लिमये, विष्णू प्रभाकर
विष्णू प्रभाकर लिमये यांचा जन्म सांगली येथे झाला, मात्र त्यांचे शिक्षण आणि बाकी सर्व कार्य पुण्यात झाले. १९१७ मध्ये ते मॅट्रिक झाले तेव्हा ते सर्व विद्यार्थ्यांत तिसरे आणि संस्कृतमध्ये पहिले आले होते. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीही मिळाली होती. पुढे त्यांनी फर्गसन महाविद्यालयात शिक्षणास सुरुवात केली; परंतु बी.ए.च्या शेवटच्या वर्षातील दुसर्या सत्रामध्ये, १९२१ मध्ये काँग्रेसच्या असहकारितेच्या आंदोलनात भाग घेऊन त्यांनी महाविद्यालय सोडले. नंतर राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या टिळक महाविद्यालयातून ते १९२१ मध्ये ‘वाङ्मय विशारद’ झाले.
विष्णू लिमये यांनी १९२१ ते १९३३ या काळात टिळक महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले, तसेच १९२४ मध्ये त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी कार्य केले. कायदेभंगाबद्दल १९३४ मध्ये त्यांना तीन महिने कारावासाची शिक्षा झाली. १९३८ ते १९४० या काळात ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. १९३९ ते १९४६ मध्ये ते पुणे शहर काँगे्रसचे अध्यक्ष व त्यानंतर महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे, त्याचप्रमाणे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य होते. १९४०-४१ मध्ये सत्याग्रह, १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळीतील सहभाग यांमुळे त्यांना कारावास घडला, त्यांनी १९५० मध्ये मुंबईच्या ‘नवभारत’ दैनिकाचे संपादक म्हणून कार्य केले. १९५५ मध्ये त्यांची मुंबई विधान परिषदेत नेमणूक झाली; परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारानंतर लिमये यांनी तेथून राजीनामा दिला. विष्णू लिमये यांनी भूदान, सर्वोदय अशा आंदोलनांतही भाग घेतला.
१९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात, विनोबा भावे यांच्या ‘आचार्य संमेलना’तही ते उपस्थित होते. त्यांना १९७७ मध्ये संस्कृतमधील पांडित्य आणि शास्त्रनिष्ठा यांसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आचार्य लिमये १९२१ ते १९७१ दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य होते, तसेच उपाध्यक्षही होते. १९५४ ते १९६४ या काळात ते पुणे विद्यापीठाच्या विधिसभेचे सदस्य होते. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान मंडळाचे संचालक होते. याशिवाय, पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्राच्या सल्लागार मंडळाचे सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळाचे उपाध्यक्ष, पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा विविध ठिकाणी त्यांनी प्राच्यविद्येच्या क्षेत्रात कार्य केले.
आचार्य विष्णू प्रभाकर लिमये यांचे लेखन व प्रकाशनकार्यही विपुल प्रमाणात आहे. त्यांनी यामध्ये १९२८ मध्ये अल्बेरूणीची गीता आणि इतर निबंध, १९३५ मध्ये आचार्य रबडे यांचे चरित्र, १९६५ मध्ये ‘वाक्यपदीय’, १९७२ मध्ये ‘कौशिकसूत्रदीरे’ याचे संपादन व सहकार्य, १९७४ मध्ये ‘क्रिटिकल स्टडीज ऑन द महाभाष्य’, १९७६ मध्ये डॉ. हरी दिवेकर यांच्या निवडक लेखसंग्रहाचे संपादन, १९८२ मध्ये ‘कौशिकसूत्र’ व ‘कौशिकपद्धती’चे संपादन, ‘अॅडिशन अॅण्ड करेक्शन टू सरनप्स निरुक्त इन पाणिनि’ आणि भर्तृहरिकृत ‘महाभाष्य दीपिका’चे संपादन असे विस्तृत कार्य केले. आचार्य लिमये यांची बुद्धी अतिशय तरल होती. अगदी दूरच्या दोन गोष्टींमधले साम्य आणि वैषम्य त्यांना अगदी सहजपणे लक्षात येत असे. अशा प्रकारचे तुलना करण्याचे कौशल्य त्यांच्या उपनिषदे, वाक्यपदीय, निरुक्त, महाभाष्य यांसंबंधीच्या टिपांमध्ये वाचकाला जाणवत राहते. ते जन्मजात ‘नैरुक्त’ होते. अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींसंबंधीचे त्यांचे लिखाण आणि काही टिपणे अप्रकाशितच राहिली आहेत. अशा प्रकारच्या शाब्दिक क्रीडा ते सतत करीत आणि भेटणार्या व्यक्तींना त्या क्रीडा ऐकवीत. अशा क्रीडांचे वर्णन ते ‘चूष’ या शब्दाने करीत. त्यांची जिज्ञासा, विद्यार्थिदशा शेवटपर्यंत ताजी राहिली. मृत्यूपूर्वी सहा दिवस आधी लिहिलेली त्यांची वाक्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात. ‘देशासाठी कार्य केले, अध्यात्माचा विचार केला, संस्कृत विद्येची जोपासना केली; परंतु आत्मज्ञान झाले नाही.’