Skip to main content
x

लामतुरे, रामलिंगप्पा खंडप्पा

    पेरिप्लस आणि टालेमी यांनी उल्लेख केलेले म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हेच ठिकाण प्राचीन ‘तगर’ होय असे फ्लीट आणि हेन्री कझिन्स यांनी जरी सुनिश्‍चित केले असले, तरी इसवी सनाच्या प्रारंभिक शतकात सातवाहनकालीन भारत व रोम या देशांदरम्यान होणार्‍या व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र अर्थातच प्राचीन ‘तगर’ या स्वरूपात वस्तुनिष्ठ पुराव्याने तेरची खरी ओळख पटवून देण्याचे महत्कार्य जर कोणी केले असेल, तर ते आहेत तेरचे रहिवासी रामलिंगप्पा लामतुरे. त्यांच्यामुळेच तेर या गावाला भारतात तसेच अन्य देशांतही बरीच ख्याती प्राप्त झाली आहे. रामलिंगप्पांचा जन्म तेर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुगंधाबाई असे होते. बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव हे त्यांचे मूळ गाव होते. येथे त्यांचे शेत व स्वतःचे घर होते. घरची परिस्थिती हलाखीची होती, म्हणून उपजीविकेसाठी ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी आले आणि मोलमजुरी करून द्रव्यार्जन करू लागले. रामलिंगप्पा हे खंडप्पांचे एकमेव अपत्य होते. रामलिंगप्पांचे प्रारंभिक जीवन अत्यंत हलाखीचे होते. त्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षणही पूर्ण घेता आले नाही. तेर येथील गावठी शाळेतच इयत्ता तिसरीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. आप्पांचे मराठी व मोडीचे अक्षर अतिशय सुंदर होते. ते कपड्याच्या व्यापाराची नोंद मोडीतच करत असत. त्यांचे शिक्षण अल्प असले, तरी व्यवहारातून आप्पांनी बर्‍याच भाषांचे ज्ञान अवगत केले होते.

     अंदाजे ९ ते १०व्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. काही कालावधीनंतर त्यांचा दुसरा विवाह झाला. आप्पांची दुसरी पत्नी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाणेवाडी येथून असून त्यांचे नाव ममताबाई असे होते. आप्पांना एक मुलगा व दोन मुली अशी तीन अपत्ये झाली. मुलाचे नाव होते भागवत आप्पा. ते सर्वात शेवटचे अपत्य होते.

     रामलिंगप्पांचे संपूर्ण आयुष्य तेर येथेच गेले. प्रारंभी हालअपेष्टात दिवस काढून त्यांनी एका सावकाराकडे १५ रुपये पगारावर मुनीमाची नोकरी केली. नंतर स्वतःचा व्यवसाय करावयास आरंभ केला. शेती, कापड व्यापार आणि सावकारी यावर किफायतशीर धंदा करून एक धनाढ्य व प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. माणसाची पारख करण्याची त्याची कला उच्च दर्जाची होती. एखाद्या घटनेचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याच्या तळाशी जाऊन ते आत्मसात करायचे कसब हे रामलिंगप्पांच्या स्वभावातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असले तरी शिस्तबद्ध होते.

     रामलिंगप्पा लामतुरे यांनी तेर अर्थात प्राचीन तगर या गावी सापडणार्‍या पुरातन वस्तूंच्या जमवलेल्या अजोड संग्रहामुळेच या गावास देशात व परदेशांतही बरीच ख्याती प्राप्त झाली. तसेच यावरून लामतुरे यांचे इतिहासप्रेम, कलासक्ती आणि आपल्या प्राचीन सांस्कृतिक वारशाबद्दलचा जिव्हाळा दिसून येतो. रामलिंगप्पा लामतुरे यांना तेरच्या परिसरातून जुन्या वस्तू गोळा करण्याचा नाद अगदी सहजगत्या लागला. सन १९३०च्या सुमरास एक युरोपियन गृहस्थ लातूर येथील राजस्थान विद्यालयाचे तत्कालीन बंगाली हेडमास्तर चटर्जी यांच्याबरोबर तेर येथे आले होते. तेव्हा आप्पांना सोबत घेऊन त्यांनी तेर येथील प्राचीन मंदिरे व अवशेष पाहिल्यावर परत जाताना प्राचीन वसाहतीच्या टेकाडांवरील काही खापरेही ते रुमालात मोठ्या आस्थेने जमा करून घेऊ लागले. तेव्हा ‘‘हा काय प्रकार आहे?’’ असे आप्पांनी हेडमास्तर चटर्जी यांच्यामार्फत त्या युरोपियन महोदयांना विचारले. तेव्हा त्यांनी ‘इतिहासरचनेस ही खापरे अत्यंत महत्त्वाची आहेत’ असे उत्तर दिले. खापर्‍या जमवणार्‍यांचा अतीव उत्साह व सापडणार्‍या मूर्तींची व इतर पुरातन वस्तूंची कलाकुसर पाहून रामलिंगप्पा यांनीही तशा वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली. प्रथम शाडूच्या (केओलीनच्या) बाहुल्यांवर त्यांनी जास्त भर दिला. नंतर गावातील खेळकरी मुलांना पैपैसा देऊन त्यांनी सापडेल ती पुरातनवस्तू जमा करून वर्षानुवर्षे त्यांची जपणूक करण्यास सुरुवात केली.

     तेरच्या परिसरात सापडणार्‍या प्राचीन वस्तूंचा संग्रह एक छंद म्हणून लामतुरे यांनी जमवला. जवळजवळ ४० ते ४५ वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध वस्तू गोळा केल्या. खापरे, भाजलेल्या मातीच्या व शाडूच्या (केओलीनच्या) वस्तू व बाहुल्या, रोमन मृद्भांडी, रोमन बनावटीचे दिवे, रोमन बनावटीची दगडी जाती, नाणी, हस्तिदंती व हाडाच्या मूर्ती, शंखाच्या बांगड्या, वेगवेगळ्या दगडांचे (उपरत्नांचे) आणि मातीचे निरनिराळ्या आकारातील मणी, अलंकार व नाणी तयार करावयाचे साचे, कर्णभूषणे, हस्तिदंती अंजन-शलाका, हस्तिदंती अत्तरदाणी, धान्य मोजण्याचे माप, वेगवेगळ्या आकाराच्या सुरया, रोमन अ‍ॅम्फोरा, अर्चनाकुंड र्(ीिींंर्ळींश ींरज्ञि) वेगवेगळ्या आकारातील ताईत, खेळणी, माती व शंखापासून तयार केलेले फासे, द्यूत खेळण्यासाठीचे लांब, आखूड व चौकोनी आकाराचे हस्तिदंती फासे, काचेच्या वस्तू, दगडी मूर्त्या व शिल्पावशेष, सती शिळा आणि शिलालेख इत्यादी पुरातन वस्तू त्यांनी सहजगत्या जमवल्या. त्यांच्या संग्रहातील एक हस्तिदंती मूर्ती प्रख्यात असून रोमच्या पॉम्पे येथील उत्खननात मिळालेल्या हस्तिदंती मूर्तीशी तिचे कमालीचे साम्य आहे. तेर येथे सापडणार्‍या रोमन बनावटीच्या वस्तू व मृद्भांडे आणि रोम येथे सापडणार्‍या भारतीय बनावटीच्या हस्तिदंती व इतर वस्तू भारत व रोम या देशांमध्ये सातवाहनकालात होत असलेल्या व्यापाराची साक्ष देतात व त्या कालखंडात तेर हे अशा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते, असेही सिद्ध करतात.

     तेर येथे भेट देणारे पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, परदेशी प्रवासी व संशोधक यांच्या साहाय्याने आवश्यक तेवढे अध्ययनही आप्पांनी केले व प्रत्येक वस्तूतील बारकावे व लकबी लवकरच आत्मसात केल्या. वस्तूंचे सान्निध्य व वारंवार मार्गदर्शन प्राप्त होत गेल्याने वस्तूंचा झालेला परिचय ह्यांच्यामुळे तेरमधील कुठलीही वस्तू त्यांच्यासमोर नेली, तर तिचे प्राचीनत्व व शैली इत्यादीविषयीचा अचूक अंदाज ते बांधू शकत होते. वस्तू जमवण्याचा त्यांचा छंद त्यांच्या मृत्यूपर्यंत सतत सुरूच होता. १९७४ साली आप्पा कैलासवासी झाले.

     रामलिंगप्पा लामतुरे यांचा पुरातन वस्तुसंग्रह इतका वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचा सिद्ध झाला की त्या आधारे विविध दालनांचे एक संग्रहालय स्थापन करणे क्रमप्राप्त झाले. पंडित भगवानलाल इंद्रजी, रामकृष्ण भांडारकर, फ्लीट, हेन्री कझिंस, बार्नेट, राजवाडे, ग.ह. खरे, डॉ. मोरेश्वर गंगाधर दीक्षित, डॉ. शां.भा. देव, म.न. देशपांडे, म.के. ढवळीकर, तगारे इत्यादी भारतीय व परदेशी विद्वान संशोधकांनी वेळोवेळी तेरला भेटी देऊन तेरचा प्राचीन इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यापैकी अधिकांश संशोधकांनी आपापल्या भेटीदरम्यान आप्पांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या पुरातन वस्तु संग्रहाचे व त्यांचे कौतुक केले.

     भुलाभाई देसाईंच्या स्नुषा माधुरीबेन देसाई यांनी ब्रिटिश म्युझिअमचे डॉ. डग्लस बॅरट यांच्याबरोबर तेरला येऊन जेव्हा रामलिंगप्पांचा संग्रह पाहिला, तेव्हा ते थक्कच झाले. १९६७-६८ साली तेर येथे महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागातर्फे सुरू असलेल्या उत्खननास माधुरी देसाई व डग्लस बॅरट यांनी भेट दिली. त्या भेटीदरम्यान, तत्कालीन पुरातत्त्व संचालक डॉ. दीक्षितांच्या आदेशानुसार उत्खननात सहभागी प्रस्तुत लेखकास आप्पांचा उक्त वस्तुसंग्रह डग्लस बॅरट यांना दाखवण्याची जबाबदारी देण्यात आली. त्या वेळी संग्रहातील हस्तिदंती मूर्ती पाहून ते अत्यंत प्रसन्न झाले आणि आप्पांकडे, त्या मूर्तीची दहा हजार डॉलर्स एवढी किंमत देण्याची इच्छा व्यक्त केली. रामलिंगप्पांना हे अनपेक्षित ऐकून धक्काच बसला आणि त्यांनी हस्तिदंती बाहुलीच काय, संग्रहातील कोणतीही वस्तू विकण्यास स्पष्ट नकार दिला. शेवटी रामलिंगप्पांनी आपल्या प्राणांपेक्षाही जास्त जपलेल्या त्यांच्या पुरातन वस्तूंकरिता साजेसे संग्रहालय स्थापित करण्याचा प्रस्ताव समोर आला. याला मूर्त रूप देण्याकरता तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे देवीसिंह चौहान आणि उस्मानाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी पानसे यांची एक समिती नेमण्यात आली. वस्तुसंग्रहालय तेर येथेच स्थापन व्हावे, या अटीवर कसलाही मोबदला न घेता आप्पांनी आपला संग्रह महाराष्ट्र शासनास देऊ केला. त्यानुसार १९६७ साली शासनाने हा संग्रह आपल्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी या संग्रहात २३८९२ पुरातन वस्तू होत्या. नियोजित संग्रहालय तेर येथे शासकीय जागेवर बांधलेल्या इमारतीत जानेवारी १९८० साली औपचारिकरित्या जनतेकरता खुले करण्यात आले. आप्पांच्या स्मरणार्थ या संग्रहालयास ‘कै. रामलिंगप्पा शासकीय पुराण वस्तुसंग्रहालय, तेर’ असे नाव दिले.

के. दे. कावडकर

संदर्भ
१.      douglas Barrett -Ter  

२.      Chapekar B.N. :Report on excavation at Ter (1969)

३.      डॉ. दीक्षित मो. ग. पुरातत्त्व विभाग म.शा. - भारतीय इतिहास आणि संस्कृती त्रैमासिक. एप्रिल व जुलै १९७२ (तेर वस्तुसंग्रहालयातील पुरातन वस्तूंचा परिचय)

४.      देव शां. भा. - तेर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग म. शा. (१९७५)

५.      प्रा. जामवाडीकर सुलभा : सुवर्णनगरी तेर (१९९३)

(एम. फिल. प्रबंध - मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यावर आधारित)

६.      प्रा. भोसले राजेसाहेब गंगाधरराव - रामलिंगप्पा लामतुरे यांचे ऐतिहासिक योगदान, (एप्रिल २००८) (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे मान्य एम.फिल. प्रबंध)
लामतुरे, रामलिंगप्पा खंडप्पा