Skip to main content
x

लाड, श्रीरंग देवबा

दादा लाड

      श्रीरंग देवबा लाड यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील माळसीना या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव जानकाबाई होते. श्रीरंग लाड पुढे दादा या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे दादा शिक्षणासाठी परभणीला आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाळा म्हणून परिचित असणाऱ्या मराठवाडा विद्यालयामध्ये दादांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांचे आठवीचे वर्गशिक्षक देशमुख यांच्यामुळे दादांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ शाखेशी परिचय झाला. संघाचे जिल्हा प्रचारक बापूराव सारोळकर आणि जनुभाऊ रानडे यांच्या स्वागताच्या भाषणांतून दादांना संघाच्या प्रचारक योजनेबाबत माहिती मिळाली व पुढे प्रचारक बाळासाहेब नाईक यांच्या वागण्याबोलण्याने प्रभावित होऊन दादांची प्रचारक होण्याची इच्छा बळावली.

      दादांनी परभणीच्या शिवाजी महाविद्यालयात कला शाखेतून पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात मित्राच्या आग्रहाखातर दादांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक पदासाठी अर्ज केला. या पदासाठी त्यांची निवडही झाली. सरकारी नोकर होण्याचा मान मिळाला असल्याने घरात व गावात सर्वत्र आनंद झाला होता. प्रचारक होण्यासाठी दादांनी या सरकारी नोकरीचा त्याग करून दादा आपल्या निश्‍चयावर ठाम राहिले. दादा १९७०पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य करू लागले. सुरुवातीला त्यांनी परभणी जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात काम केले. पुढे आणीबाणीच्या काळात म्हणजेच १९७५पासून १९८०पर्यंत त्यांनी देवगिरी प्रांतात काम केेले. पुढे त्यांनी १९८१-८२पर्यंत पुन्हा परभणी जिल्ह्यात प्रचारक म्हणून काम केले. दादांकडे १९८२पासून किसान संघाचे दायित्व आले. सुरुवातीला मराठवाडा आणि देवगिरी प्रांत दादांकडे होता, परंतु या काळात शेतकऱ्यांवर शरद जोशी यांचा जबरदस्त प्रभाव असल्याने किसान संघाला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दादांनी किसान संघाचा प्रचार करण्याचे कार्य अधिक जोमाने सुरू केले.

      शेतकरी संघटनेच्या कापसाच्या आंदोलनाच्या वेळी दादा १४ दिवस कारागृहात होते. तुरुंगवासाच्या काळात दादांची शेतकऱ्यांशी मैत्री झाली. पुढे या शेतकऱ्यांच्या वारंवार भेटी घेऊन त्यांना किसान संघाचे महत्त्व पटवून दिले. किसान संघाने ‘संघटन-संघर्ष-संरचना’ या मार्गाने आपले कार्य चालू ठेवले. शेतकऱ्यांसाठी किसान संघाकडून अभ्यासवर्ग घेण्यात आले. याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना पिके व खते यांबाबत मार्गदर्शन केले. या अभ्यासवर्गांना जवळजवळ ५०० शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. दादांनी १९८५मध्ये औरंगाबाद येथे कापसाला भाव मिळावा म्हणून जायकवाडीच्या पाणी प्रश्‍नासंदर्भात शेतकऱ्यांना एकत्र आणून आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला. पुढे १९८५मध्येच लातूरच्या दुष्काळात लातूर जिल्ह्यातील बैल परभणी जिल्ह्यात घरोघरी सांभाळण्यासाठी पाठवण्यात आले. यात जवळजवळ ४०० पशूंना आसरा मिळाला व त्यांची देखभाल झाली. यासाठी दादांनी मोठे योगदान दिले. दरम्यान डंकेल प्रस्तावासंदर्भात रामलीला मैदानावर अखिल भारतीय आंदोलन झाले. यात मराठवाड्यातील हजारो शेतकरी एकत्र आले होते. पुढे २००७पासून मावळ तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन सुरू झाले. यात कोणताही राजकीय उद्देश न ठेवता सर्व पक्षाचे शेतकरी किसान संघाच्या झेंड्याखाली एकत्र आले. या आंदोलनात शेतकऱ्यांना सक्रिय करण्यात दादांनी महत्त्वाचे काम केले. दादा संपूर्ण महाराष्ट्राचे संघटनमंत्री म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी आणि किसान संघ या संदर्भात देवगिरी तरुण भारत आणि किसान वार्ता यातून त्यांनी लेखन केले .

- प्रगती पाठक

लाड, श्रीरंग देवबा