Skip to main content
x

माडगूळकर, व्यंकटेश दिगंबर

     प्रतिभेची अलौकिक देणगी लाभलेल्या, सांगली जिल्ह्यातील माडगूळ या छोट्या गावात जन्मलेल्या व्यंकटेश दिगंबर माडगूळकरांनी केवळ मराठी साहित्यसृष्टीतच नव्हे; तर जगभरातील साहित्यात स्वतःचा ठसा उमटवला. साहित्य समृद्ध करता-करताच त्यांच्या बहुरंगी प्रतिभेचे अनेक आविष्कार रसिकांना दिपवून गेले. ते उत्तम चित्रकारही होते. समाजाप्रमाणे निसर्गाकडेही त्यांनी डोळसपणे पाहिले. प्रतिकूल परिस्थितीमुळे चित्रकलेची साधने परवडली नाहीत आणि मग आपण लेखक झालो, अशी खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली; पण रेखाटनातून त्यांच्यातल्या चित्रकाराचे दर्शन मात्र घडत राहिले. पाच भाऊ, (विख्यात साहित्यिक ग.दि.माडगूळकर हे थोरले बंधू) दोन बहिणी, वडील (दिगंबर माडगूळकर) आणि मातोश्री (सौ. बनुताई) असा त्यांचा परिवार होता. घरात गरिबी आणि वास्तव्य कायम दुष्काळी प्रदेशात; यांमुळे शालेय शिक्षणाची आबाळ झाली, वडिलांची कथा रंगवून सांगण्याची शैली आणि आईची चित्रकला हे दोन्ही गुण त्यांनी उचलले. संत, शाहिरी वाङ्मय, कीर्तन-कथा यांचे संस्कार, वैदू, फासेपारधी, रामोशी, धनगर, न्हावी, तेली, मुसलमान अशा सर्व तर्‍हेच्या लोकांच्या संगतीत त्यांचे आयुष्य गेले. त्यामुळे साहित्य, चित्र, लोककला, बोलीभाषा यांच्या संस्कारांचा वैशिष्ट्यपूर्ण मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात घडून आला.

     त्यांचे शिक्षण माडगूळ, कुंडल, आटपाडी, विभूतवाडी आणि किन्हाई या गावांत जेमतेम सहावीपर्यंत झाले; पण तरीही स्वप्रयत्नाने मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांनी व्यासंग केला. १९४२सालच्या ‘चले जाव’ चळवळीतही त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यांनी सुरुवातीला काही काळ पत्रकारिताही केली. १९४६मध्ये त्यांची पहिली कथा ‘काळ्या तोंडाची’ प्रकाशित झाली. त्यानंतर ‘सत्यकथा’, ‘समीक्षक’, ‘अभिरुची’, ‘मौज’ या नियतकालिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. १९४९मध्ये ‘माणदेशी माणसे’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आणि एक श्रेष्ठ ग्रामीण कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली. याशिवाय ‘वाघाच्या मागावर’, ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘हस्ताचा पाऊस’, ‘सीताराम एकनाथ’, ‘काळी आई’, ‘जांभळाचे दिवस’, ‘उंबरठा’, ‘कांगारूचं चांगभलं’, ‘घरदार’, ‘डोहातील सावल्या’, ‘बाजार’, ‘रानमेवा’, ‘वाळूचा किल्ला’, ‘घराकडील गोष्टी’, ‘जंगलातील दिवस’, ‘नागझिरा’, ‘परवचा’, ‘पांढर्‍यावर काळे’, ‘वाटा’, ‘सखा’, असे अनेक कथासंग्रह आणि प्रवासवर्णने असे साहित्य प्रकाशित झाले. त्यांच्या कथालेखनाचा प्रवास मराठी साहित्यात अपूर्व असा ठरला. ग्रामीण जीवनातील शेतकरी, ब्राह्मण, मुसलमान, स्पृश्य-अस्पृश्य बलुतेदार यांच्याबरोबरच निसर्ग आणि प्राणिजीवन हे त्यांच्या लिखाणाचे महत्त्वाचे विषय झाले. मराठी साहित्याला अनोखे असणारे ग्रामीण जीवनाचे अस्सल चित्रण त्यांच्या कथांमधील व्यक्तिरेखांनी घडवले. गावाच्या परिसरात असणार्‍या सुतार, लोहार, न्हावी इत्यादी बलुतेदारांप्रमाणेच महार, मांग, चांभार, रामोशी हेही ग्रामजीवनाचेच अपरिहार्य घटक असतात. त्यांच्याही श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, रिवाज, आस्था यांचे आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक संबंधांसह आकलन हा माडगूळकरांच्या कथेतला उजवा भाग ठरला व या अर्थाने दलितांच्या सामाजिक जीवनाच्या आकलनाचा त्यांचा आवाका वाचकांबरोबरच समीक्षकांनाही आश्चर्यचकित करून गेला.

     कथेप्रमाणेच कादंबरी क्षेत्रातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. १९५५मध्ये ‘बनगरवाडी’ प्रसिद्ध झाली आणि साहित्याच्या क्षेत्रात ती मैलाचा दगड बनली. आधुनिक मराठी कादंबरीतील आशयाला स्थानप्रधानता हा नवीन पैलू या कादंबरीने मिळवून दिला. स्थानिक परिसरातील भाषा, संस्कृती, दुष्काळ, सण, कंगालपण, श्रद्धा, संकेत यांचे एकसंध वास्तव चित्रण नायक-निवेदकाच्या शब्दांतून त्यांनी समर्थपणे समोर उभे केले. रूढ अर्थाने या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे चित्रण त्यात आले आणि बनगरवाडीलाच नायकत्व प्राप्त झालेले आहे. माडगूळकरांच्या शैलीतील खास प्रयोगशीलता या कादंबरीतून जाणवली.

     याशिवाय ‘वावटळ’, ‘करुणाष्टक’ आणि ‘कोवळे दिवस’ या त्यांच्या कादंबर्‍या आत्मचरित्रपर आहेत. गांधीखुनानंतर झालेल्या भीषण दंगली, जाळपोळ यांमुळे ब्राह्मण समाजावर झालेल्या आघाताची ‘वावटळ’ ही कहाणी आहे. ‘कोवळे दिवस’मध्ये एक कोवळा स्वातंत्र्यसैनिक भेटतो, तर ‘करुणाष्टका’त दारिद्य्राने ग्रासलेली आठ मुलांची आईसमोर उभी राहते. ‘पुढचं पाऊल’ ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी होय. ‘समांतर’ या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीत आरंभापासून अखेरीपर्यंत वानरांच्या टोळ्यांचे सूक्ष्म मार्मिक चित्रण येते. वानरांच्या प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळ्यांची घुसखोरी, त्यांचे संघर्ष, त्यांची बचावाची भूमिका, नायकत्व आणि माद्या मिळवण्यासाठी वानरांना कराव्या लागणार्‍या हाणामार्‍या यांचे विलक्षण परिणामकारक दर्शन या छोट्याशा कादंबरीत येते. वानरांच्या या कथेतून मानवी जगातील वृत्तीचा प्रत्यय लेखक देत राहतो.

     याशिवाय त्यांनी ‘काळाबरोबर चला’, ‘जाणार कुठे?’, ‘तो वेडा कुंभार’, ‘नाना सातपुते’, ‘पती गेले ग काठेवाडी’, ‘बिकट वाट वहिवाट’, ‘सती’, ही नाटकेही लिहिली. ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘बिन बियांचे झाड’ ही त्यांची लोकनाट्येही विशेष गाजली.

     ‘पांढरी मेंढरं, हिरवी कुरणं’ हे प्रवासवर्णन; ‘प्रवास एका लेखकाचा’ (आत्मचरित्रात्मक); ‘चित्रे आणि चरित्रे’ (व्यक्तिचित्रण) ही पुस्तके लिहिली आणि चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ‘जशास तसे’, ‘पुढचं पाऊल’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ ‘रंगपंचमी’, ‘वंशाचा दिवा’, ‘सांगत्ये ऐका’ इत्यादींच्या पटकथाही त्यांच्याच!‘रानमेवा’, ‘चित्रे आणि चरित्रे’ यांमध्ये त्यांचे शिकारविषयक लेख व त्याबरोबरच ‘रानातली रेखाटनं’, ‘राजस्थानची रेखाटनं’, ‘चित्रकार देऊसकर’, ‘रंगरेषांचे मृगजळ’ असे चित्रकलाविषयक लेखही प्रसिद्ध झाले.

     माडगूळकरांनी अनुवादाच्या क्षेत्रातही मोलाचा ठसा उमटवला. ‘सिंहाच्या देशात’ हा बर्नार्ड आणि ग्रझीमिक यांच्या ग्रंथांचा संक्षिप्त अनुवाद, ‘बिग सिटी लिटील बॉय’चा ‘मंतरलेले बेट’, ‘द शॅडो फ्रॉम लडाख’चा ‘सुमीता’, ‘लाफ्टर विथ माय फादर’चा ‘मी अन् माझा बाप’ या नावाने त्यांनी अनुवाद केले. याशिवाय जॉर्ज ऑरवेल या लेखकाच्या अनेक ललित लेखांचाही अनुवाद त्यांनी केला.

     त्यांचे स्वतःचे साहित्यसुद्धा अनेक पाश्चात्त्य भाषांमध्ये अनुवादित झाले. ‘बनगरवाडी’चा अनुवाद इंग्रजी, जर्मन, हिंदी, डॅनिश या भाषांत व ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे इतरही भाषांमध्ये झाला. ‘वावटळ’ कादंबरी इंग्रजी, रशियन भाषांत व ‘समांतर’ कन्नडमध्ये, असे अनुवाद झालेले आहेत. अनेक कथाही जर्मन, डॅनिश, उर्दू, हिंदी या भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत.

     रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची प्रचंड ख्याती झाली. जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा त्यांनी रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक रेखाटने प्रसिद्ध आहेत.

     त्यांच्या पाच पुस्तकांना ‘महाराष्ट्र शासन पुरस्कार’ मिळाले. १९८३ साली आंबाजोगाईला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

- मीरा तारळेकर

माडगूळकर, व्यंकटेश दिगंबर