Skip to main content
x

खंबाटा, अरझन रूसी

           भारतीय समकालीन शिल्पकलेमध्ये ‘भंगार-शिल्पे’- स्क्रॅप्चर्स (स्क्रॅप-‘स्कल्प्चर्स’) ही अभिनव शिल्पे घडवणारे शिल्पकार अरझन रूसी खंबाटा यांचा जन्म मुंबईमधील पारशी कुटुंबात झाला. अरझन यांची आई झरीन बालवाडी चालवत असे, तर वडील रूसी हे वास्तुरचनाकार होते. आई व वडील या दोघांनीही अरझन यांच्या कलेला कायम उत्तेजन दिले. त्यांचा विवाह १९९४ मध्ये खुश्‍नुमा यांच्याबरोबर झाला.
       शिल्पकार अदी दाविएरवाला व आनंद मोहन नाईक यांच्या कलाकार्यशाळेमधून १९८२ च्या सुमारास अरझन यांची ओळख ‘स्क्रॅप - स्कल्प्चर्स’ या कलाप्रकाराशी झाली. या काळात असतानाच शिल्पकलेची आवड जोपासत त्यांनी त्यांचे उच्चशिक्षण ‘रचना संसद ऑफ आर्किटेक्चर’मधून १९९१ मध्ये पूर्ण केले. वास्तुरचनेच्या नियोजनबद्ध शिक्षणाचा उपयोग त्यांनी शिल्पनिर्मितीसाठी करून घेतला. त्यांनी १९८३ मध्ये केलेेले ‘द हॉर्स’ किंवा १९८५ मध्ये नेहरू सेंटर येथील ‘ज्वेल ऑफ इंडिया’साठी केलेले ‘द मुघल’ ही त्यांची सुरुवातीच्या काळातील महत्त्वाची शिल्पे होत. नंतरच्या काळात बजाज भवन, आदित्य बिर्ला सेंटर, अँबी व्हॅली अशा ठिकाणी खुल्या आसमंताखाली त्यांची शिल्पे प्रदर्शित झाली.
        नटबोल्ट, खिळे, स्कू्र, नळाच्या तोट्या, वाहनांचे सुटे भाग इत्यादींमधून बुद्धिबळ खेळाडू, घोडा, रावण अशी उत्कृष्ट शिल्पे अरझन यांनी साकारली. स्वस्त आणि सहज उपलब्ध अशा टाकाऊ वस्तूंमधून निर्माण केलेल्या या शिल्पांना अरझन यांनी स्वतःच १९९३ साली ‘स्क्रॅप्चर’ (भंगार-शिल्प) असे संबोधले. त्यांनी १९९६ पासून मात्र अशा वस्तूंचा वापर कमी करून धातूचे पत्रे, पाइप, लाकूड इत्यादी माध्यमे वाकवून, कापून शिल्पनिर्मिती करण्यास सुरुवात केली. आता निर्माण होणारी त्यांची ही शिल्पे रूढार्थाने ‘स्क्रॅप्चर्स’ नाहीत.
        अरझन खंबाटा यांच्या ‘द आय इन द स्काय’, ‘टायडल्’, ‘थॉ’, ‘द फिनोमिनन’ इत्यादी शिल्पांमध्ये मिश्र माध्यमांचे पोत आणि त्यांतील अमूर्त आकारांच्या शक्यतांचा विचार दिसतो, तर ‘द हंबल’, ‘द बोर्ड रूम’, ‘द सेंटर फोल्ड’, ‘लॅपटॉप मॉडेल’, ‘एक्स्पोज’, युवरसेल्फ टू आर्ट’ यांसारख्या शिल्पांमध्ये त्यांची तीव्र विनोदबुद्धी जाणवते. अरझन यांनी १९८४ पासून विविध सामूहिक प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे एकल प्रदर्शनेही केली आहेत. ते ‘शिल्पकला’ या विषयावर कार्यशाळा व व्याख्याने देतात. त्यांनी निर्माण केलेला ‘डेसिबल’ हा लघुचित्रपट २०१० च्या ‘काळा घोडा कलामहोत्सवा’त प्रदर्शित झाला. कुटुंब आणि समाज, जीवनमूल्ये आणि सामाजिक भान यांचा विचार केंद्रस्थानी ठेवून प्रयोगशीलता व कलेमधली सर्जनशीलता जपणारे अरझन खंबाटा हे म्हणूनच आजच्या आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक महत्त्वाचे शिल्पकार ठरतात.

- माणिक वालावलकर

खंबाटा, अरझन रूसी