Skip to main content
x

लोणकर, प्रकाश शंकर

        भूमाता आणि गोमाता यांची आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे जोपासना केल्याशिवाय तरणोपाय नाही’, या विचाराचा प्रसार करण्यासाठी सतत प्रयत्नात असणार्‍या डॉ. प्रकाश लोणकर यांनी या कार्यासाठी आयुर्वेद ते माहिती तंत्रज्ञान यांचा आधार घेऊन सेवानिवृत्तीनंतरही गो-सेवेचे व्रत सोडले नाही. वास्तविक जुन्या पठडीत ज्यांचे शिक्षण पार पडले, त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर दुरूनच केला, पण डॉ. लोणकर यांनी हे तंत्रज्ञान नुसते आत्मसातच केले नाही, तर त्याचा पुरेपूर उपयोग पशु-विज्ञानविषयक माहिती पशुपालक व पशुपालन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी हाताच्या बोटावर आणून ठेवला. जागतिक स्तरावरील संस्थांची आर्थिक आणि तांत्रिक मदत घेऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर पशुपालन क्षेत्रासाठी अत्यंत प्रभावीपणे करणारे डॉ. लोणकर हे देशात एकमेव आहेत.

        अचलपूर (जि.अमरावती) येथे जन्मलेल्या प्रकाश लोणकर यांचे प्राथमिक शिक्षण अकोला येथे, तर माध्यमिक शिक्षण,जानेफळ, जि.बुलढाणा येथे पार पडले (१९६५). नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.व्ही.एस्सी.ए.एच. पदवी प्राप्त (१९७३) डॉ.लोणकर, अकोलास्थित डॉ.पं.दे.कृ.वि. अंतर्गत पदव्युत्तर शिक्षण संस्थेतून एम.व्ही.एस्सी. (पशु-विकृतिविज्ञान) परीक्षा उत्तीर्ण झाले (१९७५). भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (इज्जतनगर) येथून याच विषयात त्यांनी १९८९ साली पी.एचडी. प्राप्त केली.

        १९७५-७६ या काळात पूना पर्ल्स आणि हाफकीन संस्था या ठिकाणी संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत डॉ. लोणकर यांनी १९७६ ते १९७८ या काळात डॉ. पं.दे.कृ.वि.च्या पशु-विकृतिविज्ञान विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ. बाळकृष्ण पुरोहित या नामवंत पशुवैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन व संशोधनसंबंधी प्राथमिक धडे गिरवले. या अनुभवाच्या जोरावरच भा.कृ.अ.प.ने नुकत्याच सुरू केलेल्या कृषी संशोधन सेवेत डॉ.लोणकरांची निवड झाली आणि आयसीएआर संचालित मध्यवर्ती मेंढी व शेळी संशोधन संस्था (सीएसडब्लूआरआय) येथे कृषी-संशोधनशास्त्रज्ञ म्हणून ते रुजू झाले (१९७८). पुढील १६ वर्षे याच संस्थेत शेळ्या-मेंढ्या यांच्या रोगावर संशोधन प्रकल्प हाताळत असतानाच १९९४मध्ये वरिष्ठ संशोधक या पदावरून त्यांनी कृषी-संशोधन सेवेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि त्याच साली मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशु-विकृतिविज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. महाराष्ट्र पशू आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेनंतर (२००२) त्याच विषयाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. लोणकर यांची पदोन्नती झाली. २००५ ते २०१० या कालावधीत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक म्हणून कार्य करत असतानाच मार्च २०१०मध्ये डॉ. लोणकर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही जय फाऊंडेशन संचालित विषविज्ञान संशोधन संस्थेत टॉक्सिको पॅथॉलॉजिस्ट म्हणून ते आपली संशोधनात्मक सेवा देतच आहेत.

        कळपाचे अयोग्य संगोपन आणि कुपोषण यामुळे होणाऱ्या व्याधी आणि मृत्यू ही शेळी-मेंढी पालकासमोरील मोठी समस्या असते. जयपूर येथील शेळी-मेंढी संशोधन संस्थेत काम करताना शेळ्या मेंढ्यात उद्भवणाऱ्या व्याधी आणि मृत्यू यांवर संशोधन करून डॉ.लोणकर यांनी संगोपनातील आहारपोषणांतील आणि आरोग्यरक्षणातील त्रुटी शोधून त्यावरील उपाय देशभरातील मेंढी-शेळीपालकांपर्यंत पोहोचवले. याच संस्थेत असताना त्यांनी छोट्या प्रयोगशाळांची उपयोगिता आणि कमीत कमी रोगनिदान चाचण्या करून औषधोपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि रोगव्यवस्थापनावर दिनदर्शिका बनवली. सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता शेळी-मेंढीपालक स्वयंपूर्ण कसे होतील याचे मार्गदर्शन केले. शेळ्या-मेंढ्यांमधील आजार, उपचार पद्धती, मृत्यूची कारणे याची माहिती संगणकीकृत करण्याचा प्रकल्प पूर्ण केला. शासकीय सेवेत काम करताना आर्थिक चणचण नेहमीच भासते. ही दूर करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या विभागांनी उद्योग क्षेत्राकडून मदत स्वीकारावी ही कल्पना नव्वदीच्या मध्यास पुढे आली. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डॉ. लोणकर यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य मिळवून विभागाच्या प्रयोगशाळा, साधनसामग्री व उपकरणांनी अत्याधुनिक बनवल्या. उत्तम प्रयोगशाळा पद्धती (गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस)ची संकल्पना प्रत्यक्षात आणून संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली.

        महाराष्ट्र पशू आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेनंतर एक अत्यंत महत्त्वाचा आणि कोकणातील पशुधनावर दूरगामी परिणाम करणारा संशोधन प्रकल्प डॉ. लोणकर यांनी पूर्ण केला. (२००१ ते २००४, रु. २२ लाख). महाराष्ट्रातील समुद्रकाठच्या सर्व जिल्ह्यात शरीराचा मागील भाग आणि मागील पाय यांत दुबळेपणा (पॅरालायसिस) निर्माण होऊन गायी-म्हशी मृत होण्याचे प्रमाण बऱ्याच वर्षांपासून वाढले होते. कोकणातील काही भागांत संशोधन होऊन ‘बोटुलिनम’ आणि ‘आम्लविषार’ (दोन्हीही जिवाणूजन्य विषाक्तता) अशी कारणे देण्यात आली होती, पण हे निष्कर्ष सर्वंकष नव्हते. सतत तीन वर्षे कोकणातील सर्व विभागांतील मृत व आजारी जनावरांची तपासणी, तेथे उपलब्ध चारा व खाद्यमिश्रणे यांचा घटकात्मक अभ्यास, माती परीक्षण आणि रक्तजल तपासण्या यांच्याआधारे कोकण विभागातील चाऱ्यात असलेले ऑक्झॅलेटचे अधिक प्रमाण व चारा-खाद्य मिश्रणातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हे मृत्यू होतात, असा निष्कर्ष डॉ. लोणकर यांनी पुढे आणला. ही कमतरता उद्भवू नये यासाठी योग्य घटक असलेले खनिज मिश्रणही या संशोधन प्रकल्पातून पशुपालकासाठी सुचवले. या खनिज मिश्रणाच्या वापराने पक्षाघाताने कोकणातील जनावरांचे मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले.

        आयसीएआर पुरस्कृत पशुवैद्यासाठी दूरशिक्षण कार्यक्रम हा अत्यंत नावीन्यपूर्ण प्रकल्प डॉ. लोणकर यांनी अमलात आणला. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात खेडोपाडी विखुरलेल्या पशुवैद्यांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधयोजना यांचे शिक्षण देण्यासाठी या दूरशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होत आहे. दूरशिक्षण कार्यक्रमाचा आंतरराष्ट्रीय प्रसार करणाऱ्या कॅनडास्थित कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी आर्थिक साहाय्य केले. एका प्राथमिक सर्वेक्षणाद्वारे पशुवैद्यांची पुढील शिक्षणाची गरज याचा अभ्यास करून, जनावरांची मृत्युपश्‍चात तपासणी, परोपजीवी जिवाणूंमुळे होणाऱ्या रोगांचे निदान, लहान आणि मोठ्या जनावरांतील शस्त्रक्रिया हे अभ्यासक्रम सी-डी रोममार्फत तसेच इतर शैक्षणिक माध्यमातून प्रसृत करण्यात आले. कालांतराने यात नवीन विषयांची भर घालण्यात आली. आज देशभरात विखुरलेले, पण शैक्षणिक संस्थांत जाऊन प्रशिक्षण घेऊ न शकणारे शेकडो पशुवैद्य डॉ. लोणकर यांनी सुरू केलेल्या या दूरशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत असून त्याचे फायदे पशुपालकापर्यंत पोहोचवत आहेत. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने या संपूर्ण कार्यक्रमाला रु. ३३ लाख इतकी आर्थिक मदत दिली. देशातील कोणत्याही कृषी वा पशुविज्ञान विद्यापीठात अशा प्रकारचा दूरशिक्षण कार्यक्रम राबवणारे डॉ. लोणकर हे पहिले पशुवैद्यकीय विस्तार शिक्षण संचालक ठरले.

        माहिती तंत्रज्ञानाचा वापर पशुवैद्यांसाठी अत्यंत प्रभावीपणे करणाऱ्या डॉ. लोणकर यांनी सर्वसामान्य पशुपालकांसाठीही या माहिती प्रणालीचा उपयोग करण्याच्या दृष्टीने पशुवैद्यकीय व पशुसंगोपनात्मक माहिती सायबरविश्‍वात आणली. बकरीपालन, दुग्ध व्यवसाय यासारख्या अनेक विषयांवरची माहिती इनफॉर्मेशन किओक्सवर साठवण्यात आली असून या विषयांची माहिती घेऊ इच्छिणारा पशुपालक वा विद्यार्थी सहज ही माहिती मिळवू शकतो. माहिती तंत्रज्ञानाशिवाय विस्तार शिक्षण कार्यक्रमासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक साधने-पुस्तके, घडीपत्रिका, मराठी नियतकालिकांतून लेख, आकाशवाणी, दूरदर्शन इ. यांचा वापरही त्यांनी केला आणि पशु-विज्ञानविषयक ज्ञान सामान्यापर्यंत पोहोचवले. आपल्या शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग म्हणून अध्यापन, संशोधन पत्रिकांतील लेख (६७), मोनोग्राफ्स (१२), पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (१९), राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग (१४२), भारतातील अनेक विद्यापीठांतून पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे परीक्षक, कृषी -वैज्ञानिक निवड मंडळाचे सभासद, परदेशी भेटी व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या सेवेतून मुक्त झाल्यानंतरही (२०१०) पशुविज्ञानसंबंधी अनेक संस्थांतून जनसेवा करत आहेत.

        पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विस्तार शिक्षणाला पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने एक नवा आयाम देणारे डॉ.लोणकर विस्तार शिक्षण कार्यक्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीसाठी आदर्श ठरावेत हे निश्‍चित!

- डॉ. रामनाथ सडेकर

* * *

लोणकर, प्रकाश शंकर