खरे, गणेश हरी
गणेश हरी खरे यांचा जन्म पनवेल येथे झाला. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचे वडील निधन पावल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच दारिद्य्राचे चटके सहन करावे लागले. त्यांचे माध्यमिक शिक्षण वाईच्या द्रविड हायस्कुलात झाले. ते चालू असतानाच त्यांनी व त्यांच्या काही मित्रांनी एक विद्यार्थी मंडळ स्थापन करून वाईत तीन ठिकाणी प्रौढांकरिता रात्रीच्या मोफत शाळा चालविल्या होत्या.
१९२० मध्ये मॅट्रिक झाल्यावर खऱ्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे पहिल्या वर्षाला असतानाच त्यांनी महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत उडी घेतली आणि महाविद्यालय सोडले. या सुमारास कोयना धरणाची योजना विचाराधीन होती. ते धरण झाल्यास जी गावे उठतील, त्यांतील रहिवाशांना योग्य ती नुकसानभरपाई देऊन त्यांचे पुनर्वसन व्हावे असा प्रचार खरे आणि त्यांचे काही मित्र यांनी सुरू केला. भाषणे करून अशांतता माजविल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर, त्यांनी एक वर्ष अशी चळवळ करणार नाही असा जामीन द्यावा म्हणून, खटला दाखल झाला. असहकारितेच्या तत्त्वाला अनुसरून खऱ्यांनी जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना एक वर्ष साध्या बंदिवासाची शिक्षा होऊन १२ ऑगस्ट १९२२ रोजी त्यांची कारागृहात रवानगी झाली. या बंदिवासाच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, गीतारहस्य, तुलसीरामायण इत्यादी ग्रंथांची पारायणे केली.
तुरुंगातून सुटका झाल्यावर त्यांनी सुमारे वर्षभर सातारा जिल्हा काँग्रेसचे एक चिटणीस म्हणून काम केले. त्यानंतर तत्कालीन राजकीय व सामाजिक वातावरणामुळे खर्यांनी सक्रिय राजकारण सोडले आणि १९२४ ते १९२९ या काळात सातार्याच्या राष्ट्रीय शाळेत अल्प वेतनावर शिक्षक म्हणून काम केले.
ज्ञानार्जनाची तळमळ खऱ्यांना स्वभावत:च असल्यामुळे सातारा येथे मुलांना शिकवीत असताना त्यांनी स्वत:चा अभ्यासही चालू ठेवला. आवड आणि परिस्थितीच्या मर्यादा यांमुळे त्यांनी त्याकरिता इतिहास हा विषय निवडला. सातारा येथील वास्तव्यात त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची प्रकाशने आणि इतिहासाचार्य राजवाडे व वासुदेवशास्त्री खरे यांनी संपादित केलेले कागदपत्रांचे खंड यांपैकी मिळतील ती सर्व पुस्तके वाचून त्यांनी टिपणेही काढली. राजवाडे, खरे इत्यादी पूर्वसूरींनी जसे काम केले, तसेच आपणही करावे असे या अभ्यासातून त्यांना वाटू लागले. इतिहास संशोधक होण्याचे ठरविल्यावर त्यांनी त्याकरिता पूर्वतयारी सुरू केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते प्रामुख्याने स्वत:च्याच प्रयासांनी शिकले; ब्राह्मी आणि उर्दू या लिपीही त्यांनी आत्मसात केल्या.
सातारा येथील साडेचार वर्षांच्या वास्तव्यात एवढी पूर्वतयारी झाल्यावर खऱ्यांनी अधिक अभ्यासाकरिता पुण्याला जाण्याचे ठरविले. भारत इतिहास संशोधक मंडळ व रायगड स्मारक मंडळ या दोन संस्थांनी मिळून ‘शिवचरित्र कार्यालय’ नावाची शिवचरित्रविषयक कामाला वाहिलेली एक संस्थाच तेव्हा स्थापन केली होती. तिथे नोकरी मिळेल अशा भरवशावर खरे पुण्याला आले. पण तत्कालीन अडचणींमुळे त्यांना शिवचरित्र कार्यालयात लगेच काही नोकरी मिळू शकली नाही. मात्र, त्या संस्थेकडून त्यांना प्रामुख्याने मोडी कागदपत्रांचे लिप्यंतर करण्याचे काम दिले जाई. त्यातून त्यांना सहा महिन्यांत सुमारे शंभर रुपये मेहनताना म्हणून मिळाले. या सहा महिन्यांत त्यांचा दिनक्रम असा असे; दिवसभर भारत इतिहास संशोधक मंडळात अभ्यास करायचा व मिळाले तर काम करायचे, अप्पा बळवंत चौकातील आनंदाश्रम या संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनास वाहिलेल्या संस्थेत जाऊन अंघोळ करायची, एका मित्राकडे घेऊन ठेवलेले दीड पावशेर दूध व दोन पैशांचा पाव यांवर होईल तेवढी क्षुधाशांती करून पुन्हा मंडळात अभ्यास किंवा काम करायचे आणि रात्री उपाशीपोटीच मंडळात किंवा आनंदाश्रमात झोपायचे.
असे सहा महिने काढल्यावर खऱ्यांना शिवचरित्रकार्यात तेव्हाचे चिटणीस दत्तोपंत आपटे यांनी दरमहा २५ रुपये पगारावर नोकरीत घेतले. त्यांनी ब्राह्मी व फारसी यांचे बऱ्यापैकी ज्ञान मिळविल्याचे दिसून आल्यावर १९३० मध्ये त्यांना दरमहा ५० रुपये पगारावर भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सेवेत घेण्यात आले आणि राहण्याकरिता मंडळातच एक छोटी खोलीही मिळाली.
मंडळात काम करू लागल्यापासूनच खऱ्यांनी फारसीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. त्याकरिता पुस्तकांनाच त्यांनी गुरू केले. शिवाय काही काळ ते भावे स्कुलातील फारसीच्या वर्गातही बसत. शिवकालीन व शिवपूर्वकालीन मोडीतही ते पारंगत झाले. प्रामुख्याने स्वाध्यायाच्या बळावरच ते कानडी तर शिकलेच; पण जुने कानडीही (हळे कन्नड) त्यांनी आत्मसात केले. अशा प्रकारे मोडी, ब्राह्मी, प्राकृत, संस्कृत, उर्दू (दक्खिनी हिंदी), कानडी व फारस या लिपी व भाषा त्यांनी अवगत करून घेतल्या. ग्रंथवाचनाने त्यांनी स्वत:च्या इंग्रजीच्या ज्ञानातही वाढ केली. आवश्यक ती पुस्तके अभ्यासण्याकरिता ते पुण्यातील विविध ग्रंथालयांमध्ये जाऊ लागले. त्याकरिता फार पायपीट करावी लागे आणि वेळही फार जाई, म्हणून प्रौढ वयात ते सायकल चालवायला शिकले.
साधारण १९३० पासून खऱ्यांचे संशोधन प्रकाशित होऊ लागले. त्या वर्षी प्रकाशित झालेल्या शिवचरित्र-साहित्य, खंड ३ मध्ये छापण्यात आलेल्या मराठी कागदपत्रांपैकी काही कागदपत्रे खर्यांनी संपादित केली आहेत. पुढे शिवचरित्रसाहित्य, खंड ६ (१९३७), ११(१९५८), १२ (१९६४) व १३ (१९६५) हे खंड पूर्णपणे त्यांनीच संपादित केले आणि त्या मालेच्या चौदाव्या खंडाच्या संपादक मंडळात ते प्रमुख होते. ऐतिहासिक फारसी साहित्याचे सहा खंड त्यांनी संपादित केले. त्यांपैकी पहिला खंड १९३४ मध्ये प्रकाशित झाला. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या आदिलशाही फर्मानांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक फर्माने एकट्या खर्यांनी संपादित केली आहेत.
त्यांनी शिवकालाप्रमाणेच पेशवेकालीन कागदपत्रांचेही अध्ययन केले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेत १९४३ मध्ये दिलेल्या एका व्याख्यानात रियासतकार सरदेसायांनी सर जदुनाथ सरकार यांच्या सांगण्यावर विसंबून पुढील अर्थाचे विधान केले : ‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले ही निव्वळ थाप आहे, तिला कोणताही आधार नाही.’ त्यानंतर महिन्याभरातच त्यांनी ‘हा घ्या मराठे अटकेपार गेल्याचा पुरावा’ असा लेख लिहून मराठे अटकेपार गेले होते हे, ज्या फारसी कागदपत्रांवर जदुनाथ सरकारांचा मोठा भरवसा असे, अशा फारसी कागदपत्रांच्या आधारेच, सिद्ध केले. त्यांनी दाखल केलेले पुरावे इतके बिनतोड होते, की सरदेसायांना व सरकारांनाही आपले विधान चुकीचे असल्याचे मान्य करावे लागले.
मोडी व फारसीप्रमाणेच ब्राह्मी व संस्कृतचाही अभ्यास खर्यांनी केला असल्यामुळे इतिहाससंशोधनाच्या त्याही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला. ‘दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने’ या ग्रंथाच्या पहिल्या तीन खंडांमध्ये त्यांनी संपादित केलेले ब्राह्मी, कानडी व संस्कृत लेख छापलेले आहेत. नाणी, मूर्ती व ऐतिहासिक स्थळे यांचाही सखोल अभ्यास त्यांनी केलेला होता. ‘मंडळातील नाणी’ हे त्यांचे पुस्तक अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहे. ‘श्रीक्षेत्र आळंदी’, ‘श्रीविठ्ठल आणि पंढरपूर’, ‘सिंहगड, शनिवारवाडा आणि स्वराज्यातील तीन दुर्ग’ ही त्यांची पुस्तके म्हणजे ऐतिहासिक स्थळांवरील संशोधकीय पुस्तके कशी लिहावीत याचा कित्ताच आहे. मराठी इतिहास संशोधकांचे संशोधन जगापुढे यायला हवे असेल तर त्यांनी इंग्रजीतही लिहिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. खरे आपली मते आचरणात आणीत असत. त्यानुसार त्यांनी इंग्रजीत शंभराहून अधिक लेख लिहिले आणि ते प्रतिष्ठित संशोधकीय नियतकालिकांमध्ये प्रकाशितही झाले. त्यांत शिवकालावरील व पेशवेकालावरील लेख आहेत, नाण्यांवरील आहेत, मूर्तींवरील आहेत आणि ताम्रपटांवरीलही आहेत. त्यांच्या निवडक इंग्रजी लेखांचे पुस्तक ‘सिलेक्ट आर्टिकल्स’ अशा नावाने त्यांनी प्रकाशितही केले.
भारत इतिहास संशोधक मंडळात कागदपत्रांचा व इतर वस्तूंचा जो अमूल्य संग्रह आहे, तो गोळा करण्यात खऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. मंडळासाठी त्यांनी चार हजारांहून अधिक पृष्ठे लिहिली किंवा संपादित केली. त्यांनी लिहिलेल्या लहानमोठ्या मराठी व इंग्रजी पुस्तकांची संख्या पन्नासहून अधिक आहे आणि लेखांची संख्या सुमारे साडेतीनशे आहे. त्यांच्या ग्रंथसंपदेतील ‘मूर्तिविज्ञान’ आणि ‘संशोधकाचा मित्र’ या ग्रंथांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.
खऱ्यांच्या इतिहाससंशोधनातील एक विशेष असा, की पुरातत्त्वापासून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासापर्यंत त्यांच्या ज्ञानाची व संशोधनाची व्याप्ती होती. अशी व्याप्ती असणारा इतिहास संशोधक महाराष्ट्रात नव्हे, तर भारतातही क्वचितच आढळेल. तसेच त्यांच्या लेखनातले महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील काटेकोरपणा व मुद्देसूदपणा. कमीतकमी शब्दांत ते जास्तीत जास्त माहिती देत असत.
शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या खऱ्यांना आयुष्यात अनेक मानसन्मान मिळाले. इंडियन हिस्टॉरिकल रेकॉडर्स कमिशनवर १९४२ पासून मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आणि १९७२ पासून सरकारने नेमलेले प्रतिनिधी म्हणून ते जात असत. ते स्वत: पदवीधर नसूनही पुढे विद्यापीठाने इतिहासातील डॉक्टरेटकरिता मार्गदर्शक व परीक्षक म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. १९७४ मध्ये ते न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. डिसेंबर १९७९ मधील इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १९८४ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट. देऊन गौरविले.
— संपादित