Skip to main content
x

माजगावकर, गणपती शंकर

               कोल्हापूरच्या कलापरंपरेतील निसर्गचित्रणाला काहीसे आधुनिक वळण देण्याचे धाडस करणारे चित्रकार व विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून गणपती शंकर माजगावकर प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांनी १९६९ मध्ये रेखा व रंगकलेची पदविका (जी.डी. आर्ट, पेंटिंग) दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथून प्राप्त केली. ते १९७१ मध्ये आर्ट मास्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. नवभारत शिक्षण मंडळ, सांगली संचालित कलाविश्‍व चित्रकला महाविद्यालय येथून माजगावकर ३५ वर्षांच्या सेवेनंतर प्राचार्य या पदावरून निवृत्त झाले.

               निसर्गचित्रणातील वातावरणनिर्मिती, रंगांची योजना हुबेहूब चित्र न रेखाटता स्वतःच्या अंतर्मनाला, कलेच्या भावनेला पचेल, भावेल तशाच पद्धतीने साकारत माजगावकरांनी रंगसंगती, समृद्ध रेषा, प्रफुल्लित वातावरण आणि मनाला आनंद देणारे विषय हाताळत स्वतःची अशी एक खास वास्तवदर्शी शैली विकसित केली. त्यांच्या चित्रांत कोल्हापूरच्या निसर्गाचा व पन्हाळा, रंकाळा, पंचगंगा, गगनबावडा, सह्याद्रीच्या डोंगररांगांचा मनावर झालेला परिणाम त्यांनी जलरंग व तैलरंग या माध्यमांतून आधुनिक पद्धतीने रंगविला.

               माजगावकरांच्या चित्रांतून आकार, अवकाश व प्रकाश यांचे अतिशय कल्पक संयोजन, आकारांचे सौंदर्य व प्रधानत्व तसंच  गौणत्व या गुणांमुळे साधलेला मेळ अतिशय ठळकपणे दृष्टीस पडतो. जी.आर. वडणगेकर गुरुजींचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव स्पष्ट दिसून येतो. त्यांनी सुरुवातीचे काम जलरंगात केले; परंतु त्यानंतरच्या काळात रवींद्र मिस्त्रींच्या सहवासात त्यांच्यातील कलावंताला दिशा मिळाली. त्यातून निर्माण झालेल्या प्रयोगशील वृत्तीमुळेच माजगावकरांनी तैलरंगाचे पारदर्शकपणे कॅनव्हासवर लेपन केले व एक वेगळाच पोत व परिणाम ते निर्माण करू लागले. त्या पद्धतीने नंतर बऱ्याच युवा कलावंतांनी प्रयत्न केले; परंतु ती उंची त्यांना गाठता आली नाही.

               माजगावकरांच्या अलीकडच्या चित्रांत रंगसंगती, रंगलेपन, रचना, पोत या बाबतीत अधिक प्रयोगशीलतेकडे झुकणारी अशी त्यांची स्वतःची खास शैली दिसून येते. त्यांच्या निसर्गचित्रणातील मानवाकृती या त्या चित्रात एकरूप होतात. त्यांच्या अलीकडच्या चित्रांत काही ठिकाणी सपाट रंगलेपन व काही ठिकाणी रंगबिंदूंचा वापर करून सहजता व सुंदरता यांचा अतिशय चांगला मेळ साधलेला दिसून येतो.

               त्यांच्या मते, नवनिर्मिती हा निसर्गाचा स्थायिभाव आहे. कलावंत हा निसर्गाचा एक भाग आहे. त्यामुळे नवनिर्मिती करणे शक्य होते. निसर्गचित्र रंगवताना प्रत्येक कलावंताला त्या दृश्यात आपली स्वतःची प्रकृती शोधता आली पाहिजे. कलाकाराजवळ एखाद्या निरागस बालकाप्रमाणे प्रांजळ दृष्टी असणे जरुरीचे आहे. निसर्गचित्रे रेखाटताना निसटते क्षण पकडण्याचे आव्हानात्मक काम कलावंताकडून पूर्ण झाले तरच उत्कृष्ट निसर्गचित्रांची निर्मिती होऊ शकते.

               माजगावकरांनी व्यक्तिचित्रेही रेखाटलेली आहेत. त्यांनी अनेक सामूहिक प्रदर्शने व वैयक्तिक प्रदर्शने भरविली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांतील ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (१९७७, १९८३, १९८७, १९८९), ‘भारत कला परिषद’, हैद्राबाद (१९८८), ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ (१९८६, १९८८, १९९४), ‘महाकोषक कलाप्रदर्शन’, रायपूर (प्रथम पुरस्कार : सुवर्णपदक, १९८२), ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ (१९९६), हे विशेष उल्लेखनीय पुरस्कार होत.  त्यांना २००४ साली महाराष्ट्र राज्य शासनातर्फे  ‘आदर्श कलाशिक्षक’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

               - जयश्री मगदुम

माजगावकर, गणपती शंकर