एस. ही पदवी उत्तम गुणांनी मिळवल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल व मेडिकल स्कूल या संस्थेत त्यांनी विकृतिशास्त्र (पॅथॉलॉजी) या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले. त्यापूर्वी सतत तीन वर्षे विकृतिशास्त्र या विषयात एकाही विद्यार्थ्यास परीक्षेत यश मिळाले नव्हते. त्यानंतर १९२३ साली विकृतिशास्त्र विषय घेऊन एम.डी. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा मान एकाच विद्यार्थ्यास मिळाला. हा बहुमान मिळवणारी व्यक्ती म्हणजे खानोलकर. स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचे हे यश केवळ देदीप्यमान होते.
परीक्षेतील यशामुळे खानोलकरांना पुढील अभ्यासासाठी ग्रॅहम संशोधन शिष्यवृत्ती सहजच मिळाली. या शिष्यवृत्तीमुळे त्यांची दृष्टी वैद्यकीय संशोधनाकडे वळली. या काळातच वैद्यकशास्त्राच्या प्रगतीसाठी मूलभूत संशोधन करणे आवश्यक आहे, हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला. स्वदेशाच्या प्रगतीसाठी वैद्यकीय संशोधन करण्याचा निश्चय करून खानोलकर मुंबईस परतले. ज्या ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांनी पदवी मिळवली होती, तेथेच त्यांनी स्वत:ची वैद्यकीय कारकीर्द सुरू केली. ग्रॅन्ट वैद्यकीय कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना त्यांनी अनेक तरुण डॉक्टरांना वैद्यकीय संशोधन करण्याची प्रेरणा दिली.
मुंबई महानगरपालिकेने १९२६ साली, किंग एडवर्ड मेमोरियल (के.ई.एम.) हॉस्पिटल व सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय कॉलेजची नव्याने स्थापना केली. तेथे एका तरुण, व्यासंगी व वैद्यकीय संशोधनाची आवड असणाऱ्या विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्टची) गरज होती. या पदासाठी खानोलकरांना निवडण्यात आले. जी.एस. वैद्यकीय कॉलेजमध्ये विकृतिशास्त्र विभागात त्यांनी मानवी शरीरातील ऊतींच्या नमुन्यांची मांडणी करून म्यूझियम उभारले. या संग्रहालयाचा उपयोग रोगनिदानासाठी, तसेच शवचिकित्सेच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठीही होऊ लागला. त्यांनी रुग्णांच्या सोईसाठी रोगचिकित्सा कक्ष सुरू केला. विकृतिशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विकृत ऊतींची माहिती देण्यासाठी शवविच्छेदन करण्याचे तंत्र शिकविले. विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व खेळाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी एक जिमखाना बांधून घेतला.
डॉक्टरांना बऱ्याचदा पेशंट, तसेच ऊती किंवा पेशींची छायाचित्रे घ्यावी लागतात. त्यासाठी डॉ. खानोलकरांनी छायाचित्रण विभाग सुरू केला. आज हे सर्व विभाग रुग्णालयात असणे गृहीत धरले जाते. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या विभागांची निर्मिती करणे क्रांतिकारक तर होतेच, पण व्यावहारिकही होते. खानोलकर शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळेच के.ई.एम. रुग्णालयामधील प्राध्यापकपद स्वीकारताना त्यांनी आपणांस नियमाप्रमाणे पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त करण्यात यावे, अशी अट घातली होती.
के.ई.एम. रुग्णालय व जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असताना त्यांच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली. १९३५ साली क्वेट्टा येथे झालेल्या भूकंपात त्यांच्या सर्व निकटवर्तीयांचा मृत्यू झाला. या संकटावर त्यांनी धीरोदात्तपणे मात केली. वडिलांचा संस्कृत व इतर भाषांतील मौल्यवान ग्रंथसंग्रह डॉ. खानोलकरांनी मुंबई विद्यापीठास प्रदान केला. खानोलकरांचे मराठी व इंग्रजीप्रमाणेच जर्मन, फ्रेंच, उर्दू, पर्शियन इत्यादी भाषांवरही प्रभुत्व होते.
जी.एस. वैद्यकीय महाविद्यालय व के.ई.एम. रुग्णालयामध्ये असताना त्यांनी ‘इंडियन चाइल्डहुड सिरोसिस’ या रोगावर महत्त्वपूर्ण संशोधन केले, तसेच कुष्ठरोगावरील संशोधनाची सुरुवात केली. कुष्ठरोगाचे जंतू मज्जापेशीत वसतात हे त्यांनी प्रयोगशाळेत ऊती संवर्धनाचे तंत्र वापरून दाखवून दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव जागतिक स्तरावर करण्याकरिता सीबा फाउंडेशनने एक परिसंवाद आयोजित केला होता.
के.ई.एम. रुग्णालयामध्ये कार्यरत असताना, खानोलकरांपुढे एक आव्हान नव्याने उभे राहिले. ते म्हणजे कर्करोग संशोधन व रोग्यावर उपचार करण्यासाठी नव्याने बांधलेल्या टाटा स्मारक रुग्णालयाची स्थापना.
पंधरा वर्षांच्या योगदानानंतर त्यांनी के.ई.एम. रुग्णालय स्वेच्छेने सोडून टाटा स्मारक रुग्णालयाच्या विकृतिशास्त्र विभागाचे संचालकपद स्वीकारले. खानोलकरांच्या सहभागामुळे टाटा स्मारक रुग्णालयाला प्रतिष्ठा लाभली. वैद्यकीय संशोधन हे वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे याबद्दल त्यांची खात्री होती. त्यांना मिळालेल्या जागतिक प्रसिद्धीमुळे कित्येक तरुण विकृतिशास्र व संशोधन या विषयाकडे आकर्षित झाले. यांतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दिवंगत धन्वंतरी डॉ.दोराब दस्तूर. त्यांनी खानोलकरांच्या मार्गदर्शनाखाली मज्जातंतुविकृतिशास्त्र (न्युरोपॅथॉलॉजी) या विषयात एम.डी. पदवी मिळवली व संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग संशोधनासाठी वेचून जगन्मान्यता मिळवली.
टाटा स्मारक रुग्णालयामध्ये डॉ. खानोलकरांनी नव्याने आधुनिक विभागाची मांडणी केली. विविध प्रकारच्या कर्करोगांचे अचूक निदान होण्यासाठी शिक्षण देऊन कुशल विकृतिशास्त्रज्ञाची (पॅथॉलॉजिस्ट) नवी पिढी तयार केली. कर्करोग्यांना योग्य तऱ्हेचा व वेळीच उपचार मिळावा या हेतूने संशोधनाचा पाया घातला. विकृतिशास्त्र या विषयाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी ‘टीचिंग पॅथॉलॉजिस्ट’ ही चळवळ उभी केली. यात त्या-त्या विभागातील तज्ज्ञांच्या अनुभवावर चर्चा, वादविवाद होत असत व शोधनिबंध वाचले जात. तसेच भारतातील सर्व विकृतिशास्त्रज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स’ हे व्यासपीठ तयार केले. मानवाच्या सवयी, राहणीमान यांमुळे कर्करोग उद्भवतो, हे त्यांनी दाखवून दिले. स्वत:च्या निरीक्षणातून त्यांनी अनुमान काढले, की तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग होतो, वर्षानुवर्षे धोतराची घट्ट गाठ बांधलेल्या जागी त्वचेला इजा पोहोचून त्या ठिकाणी त्वचेचा कर्करोग होतो, तसेच काश्मीरमध्ये थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाहेरील डगल्याच्या आत कांगरी नावाची निखाऱ्यांनी भरलेली शेगडी सतत ठेवल्यानेदेखील त्वचेचा कर्करोग होतो. जीवनशैली व कर्करोग यांचा घनिष्ठ संबंध पुढील काळात जगभरातील वैज्ञानिकांनी दाखवून दिला असला, तरी या क्षेत्रात खानोलकर अग्रेसर होते. त्यांनी सुरू केलेल्या लहानशा विकृतिशास्त्र विभागाचे १९५२ साली ‘इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर’ या नवीन संस्थेत रूपांतर झाले. या संस्थेचे संस्थापकपद स्वीकारल्यावर त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. यासाठी तंत्रज्ञ व वैज्ञानिक या दोन गटांची गरज होती. कर्करोग संशोधनाच्या सुरुवातीस त्यांनी हुशार विद्यार्थी निवडून त्यांच्याकरवी उत्तम संशोधन करून घेतले. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्करोग संशोधनाचे पैलू दाखवून प्रत्येक शाखेत नेतृत्व तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ‘कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट’ला जागतिक मान्यता मिळाली. या संस्थेत त्यांनी टिश्युकल्चर, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, बायोफिजिक्स, इम्युनोलॉजी, केमोथेरपी, एन्डोक्राइनॉलॉजी, एम्ब्रायॉलॉजी व ह्यूमन जेनेटिक्स विभाग निर्माण केले.
कर्करोग संशोधनात प्राण्यांचा वापर आवश्यक असतो. याकरिता खानोलकरांनी संस्थेत प्राणिगृहाची स्थापना केली. या विभागाच्या देखरेखीसाठी एका तंत्रज्ञाला इंग्लंड येथे एका वर्षाकरिता शिक्षण व अनुभव घेण्यासाठी पाठवले. या तंत्रज्ञाने मायदेशी आल्यावर अनेकांना शिक्षित तयार केले व कर्करोग संशोधनास उपयुक्त अशा कितीतरी जातींची निपज केली. त्याचप्रमाणे, संस्थेचा छायाचित्रण विभाग (फोटोग्राफी डिपार्टमेंट) अद्ययावत असावे, या हेतूने एका तंत्रज्ञास इंग्लंड व युरोपमधील प्रयोगशाळांत धाडून प्रशिक्षित केले व उत्तम छायाचित्रण विभागाची स्थापना केली. कर्करोग संशोधनासाठीदेखील खानोलकरांनी कुशल नेतृत्व तयार केले. संस्थेतील प्रत्येक संशोधकाने परदेशातील प्रयोगशाळांत काम करून अनुभव व ज्ञानाची कक्षा वाढवावी, ही त्यांची धारणा होती. कर्करोगावरील जागतिक संशोधनाची त्यांना सखोल माहिती असे व आपल्या देशात कोणत्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे, याबद्दल त्यांचे विचार पक्के होते.
खानोलकरांनी वैद्यकशास्त्रातील वैज्ञानिक चळवळ उभारली. यातूनच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ (एन.आय.आर.आर.एच.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहिमॅटोलॉजी या संस्था निर्माण झाल्या. या संस्थांचे तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील बायोमेडिकल ग्रूपचे बीज त्यांच्या प्रेरणेने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सुरुवातीच्या विकृतिशास्त्र प्रयोगशाळेत व नंतर कर्करोग संशोधन केंद्रातच रोवले गेले. देशापुढील वैद्यकीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करण्यासाठी अचूक दृष्टी असणाऱ्या खानोलकरांना देश-विदेशांत अनेक सन्मान मिळाले. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट कॅन्सर (यु.आय.सी.सी.) या जागतिक संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अणुविभाजनातून उद्भवणाऱ्या वाईट परिणामांपासून संरक्षण करण्याबाबतच्या वैज्ञानिक समितीवर भारताचे प्रतिनिधी व नंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. अमेरिका, युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांतील वैज्ञानिकांनी त्यांचा सन्मान केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवीने गौरविले. ते १९६० ते १९६३ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. मराठी विज्ञान परिषदेने आपल्या १९६७ सालच्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा सन्मान केला होता.