Skip to main content
x

लांजेवार, श्रीराम गोविंदा

                श्रीराम गोविंदा लांजेवार यांचा जन्म शेतकरी कुटुंबात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात उसराळ मेंढा येथे झाला. त्यांचे शिक्षण नागभीड येथे ७व्या वर्गापर्यंत झाले. त्यांनी १९८८मध्ये आपल्या शेतीवर  एच.एम.टी. ही भाताची जात पेरली होती. त्या पिकाची पाहणी करत असताना त्यांना काही झाडाच्या लोंब्या वेगळ्या वाटल्या. त्यांनी त्या लोंब्यांचे बी एकत्र साठवून पुढील वर्षी श्रीराम नाव संबोधून नवीन जात तयार केली. त्यांनी १९८८-२००२ या काळात म्हणजेच जवळपास १४ वर्षे या जातीचे गुणधर्म तपासून पाहिले. त्या जातीचे उत्पन्न शेतकऱ्याचे शेतावर कशा प्रकारे येते याचा अभ्यासही केला व नोंद ठेवली. या प्रकारे त्यांनी ही जात श्रीराम या नावाने शेतकऱ्यांमध्ये प्रसारित केली. यासाठी जातींचे जास्त प्रमाणात बी तयार करून शेतकऱ्यांना वाटले. शेतकऱ्यांच्या शेतीवर ही श्रीराम भाताची जात मोठ्या प्रमाणावर दिसून आली आणि त्यांना चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळाले. त्यांनी या जातीचे वैशिष्ट्य व इतर माहिती राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान यांना पाठवली आणि त्या संस्थेतर्फे लांजेवार यांना श्रीराम जात निवड पद्धतीने प्रसारित केल्याबद्दल १८ नोव्हेंबर २००९ रोजी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

लांजेवार, श्रीराम गोविंदा