Skip to main content
x

खोब्रागडे, अंबादास यू.

          नेक वर्षे परदेशात वास्तव्य असलेले व सामाजिक कोलाहलापासून दूर एकांतात कलासाधना करणारे अमूर्त चित्रकार अंबादास खोब्रागडे यांचा जन्म अकोला येथे झाला. त्यांचे वडील मोसम असेल त्याप्रमाणे संत्री, आंबे विकण्याचा व्यवसाय करीत. ते जवळच्या गावांमध्ये फळे विकायला जात, तेव्हा त्यांच्याबरोबर छोटा अंबादासही जात असे. वडिलांकडे स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने उपजीविकेचे अन्य साधनही नव्हते. अंबादास यांना सहा भाऊ होते. भाऊ शरीर कमवायला आखाड्यात जायचे, तर अंबादास यांना शाळेची, संगीताची आणि कलेची ओढ होती. कला आणि संगीत शिक्षक शिदोरे यांच्या कलेचे संस्कार आणि गांधीजींच्या साध्या राहणीचा व उच्च विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. आयुष्यात उच्च ध्येयाबद्दल ओढ निर्माण झाली. समाजाच्या खालच्या स्तरातून आल्यामुळे आणि आर्थिक ओढगस्तीमुळे भौतिक गरजा आणि आध्यात्मिक विचार यांचा त्यांच्या मनात जो संघर्ष चाले, त्यातून त्यांचे निसर्गातल्या निराकार चैतन्यशक्तीकडे आकर्षित होणारे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व तयार झाले.

शालेय शिक्षण झाल्यावर अंबादास अहमदाबादला आले आणि तेथे चित्रकार रविशंकर रावळ चालवीत असलेल्या खासगी कलाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. रावळ हे कलाविद्यालय त्यांचे शिष्य कनुभाई देसाई आणि इतरांच्या सहकार्याने चालवीत असत. लघुचित्रशैलीत निसर्गचित्रे आणि मानवाकृतिप्रधान चित्रे रंगवण्याचे तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर अंबादास यांच्या लक्षात आले, की हे काही आपल्या प्रकृतीत बसणारे काम नाही. त्यांनी मग मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांचे काम बघून त्यांना तिसर्‍या वर्षात प्रवेश मिळाला आणि १९५२ मध्ये त्यांनी पेंटिंगमधील पदविका प्राप्त केली.

जे.जे.च्या अकॅडमिक शैलीचे वर्चस्व असलेल्या अभ्यासक्रमात अंबादास फारसे रमले नाहीत. न्यूड स्टडी, निसर्गचित्रण यांविषयी त्यांना कधी ओढ वाटली नाही. विशिष्ट शैली अथवा प्रस्थापित सौंदर्यमूल्ये जपणार्‍या तंत्रशरणतेपेक्षा विद्यार्थिदशेतही अंबादास यांचा कल प्रयोगशीलतेकडे अधिक असे. त्यांच्या या विक्षिप्त वाटणार्‍या बंडखोरीला सहाध्यायी आणि शिक्षकांनी विरोध न करता त्यांच्या विचारप्रणालीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आणि त्यांचे त्यांना वाढू दिले. खरे तर, ती बंडखोरी नसून कलाशिक्षणातील चाकोरीबद्ध शिक्षणपद्धतीला आतल्या आवाजाने केलेला तो विधायक विरोध होता.

अर्थात, जे.जे.मधील या वातावरणाला काही सन्मान्य अपवाद होते. उदा. शंकर पळशीकरांसारखे शिक्षक आणि नव्या वाटा चोखाळू पाहणारे तय्यब मेहता, अकबर पदमसी, एस.एच. रझा यांच्यासारखे प्रोग्रेसिव्ह ग्रूपकडे कल असलेले सहाध्यायी. अंबादास यांना जे.जे.मध्ये शिकत असताना शिष्यवृत्ती मिळत होती. त्यातून त्यांचा खर्च जेमतेम भागत असे. ते १९५१ पासून समूह प्रदर्शनात भाग घेत होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर चरितार्थासाठी १९५२ ते ५५ या काळात त्यांनी मुंबईच्या एका खेळण्यांच्या कारखान्यात नोकरी केली. त्यांनी १९५५ ते ५९ या काळात भारतभर प्रवास केला. मणिपूर आणि आसाम इथे ते राहिले, सीमा ओलांडून ब्रह्मदेशातही गेले. ही निरुद्देश भटकंती करत असताना त्यांना अनेकदा अर्धपोटी राहावे लागले. जंगलातून वाट काढताना दमछाक झाली. त्यातून निसर्गाशी तर नाते जुळलेच; पण अंबादासांना मानवी अस्तित्वाचा एक नवा अर्थही गवसला.

केंद्र सरकारच्या हातमाग महामंडळासाठी (हँडलूम बोर्ड) टेक्स्टाइल डिझाइनर म्हणून अंबादास यांनी मद्रास (चेन्नई), नवी दिल्ली आणि मुंबई येथे १९५९ ते ६९ या काळात काम केले. विणकर महामंडळाच्या (वीव्हर्स बोर्ड) ओरिसा कार्यालयात त्यांची नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रकार बनण्याचे ठरवले आणि ते दिल्लीला स्थायिक झाले. या काळात एकीकडे त्यांची कलासाधना चालूच होती. त्यांना १९६२ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले व १९६३ मध्ये ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीतील कुनिका केमोल्ड गॅलरीमध्ये १९६५ मध्ये त्यांचे एकल प्रदर्शन झाले व नंतर देश-परदेशांत त्यांची अनेक प्रदर्शने झाली. ते १९६६ ते ६८ या काळात पश्‍चिम जर्मनीचे पाहुणे कलाकार म्हणून जर्मनीला जाऊन आले. त्यांनी १९७० मध्ये भारत सरकारच्या निमंत्रणावरून अमेरिकेचा दौरा केला. ते १९९०-९१ हे एक वर्ष भोपाळच्या भारत भवनमध्ये निवासी चित्रकार म्हणून होते. अंबादास त्यांची नॉर्वेजियन पत्नी हेज (कशसश) आणि त्यांच्या कांचन या मुलीसह नॉर्वेमधील ओस्लो, इथे राहतात. ते १९७२ पासून तिथेच स्थायिक झालेले आहेत.

अंबादास यांच्या जडणघडणीत दिल्लीतील त्यांचे चित्रकार मित्र आणि ‘गू्रप १८९०’ ची स्थापना या दोन्ही घटनांना महत्त्वाचे स्थान आहे. या गू्रपची १९६२ मध्ये स्थापना करण्यात आली. या ग्रूपची पहिली बैठक भावनगर येथील ज्योती पंड्या यांच्या ‘१८९०’ हा घरक्रमांक असलेल्या घरात झाली म्हणून ‘ग्रूप १८९०’ असे त्याचे नामकरण झाले. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपने सुरू केलेल्या आधुनिक कलेच्या प्रवाहात पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक कलेचे जे अंधानुकरण होऊ लागले होते, ते या ग्रूपला मान्य नव्हते. कोणत्याही कलातत्त्वांच्या बंधनांपासून मुक्त अशा विशुद्ध कलानिर्मितीवर त्यांचा विश्‍वास होता. ऑक्टोबर १९६३ मध्ये या ग्रूपचे पहिले आणि एकमेव प्रदर्शन झाले आणि त्याचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू आणि मेक्सिकन कवी ऑक्टेव्हियो पाझ यांच्या हस्ते झाले.

अंबादास यांच्या जे. स्वामिनाथन, जेराम पटेल, हिम्मत शाह अशा समविचारी चित्रकारांशी दिल्लीतील वास्तव्यात चर्चा होत असत. स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिकता आणि परंपरा यांच्यातला विरोधाभास आणि एक स्वतंत्र देश या नात्याने स्वत:ची ओळख निर्माण करण्याची असलेली ओढ, या भारतीय कलानिर्मितीमागच्या प्रमुख प्रेरणा होत्या. राजकीय-सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब दृश्यकलेत पडले ते मानवाकृतिप्रधान, मुख्यत: बडोदा स्कूलच्या चित्रकारांच्या चित्रांमधून. रामकुमार, के.सी.एस. पणिक्कर, व्ही.एस. गायतोंडे यांनी या बहिर्मुखतेपेक्षा अंतर्मुख करणार्‍या आत्मभानाकडे नेणारा स्वतंत्र मार्ग चोखाळला.

या सर्व चित्रांना अमूर्तवादी असे संबोधले जात असले, तरी त्यात अनुभवास येणारा आत्मानुभव वेगवेगळ्या प्रकारचा आहे. रामकुमार किंवा रझा यांच्याप्रमाणे अंबादास यांचा प्रवास मूर्त आकारांपासून अमूर्ततेकडे झाला नाही किंवा जी.आर. संतोष यांच्या चित्रांना असते तशी निओ-तांत्रिक विचारांची बैठक त्यांच्या चित्रांना नाही, अथवा गायतोंडे यांच्या चित्रांमध्ये असते तशी क्षोभांना विराम देणारी ध्यानावस्था नाही. अंबादास यांच्या चित्रांमध्ये असते ती ऊर्जेची गतिमानता, द्वैत आणि अद्वैत भावनेत रूपांतर होताना निर्माण होणारी ऊर्जा. ‘‘जमिनीतून उगवणारे रोपटे जी अमर्याद ऊर्जा घेऊन येते, ती माझ्या चित्रांचा पाया आहे,’’ असे अंबादास सांगतात.

अंबादास यांच्या सुरुवातीच्या चित्रांमध्ये जाड रंगांचा वापर करून, छोट्या-छोट्या ब्रशच्या फटकार्‍यांनी बनलेले आकार थोडेसे शिस्तबद्ध आणि स्थिर वाटतात. साठच्या दशकातील चित्रांमध्ये अंतर्गत अस्वस्थ ऊर्मीने ते आकार गतिमान होतात. सत्तरच्या दशकात आकाराला येणारे आणि विलय पावणारे विश्‍वच त्यांच्या चित्रांमधून दृश्यमान होते. सत्तरच्या दशकातील त्यांची जलरंगातील चित्रे एक वेगळाच तरल असा दृश्यानुभव देतात. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासारखे त्यांतले क्षणभंगुर भासणारे आकार काळ आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडू पाहतात. त्यांच्या चित्रांमधून ज्वालामुखी, भूगर्भरचनेसारखे आकार किंवा रेखाटनांमधून मानवी आकृती भासमान होतात; पण तो केवळ योगायोग किंवा अपघात असतो. कधीकधी त्यात सुलेखनशैलीशी सादृश्य असणारे अक्षरांचे आकारही दिसतात. पण अंबादास यांची भाषा चिन्हविरहित भाषा आहे. तिच्यावर अर्थांचे ओझे लादणे अन्यायाचे ठरेल.

निर्मित वस्तू ही निर्मात्याचाच एक भाग असते. असतेपणाच्या अखंड प्रक्रियेचा चित्रकार हा एक भाग असतो. समोरचे जग हे आपल्या मनोव्यापारांचेच दृश्य फलित असते. त्या प्रक्रियेचा वेध अंबादास यांनी घेतला आणि आजही त्यांची ही सर्जक प्रक्रिया थांबलेली नाही. नव्या निर्मितिक्षम क्षणांच्या ती शोधात आहे. सध्या नॉर्वेमधील ओस्लो येथे त्यांची कलासाधना आजही सुरू आहे.

- दीपक घारे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].