Skip to main content
x

माडगूळकर, गजानन दिगंबर

     आपल्या ‘गीतरामायणा’मुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरविले गेलेले गजानन दिगंबर माडगूळकर साहित्यक्षेत्रात आणि जनमानसात ‘गदिमा’ म्हणून प्रसिद्ध होते. माडगूळकरांचा जन्म शेटेफळ, ता. आटपाडी, जि. सांगली येथे झाला. शिक्षण आटपाडी, कुंडल, औंध संस्थानात झाले. आटपाडी हे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही राज्यात होते. नंतर ते औंध संस्थानात आले. हे गाव आटपाडी-महाल म्हणून ओळखले जाई.

     आटपाडीने महाराष्ट्राला ‘गदिमा’, त्यांचे कथाकार आणि ग्रामीण जीवनदर्शन घडविणारे धाकटे भाऊ व्यंकटेश आणि शंकरराव खरात असे तीन साहित्यिक दिले. आयुष्यभर त्यांच्यावर आईच्या (बनुबाई) अभंग, ओव्यांचा, स्वाभिमानी असण्याचा व वडिलांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाळू-पणाचा, अशा सर्व सुसंस्कारांचा खोल परिणाम होता. माडगूळला, महाराष्ट्रात त्या काळी असलेली बारा बलुतेदार पद्धती होती. गल्ल्यांची नावेही जातिवाचक ब्राह्मणगल्ली, वाणीगल्ली, कासारगल्ली, कुंभारगल्ली, परीटगल्ली अशी होती. माडगूळकरांचे शेतातले घरही ‘बामणाचा पत्रा’ म्हणून ओळखले जायचे. लहानपणी माडगूळकरांचे सायन्स व गणिताशी सख्य नव्हते; पण प्रतिभेचे लेणे होते. अंगात अभिनय व नाट्यगुण होते. त्याची औंधच्या महाराजांना व शिक्षकांना कल्पना होती. ह्या प्रतिभेमुळे आणि कष्ट, जिद्द व सुसंस्कारांमुळे ते महाकवी म्हणून ओळखले गेले.

     घरी अठराविसे दारिद्र्य. घरामध्ये ‘गदिमा’ सगळ्यांत मोठे. आईवडिलांचे कष्ट कमी करायला हवेत, भावंडांना आर्थिक मदत करून कुटुंब वर आणायला हवे हा विचार लहानपणापासून त्यांच्या मनात होता. वडिलांचे पायी जायचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांकडे ‘हिशेबाचे काम मला द्या. वडिलांऐवजी मी ते काम करीन’, असे सांगायला ‘गदिमा’ गेले, तेव्हा ते फक्त इयत्ता चौथीत होते.

     अभ्यासाची ठरावीक पठडी पार न करू शकल्याने गदिमा मॅट्रिक उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांच्या तरुणपणाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. स्वातंत्र्यचळवळीने भारण्याचे ते दिवस होते. शिवाय औंधच्या शाळेचे संस्कार होते. फैजपूर काँग्रेसला शेतकर्‍यांची प्रचंड उपस्थिती व त्यांचे गांधीजींवरील प्रेम बघून ते प्रभावित झाले. मित्रामुळे त्यांनी नीरा आश्रमात सूतकताईपासून मैला वाहण्यापर्यंत सर्व सेवाभावी कामे केली. बेळगाव काँग्रेसला गांधीजी जात असताना नीरा स्टेशनवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. गांधीजींनी निधी मागितला, तर तिथल्यातिथे थोड्या घोषणा, थोडे भाषण असे करून त्यांनी निधी जमवून दिला. शंकरराव देवांनी सांगितल्यावरून कुंडलला जाऊन त्यांनी प्रौढशिक्षणाचे वर्ग चालविले.

     गांधी व काँग्रेस यांच्या संयुक्त सहवासाचा परिणाम म्हणून ‘वंदे मातरम्’ सिनेमासाठी ‘वेदमंत्राहुनी आम्हां वंद्य वंदे मातरम्’, अशी गीते पुढे लिहिली गेली. कुंडलमध्ये समाजकार्य चालू होते, पण अर्थार्जनाचा पत्ता नव्हता. ‘हरिश्चंद्राचे पुण्य गाठीला मारायला आधी धन जमवावे लागते’, अशा अर्थाचे आईचे बोलणे व कमवत नाही म्हणून हितचिंतकाचे त्याच दिवशी बोलणे मनाला लागून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. पुण्यात ‘दीनबंधू’ साप्ताहिकात त्यांनी नोकरी धरली; पण गांधीजींच्या विरोधात न लिहिण्याची तत्त्वनिष्ठा आड आली. त्यांनी स्वतःच्या मतांसाठी नोकरी सोडली. पराडकरांची ‘सुगंधी धूप सोंगटी’ ते विकू लागले. अशा वेळी त्यांना त्यांचे पूर्वीचे औंधच्या शाळेचे मुख्याध्यापक भा.वि.काळे भेटले. काळे सरांनी माडगूळकरांमधील कलागुण ओळखलेले होते. त्यांनी आचार्य अत्र्यांना गदिमांसाठी चिठ्ठी दिली.

     अत्र्यांची व गदिमांची भेट मार्च १९३८मध्ये झाली. आचार्य अत्रे ‘झेंडूच्या फुलां’मुळे कीर्तीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी माडगूळकरांना कोल्हापूरला मा.विनायकांकडे जायला सांगितले. आणि ‘ब्रह्मचारी’ सिनेमापासून गदिमांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. येथून पुढे १५७ मराठी आणि २३ हिंदी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत पटकथालेखक, संवाद, गीते, अभिनेते, कशात ना कशात श्रेयनामावलीत आणि रसिकांच्या हृदयात गदिमांचे नाव कायम विराजमान झाले.

     कोल्हापूरमध्ये असतानाच प्रसिद्ध लेखक वि.स.खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी गदिमांना मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात व ‘लेखन करा, यशस्वी व्हाल’ हा आशीर्वाद त्यांना मिळाला. लेखनाबद्दल ओढ, व्यासंगाची गोडी वाढली. ‘ब्रह्मचारी’त बाबूराव पेंढारकरांच्या बापाची भूमिका केली. त्याचे पुढे व्ही. शांताराम यांनी कौतुक केले. बाबूरावांनी त्यांना ‘नवहंस’ या संस्थेत स्टाफवर ‘कवी’ म्हणून घेतले. तेथे नव्या विचारांचे व अभ्यासू दिग्दर्शक विश्राम बेडेकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘पहिला पाळणा’ या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेली सर्व गीते बाबूराव व विश्राम बेडेकरांना पसंत पडली. रसिकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.

     ‘हंस’ नंतर मा.विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ काढले. त्यातही त्यांनी गदिमांना स्थान दिले. एच.एम.व्ही.कडून त्यांना मागणी होतीच. शिवाय हंसमधील पूर्वीचे खजिनदार वामनराव कुलकर्णी यांनी ‘मंगळचित्र’ म्हणून संस्था काढली होती. त्यात ‘जयमल्हार’, ‘जिवाचा सखा’ या चित्रपटांचे नामांकन, पटकथालेखन, गीते, संवाद हे सर्व गदिमांवर सोपविले होते. याच वेळी भालजी पेंढारकरांशी त्यांचा संपर्क आला. ‘भक्त दामाजी’ या भालजींच्या चित्रपटातील गाणी गदिमांना करायला मिळाली. आणि या वेळेपासून अभिनय, उत्तम शब्दकला आणि देवदत्त प्रतिभेच्या जोरावर वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रांत माडगूळकरांचा यशस्वी संचार सुरू झाला. ‘भक्त दामाजी’, ‘संत जनाबाई’ची गीते लिहिणारे गदिमा आणि ‘रामजोशी’मधील सवाल-जवाब लिहिणारे गदिमा एकच का अशी शंका यावी, इतकी प्रतिभेची विविधता त्यांत आहे.

     तमाशा चित्रपटांचे एक नवे पर्व ‘रामजोशीं’च्या रूपाने गदिमांनी सुरू केले. ‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’ व  ‘रामजोशी’मधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘सवाल-जबाब’ हा शाहिरी प्रकार रामजोशीत आणून त्यांनी ‘रामजोशी’ चित्रपटाची सांस्कृतिक बाजू उंचावली. ‘माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’, ‘काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला’ ह्या त्यांच्या लावण्या गाजल्या. ‘जगाच्या पाठीवर’मधील ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’, ‘एक धागा सुखाचा’मधील ‘थकले रे नंदलाला’,‘बाई मी विकत घेतला श्याम’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ इत्यादी गीतांमधून त्यांची नादमधुरता, गेयता, लयकारी ही सारी वैशिष्ट्ये दिसतात.

     कोल्हापूरच्या ‘हंस’, ‘नवहंस’, ‘प्रफुल्ल’ ह्या चित्रपटकंपन्या बंद पडल्या. १९४८ साली भालजी पेंढारकरांचा सुसज्ज स्टुडिओ आगीत जळाला आणि मराठी चित्रपटसृष्टी पुण्याकडे वळली. ‘संत जनाबाई’च्या वेळी प्रभातच्या स्टाफवर गदिमा होते. ‘प्रभात समयो पातला। आता जाग बा विठ्ठला’ ही काकड आरती गाजली होती. कोल्हापूरपासूनच राम ऊर्फ सुधीर फडके  त्यांच्या बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते. पुण्याच्या श्रीविजय पिक्चर्सने ‘सीतास्वयंवर’ काढले. त्यातील ‘मनोरथा चल त्या नगरीला, एक गुपित सांगते गडे, हे वदन तुझे की कमळ निळे?’ ही गदिमांची गाणी घरोघरी म्हटली जात असत. शब्दसुरांची एक अलौकिक वीण गदिमा सुधीर फडके यांनी लावणी, काकड आरती, अभंग, भावगीत या सर्वांमध्ये दाखविली.

     याच सुमारास पुण्यात रेडिओ स्टेशन सुरू झाले. आपली लेखणी पैसा देते; पण काळावरती कायमचा ठसा उमटवत नाही ही रुखरुख ह्या महाकवीला होती. ‘रामायणा’वर गीते करायला सीताराम लाडांनी भरीस घातले व या रामभक्ताने भारतीय आदर्शाची ओळख करून देणारे, ५६ गीते असलेले व्यक्तिचित्र, समूहगीत या विविध प्रकारांनी भरलेले ‘गीतरामायण’ लिहिले. त्यातील सर्वच गीते एकापेक्षा एक सुरेख, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी आहेत. ‘स्वये श्रीरामप्रभू’पासून शेवटपर्यंत बहुतेक गीते महाराष्ट्राच्या पिढीच्या ओठांवर आहेत. सुगंधी धूप विकणार्‍या ह्या महाकवीने पुढील पिढीसाठी भारतीय संस्कृतीचा हा धूप महाराष्ट्राच्या घराघरांतून दरवळत ठेवला आहे.

     सुगंधी वीणा, जोगिया (राज्य पुरस्कार), पूरिया, काव्यकथा, चार संगीतिका, चैत्रबन (राज्य पुरस्कार), दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार), गीतगोपाळ, गीतसौभद्र; हिंदी, बंगाली, कानडी, तेलगू यांत भाषांतरित झालेले ‘गीतरामायण’, ‘वैशाखी’ हे काव्यसंग्रह, १४ लघुकथासंग्रह, ‘मंतरलेले दिवस’ हे राज्य पुरस्कारित आत्मचरित्र, ‘दे टाळी ग घे टाळी’ (बालवाङ्मय) केंद्र पुरस्कार, दोन कादंबर्‍या, नाटक, असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी लिहिले. संगीत नाटक अकॅडमीने १९५७चे अवॉर्डही त्यांना मिळाले होते. परंतु, सर्वसामान्यांना ‘गदिमा’ ज्ञात आहेत ते आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार म्हणूनच.

     १४ डिसेंबर १९७७ रोजी या महाकवीने इहलोकीची यात्रा  संपवली. त्यांच्या जन्मगावी, शेटेफळ येथे त्यांचे स्मारक आहे. दरवर्षी तेथे स्मृतिदिन साजरा होतो आणि महाराष्ट्राच्या मनामनांत ते गीतरामायणाने भरून उरले आहेत.

      - डॉ. उषा कोटबागी

माडगूळकर, गजानन दिगंबर