Skip to main content
x

खुपेरकर, शामाचार्य नरसिंहाचार्य

कालगावकर, अण्णाबुवा

      युष्यभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून प्रपंच आणि अध्यात्म यांची उचित सांगड घालून, कृतार्थ जीवन व्यतीत केलेले अण्णाबुवा कालगावकर हे थोर समर्थ भक्त साताऱ्यात होऊन गेले. त्यांचे पूर्ण नाव शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर असे होते. चाफळ मुक्कामी, मावशीच्या घरी (आजोळी) अण्णाबुवांचा जन्म झाला. त्यांना दत्तात्रेय हे वडील बंधू होते. अण्णाबुवांचे प्राथमिक शिक्षण चाफळ, ता.पाटण आणि कालगाव, ता.कराड येथे झाले. माध्यमिक शिक्षण औंध संस्थानात (ता.खटाव) झाले. शालेय जीवनापासून अण्णाबुवांची ओढ अध्यात्माकडे होती. दासबोधादी अद्वैत ग्रंथाचे ते नियमित वाचन करीत. त्या काळात वडुजचे नारायण महाराज गोडसे-मसूरकर हे कालगाव पंचक्रोशीत फिरत असत. त्यांची गाठ अण्णाबुवांशी पडली. नारायण महाराज हे आत्मज्ञानी, अभ्यासी, अधिकारी पुरुष होते. त्यांनी अण्णाबुवांना लहानपणीच गुरुमंत्र दीक्षा दिली. पू. नारायणबुवा हेसुद्धा ब्रह्मचारी होते. मसूर व सज्जनगड येथे आजही त्यांची मठी आहे.

     शिक्षणानंतर अण्णाबुवा पंढरपूरच्या संस्कृत पाठशाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी तीन वर्षे संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. ते संस्कृत भाषेत प्रवीण असून संस्कृतात लेखन, भाषण करीत असत. घरामध्येही दिवसाचा काही काळ घरची मंडळी संस्कृतात बोलत असत. अण्णाबुवांचे वडील नरसिंहाचार्य हे संस्कृत पंडित होते. ते भागवत सांगणे, पुराण सांगणे इ.करीत. कालगाव हे त्या वेळी पंडितांचे गाव होते. कृष्णाकाठी असलेल्या अण्णाबुवांच्या कालगावात व पंचक्रोशीत अनेक पाठशाळा उत्तम चालत होत्या. हे गाव शाहू महाराजांनी आचार्यांना इनाम दिले व त्याबरोबर पंचक्रोशीतील ६० गावे इनाम दिली. खुपेरकर घराणे कोल्हापूर भागातून कालगाव येथे आले. आचार्यांचे मूळपुरुष ‘कृष्णाचार्य’ हे विद्वान शाहू महाराजांच्या दरबारात पंडितरत्न होते. अण्णांच्या आई हरीबाई यांचे माहेर कालगावचे.

     अण्णांनी त्या काळात ठाण्याच्या पोस्टात सुमारे दोन वर्षे नोकरी केली; पण ते नोकरीत रमले नाहीत. मुंबईत त्यांचा काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी संबंध आला. ते मुंबई शहर काँग्रेसचे सचिव होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. काकासाहेब कालेलकर हे त्यांचे सहकारी होते. काही काळानंतर अण्णाबुवा यांनी तपश्चर्येसाठी भ्रमण केले. नाशिकला जाऊन रामदर्शन घेतले. अंगापूरच्या डोहाजवळील ब्रह्मपुरीत तीन वर्षे अनुष्ठानपूर्वक तप केले. उपासनेत/ तपश्चर्येत खंड पडू नये म्हणून ते झाडावर बसून तप करीत असत. अथणीशेजारी असलेल्या ऐनापूर येथे त्यांनी काही दिवस तपश्चर्या केली. त्यानंतर नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी ठिकाणीही त्यांनी तप केले. खुपेरकर -आचार्य ही मध्व संप्रदायी मंडळी असल्याने अण्णांना त्याच संप्रदायाच्या माणसांकडून अन्न घ्यावे असा नियम होता. त्यांनी आयुष्यात कधीही कांदा-लसूण घेतला नाही. अण्णाबुवा कालगावकर यांनी तेरा कोटी गायत्री पुरश्चरण केले. दरवर्षी मसूरला गुरुमहाराजांच्या हनुमान जयंती उत्सवाला ते येत असत.

     अण्णाबुवांनी जीवनात अध्यात्म आणि व्यवहार यांची उचित सांगड घातली. त्यांचे जीवन प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही अंगांनी संपन्न होते. त्यांना इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा चांगल्या अवगत होत्या. १९३९ साली अण्णाबुवांचे बंधू दत्तात्रेय स्वर्गवासी झाल्यामुळे अण्णांनी त्यांच्या प्रपंचाची पूर्ण जबाबदारी दीर्घकाळपर्यंत सांभाळली. कुटुंब मोठे होते. भावाची तीन मुले अत्यंत लहान वयाची होती. भाऊ गेल्यानंतर भाऊबंदांनी अण्णांच्या कुटुंबीयांविरुद्ध मालमत्तेच्या लोभापोटी दावे लावले व ते निस्तरताना अण्णांना प्रचंड कष्ट आणि मनस्ताप सहन करावा लागला; पण अण्णांनी सर्व संकटांना खंबीरपणे तोंड दिले. हे करीत असताना अण्णाबुवा वेळोवेळी सज्जनगडी जात असत. त्यांची श्री समर्थांशी बांधीलकी होती. त्याच काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तम चालावा म्हणून शेतीचा व्यवसाय अण्णांनी उत्तमरीत्या केला. भाऊबंदांनी लावलेले सर्व दावे जिंकले.

     श्रीधर स्वामी आणि अण्णाबुवा यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. अण्णाबुवांच्या आग्रहावरून श्रीधर स्वामी दीड महिना कालगावी विठ्ठल मंदिरात वस्तीस होते. १९५० साली श्री समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. यामध्ये श्रीधर स्वामींना बाबूराव वैद्य यांच्याबरोबरच अण्णाबुवांचा प्रथमपासूनच सहभाग होता. १९५२ मध्ये ‘सज्जनगड मासिक पत्रिका’ प्रकाशित होऊ लागली. आरंभी, कल्याण सेवक हे या पत्रिकेचे संपादन करीत होते. पुढे ते संकेश्वर मठाचे शंकराचार्य झाले. त्यानंतर सुमारे ४० वर्षे ‘सज्जनगड मासिक पत्रिके’ची संपादकीय धुरा अण्णाबुवांनी अत्यंत कुशलतेने सांभाळली. त्यांनी विद्वत्ताप्रचुर, तसेच भक्तिपूर्ण, अध्यात्मसंपन्न असे लिखाण सातत्याने केले.

     १९६३ च्या आसपास अण्णाबुवा श्रीसमर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष झाले. ही धुरा त्यांनी १९९७ पर्यंत सांभाळली. समर्थ सदन घेण्याची कल्पना अण्णाबुवांची! अण्णाबुवा हे उत्तम प्रवचनकार होते. ते अनेक वर्षे श्रीधर स्वामींच्या संपर्कात होते. श्रीधर स्वामींनी अण्णाबुवांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. अण्णाबुवांनी बंधूंची मुले शिकवून मोठी केली. त्यांची लग्ने लावून प्रपंच थाटून दिले आणि १९८२ पासून अण्णांनी प्रपंचातील लक्ष काढून घेतले.

     १९४८ साली गांधी खुनानंतरच्या दंगलीत कालगावातील खुपेरकरांचे घर जाळले गेले. त्या वेळी प्लेगची साथही होती. त्यामुळे खुपेरकर मंडळी इतरांबरोबर गावाबाहेर छप्पर बांधून राहत होती. ते छप्परही जमावाने जाळले. तरीही अण्णांनी खंबीरपणे या संकटाला तोंड दिले व बंधूंचा प्रपंच सावरला आणि सांभाळला. मध्यंतरी मद्रासमध्येे ‘हिंदू’ मासिकातर्फे सर्वधर्म परिषद आयोजित केली होती. त्या वेळी समर्थ संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून अण्णाबुवांनी त्या परिषदेत प्रवचने आणि व्याख्याने दिली. अण्णाबुवांची उपासना प्रखर होती. अध्यात्मात त्यांचा अधिकार गुरुस्थानाचा होता. त्यांचे चिंतन मूलगामी होते. ‘सज्जनगड मासिक पत्रिके’त त्यांनी लिहिलेल्या निवडक संपादकीयांचे संकलन ‘अध्यात्म ग्रंथ’ या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. अण्णाबुवांचा शिष्यवर्ग अफाट होता. नागपूरच्या एका महिला शिष्येने अण्णांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. वयाच्या सत्त्याण्णवाव्या वर्षी, पुणे मुक्कामी अण्णाबुवांची प्राणज्योत मालवली.

पद्माकर बोंडाळे

खुपेरकर, शामाचार्य नरसिंहाचार्य