Skip to main content
x

लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी

     ण्णासाहेबांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुरुंदवाड येथे झाले. त्यानंतर ते सांगली विद्यालयामधून मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला डेक्कन महाविद्यालयामध्ये आले. १८९९ मध्ये झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या पहिल्या अधिवेशनास ते उपस्थित राहिले व त्यांनी बालविवाह चालीविरोधी प्रदर्शनही केले.

       त्यांचे वास्तव्य पुढे मुंबईच्या हिराचंद वसतिगृहामध्ये होते. त्या काळातच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी वसतिगृहाला भेट दिली होती. सभेच्या प्रचार व उपदेशाकरिता त्यांनी सर्वत्र संचार केला. सभेतर्फे स्वतंत्र विद्या विभाग सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. १९०२ मध्ये त्यांनी ‘श्रीजिन विजय’ मासिकाचा शुभारंभ केला. ते स्वतः संपादक होते. १९०३ मध्ये आण्णासाहेब एम.ए. झाले. आण्णासाहेब लठ्ठे हे जैन समाजातील पहिले एम. ए. झाले म्हणून शेठ हिराचंद नेमचंद यांच्या हस्ते त्यांना दक्षिण भारत जैन सभेने मानपत्र दिले. प्राथमिक शिक्षण प्रसारासाठी गावोगावी जाऊन व्याख्याने दिली पाहिजेत असे आण्णासाहेब लठ्ठे यांनी  सांगितले. ते जैन बोर्डिंग कोल्हापूरचे पहिले अधीक्षक होते. याचकाळात त्यांनी स्वतंत्र स्त्रीशिक्षण विभागाची स्थापना केली. याच काळात त्यांनी कन्याविक्रयाची दुष्ट रूढी बंद करण्याकरिता झंझावाती दौरा केला. १९०७ मध्ये आण्णासाहेब राजाराम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९०८ मध्ये आण्णासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली ‘अस्पृश्य विद्याप्रसारक मंडळ’ स्थापन झाले व त्याच्या कार्यास प्रारंभ झाला.

       २४ नोव्हेंबर १९०९ रोजी त्यांनी शेतकरी समाजाच्या प्रगतीसाठी शेती औद्योगिक व कलेचे प्रदर्शन जैन व वसतिगृह कोल्हापूर येथे भरविले होते. ‘जैनिझम’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. १९११ मध्ये आण्णासाहेबांची शहर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते कोल्हापूर संस्थानचे ‘विद्याधिकारी’ ही झाले. १९१४ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली. नंतर त्यांनी बेळगांवास स्थलांतर केले. बेळगावांत स्थायिक झाल्यांनतर त्यांनी डेक्कन ब्राह्मणेतर सभेची स्थापना करून गरजूंना मदत देण्याचा प्रारंभ केला. अण्णासाहेबांनी या समाजसेवेबरोबरच शिक्षणावरही लक्ष्य केंद्रित केले होते. १९१६ मध्ये ते पुण्याच्या विधी महाविद्यालयामधून एलएल्. बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले व बेळगावी वकीली करू लागले. याच काळात म्हणजे १९१६ ते १९२६ पर्यंतच्या काळात बेळगावात त्यांनी ‘डेक्कन ब्राह्मणेतर पक्ष’ स्थापन करुन‘डेक्कन रयत’ हे साप्ताहिक दोन वर्षे चालविले.

       १९२० मध्ये दिल्ली कौन्सिलच्या निवडणुकीत ते प्रचंड मताने निवडून आले. लठ्ठे हे डेमॉक्रिटिक पार्टीचे सभासद होते. लष्कर, रेल्वे, मिठावरील कराबद्दल त्यांनी सरकारवर सडकून टीका केली होती. भाषावार प्रांतरचना व्हावी या कर्नाटकच्या इच्छेवरून त्यांनी असेंब्लीत ठराव आणला. पब्लिक अकौन्टस् व फायनान्स कमिट्यात सतत तीन वर्षे ते सभासद म्हणून निवडून आले. त्याच वेळी “जोशी वतन नष्ट विधेयक” आणून महाराष्ट्रात व कर्नाटकात खळबळ उडवून दिली. बेळगाव येथे ब्राह्मणेतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन आण्णासाहेब लठ्ठे यांनी भरविले. १९२५ मध्ये त्यांची कोल्हापूर संस्थानच्या दिवाणपदी नेमणूक झाली. त्याबरोबर ते संस्थानचे हुजूर सल्लागारही झाले. याच काळात त्यांनी कोल्हापूर स्टेट म्युनिसिपल अ‍ॅक्ट १९२५ केला, त्याचबरोबर नगरपालिकेचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नागरिकांना देण्याबरोबरच हरिजन आणि इतर सर्व जातीधर्माचे एकत्र मतदार संघ स्थापन केले.

         १९२६ ते १९३० पर्यंत आण्णासाहेब कोल्हापूरचे दिवाण होते. त्यांच्या काळात त्यांनी इलाखा पंचायतीची स्थापना केली, कोल्हापूर बँकेची स्थापना, शाहुपुरी व्यापारी संघटनेची स्थापना केली. त्याबरोबरच साईक्स विधी महाविद्यालयाची स्थापना, ट्रेनिंग कॉलेज आणि छत्रपती राजर्षि शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोल्हापुरात उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. ते सेंट्रल बँकेचे अध्यक्षही झाले. १९२९ च्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. ‘प्रगती जिनविजय’ मधून ते लिहित. सायमन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे झालेल्या ‘गोलमेज परिषद’ साठी आण्णासाहेब लठ्ठे इंग्लंडला गेले. पुढे त्यांनी  “प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन स्टेटस्” हा ग्रंथ लिहिला.  आण्णासाहेबांच्या बरोबर डॉ. आंबेडकर, मौलाना महंमद अली, सर तेजबहादूर सप्रू, रँग्लर नारळीकर आदी लोक होते. याचा स्वातंत्र्यानंतर भारताची घटना करण्याच्या कामी फार उपयोग झाला.

        मुंबई प्रांताच्या पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळातील अर्थमंत्री म्हणून आण्णासाहेब लठ्ठे निवडले गेले. आपल्या अर्थसंकल्पात त्यांनी ग्रामोध्दार, शिक्षण, जोडरस्ते यावर भर दिला होता. मुंबई सरकारच्या या १९३७च्या अर्थसंकल्पाचे कौतुक भारताबाहेरील वृत्तपत्रांनीही केले. दरवर्षी पाऊण लाख रुपयांचे अनुदान देऊन डेक्कन महाविद्यालयाचे पुनरुज्जीवन केले. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम व बी. टी. महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. हाच निर्णय महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यास सोयीचा ठरला. लठ्ठे यांनी कर्नाटक, गुजराथ व महाराष्ट्र या प्रत्येक प्रांतास स्वतंत्र विद्यापीठ असावे असे सरकारचे धोरण जाहीर करुन जनतेच्या मागणीपेक्षा एक पाऊल पुढे उचलले. डेक्कन महाविद्यालय प्रकरणात अर्थमंत्री आण्णासाहेब लठ्ठे हे विश्‍वस्त बनले व त्यांनी प्राकृत, संस्कृत, अर्ध मागधी, मराठी इत्यादी भाषांचे संशोधन या महाविद्यालयामध्ये करावयाचे ठरले. शिवाय बी.टी महाविद्यालयाचीही सोय तेथे करण्याचे निश्‍चित झाले. यामुळे ना. लठ्ठे यांचे पुणेकरांनी अभिनंदन केले.

        आण्णासाहेब लठ्ठे यांचे ग्रंथ लेखन पुढील प्रमाणे;

जैनिझम (इंग्रजी १९११), हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय (मराठी १९१४), मेमोयर्स ऑफ हिज हायनेस श्री छत्रपती शाहू महाराज ऑफ कोल्हापूर (खंड१, २ इंग्रजी १९२४), हिंदी संस्थानिकांचे प्रश्‍न (इंग्रजी १९३०), माझ्या विलायतच्या आठवणी (मराठी १९३९), फेडरल कॉनस्टिट्युशन ऑफ द वर्ल्ड - (इंग्रजी), अर्थशास्त्रावरील लेख संग्रह - (मराठी १९३९), इंडियन अनरेस्ट (अनुवाद-  मूळ लेखक - चिरोल)

       - विजय बक्षी

संदर्भ
१.      स्व. आण्णासाहेब लठ्ठे जन्मशताब्दी स्मरणिका.
२.      स्व. आण्णासाहेब लठ्ठे जीवन व कार्य
लठ्ठे, आण्णासाहेब बाबाजी