Skip to main content
x

खुरोडी, दारा एन.

          दारा एन. खुरोडी यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व या व्यवसायाशी संबंधित उद्योग करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांनी १९२५मध्ये बेंगलोर येथील भारतीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय संस्थेतून भारतीय दुग्ध व्यवसाय पदविका (आय.डी.डी.) सुवर्णपदकासह प्राप्त केली. नंतर त्यांची जमशेदपूर येथील टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या दुग्ध व्यवसाय प्रक्षेत्रावर प्रक्षेत्र अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. याच ठिकाणाहून त्यांना डेन्मार्क व हॉलंडमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. भारत सरकारच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या कृषी पणन विभागात त्यांची १९३५मध्ये दिल्ली येथे पणन अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांना १९३९मध्ये पदोन्नती देऊन दूध व पशुजन्य उत्पादने यासाठी ज्येष्ठ पणन अधिकारी पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर खुरोडी १९४५मध्ये मुंबई राज्यात पणन उपआयुक्त या पदावर रुजू झाले. त्यांची मे १९४७मध्ये दुग्ध-आयुक्त म्हणून निवड झाली. त्या वेळी त्यांना मुंबई दूध योजना प्रस्तावित करण्याचे व मान्यतेनंतर राबवण्याचे खास काम देण्यात आले. त्यांनी हे काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण केले आणि मुंबई दूध योजना कार्यान्वित झाली. मुंबई राज्याची महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत विभागणी झाल्यानंतर १९५८मध्ये आरे दूध वसाहत स्थापन करण्याचे आव्हानात्मक काम त्यांच्यावर सोपवण्यात आले. यामध्ये यश प्राप्त केल्यानंतर त्यांची नियुक्ती आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास, मुंबई सहसचिव, महाराष्ट्र शासन या पदावर करण्यात आली. ‘आरे दूध वसाहत’ योजनेसाठी दुधाचा सुरळीत आणि योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा; तसेच राज्यातील १५ प्रमुख शहरांसाठी दूध उपलब्ध व्हावे, यासाठी या शहरांमध्ये दुग्धोत्पादन कार्यक्रम राबवण्याचे ठरवले, त्यासाठी खुरोडी यांचे नाव पुढे आले.

          खुरोडी यांनी राज्यात ‘कृषी पणन विभाग’ स्थापन करून एक नवे पर्व सुरू केले. त्यांनी चर्चासत्रात व मेळाव्यात भाग घेण्यासाठी इंग्लंड, जर्मनी, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, रशिया आणि अमेरिका या देशांना भेटी दिल्या. फवारा पद्धतीने दुधापासून भुकटी तयार करण्यासंबंधी अभ्यास करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांत तीन महिने वास्तव्य केले. कोपनहेगन येथे १९५१मध्ये झालेल्या पहिल्या दुग्ध व्यवसाय मेळाव्यात खुरोडी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ते १९५३ मध्ये हेग आणि १९५६मध्ये रोम येथे झालेल्या मेळाव्यास हजर राहिले होते. अनेक आंतरराष्ट्रीय दुग्ध व्यवसायविषयक तांत्रिक परिसंवादातील समित्यांवर त्यांनी अध्यक्ष व सदस्य म्हणून काम पाहिले. कोपनहेगन येथे १९६६मध्ये आयोजित केलेल्या १६व्या आंतरराष्ट्रीय दुग्ध व्यवसाय मेळाव्यात ‘उष्ण हवामान असलेल्या देशामधील दुग्ध व्यवसाय’ या सत्रासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ऑक्टोबर १९६३मध्ये ते सेवानिवृत्त झाले. खुरोडी यांची १९६३मध्ये भारतीय दुग्ध व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याच वर्षी त्यांच्या दूध व्यवसायातील योगदानाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक नेतृत्वाबद्दल त्यांना रेमन मेगॅसेसे पारितोषिक देण्यात आले. केंद्र शासनाने पद्मश्री व पद्मभूषण या सन्मानाने त्यांच्या कार्याचा गौरव केला.

- संपादित

खुरोडी, दारा एन.