Skip to main content
x

लिमये, दत्तात्रेय बाळकृष्ण

      त्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता. देवगड, जि. रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हावनूर, जि. धारवाड येथे झाले. नंतरचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले. १९०५ साली मॅट्रिक झाल्यावर गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणूनच त्यांचा एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश झाला. पुढच्याच वर्षी त्यांनी फर्गसन महाविद्यालयात पवेश मिळवला. १९०९ साली बी.एस्सी. आणि १९११ साली रसायन हा विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढगस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.

     प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्‍लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या पकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले. गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेलमध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला ‘करंजिन’ असे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.

     त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली.

     रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी ‘रसायननिधी’चा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापनाविषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले. १९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला ‘निधोन प्रोसेस’ हे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या ‘रसायनम्’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने  सत्कार केला.

     बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल. ‘रसायनमंदिर’ या संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली ‘डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्‍या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही.

     लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधनसामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील ‘रसमहर्षी’ या समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.                                          

 दिलीप हेर्लेकर

लिमये, दत्तात्रेय बाळकृष्ण